देशाच्या पहिल्या मतदाराचे घर उघड्यावर

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेलीमध्ये राहणाऱ्या वर्सन वसावेचे घर बांधायला तीस वर्षांपासून जागाच मिळालेली नाहीये. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे.

आशय बबिता दिलीप येडगे / १८ मे २०२२ :

वर्सन बिज्या वसावे २०१९ ला भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत पहिल्या क्रमांकावर असणारा माणूस. मणिबेली या गावात राहणारा वर्सन त्यावेळी माध्यमांमध्ये खूप प्रसिद्ध झाला अनेकांनी त्याच्या मुलाखती घेतल्या पण मणिबेलीबद्दल सांगायचं झालं तर हे तेच गाव आहे जे गुजरातच्या सरदार सरोवर प्रकल्पामध्ये पहिल्यांदा बुडितात गेलं. धरणाची उंची 90 मीटरच्या खाली असताना या गावातील बिज्या दामजा वसावे यांचे घर आणि शेत पाण्याखाली गेले. नर्मदा प्राधिकरणाच्या लवादानुसार जर पावसाळ्यामध्ये एखाद्या कुटुंबाचे घर बुडितात जात असेल तर त्या बाधिताचे पुनर्वसन एका वर्षाच्या आत होणे बंधन कारक आहे.

मणिबेलीमधील बहुतांश घरे व जमिनी 1994/95 मध्येच म्हणजे २७ वर्षांपूर्वीच पाण्याखाली गेल्या होत्या . पण इतकी वर्षे होऊनही शासनाने मणिबेलीच्या लोकांचे पुनर्वसन पूर्ण केलेले नाही. यापैकी बऱ्याच कुटुंबांना पाच सहा वर्षांपूर्वी काथर्डे दिघर या पुनर्वसित वसाहतीमध्ये शेतजमिनी दिल्या परंतु घरासाठी जागा शिल्लक नसल्याने त्यांना जागाच दिली गेली नाही. त्यामुळे ही कुटुंबे पन्नास किलोमीटरवर असणाऱ्या त्यांच्या मुळ गावात म्हणजे मणिबेलीतच राहून पुनर्वसनात मिळालेली जमीन कसत आहेत, गेल्यावर्षी जातर मगन वसावे व बिज्या दामजा वसावे या दोन प्रकल्प बाधितांचा त्यांच्या मूळगावातच मृत्यू झाला. मणिबेलीच्या बहुतांश नागरिकांनी देशाच्या विकासासाठी बनवलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाला आपली जमीन , शेत , घर सगळं दिलं पण महाराष्ट्र आणि केंद्र सरकार तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आजही या लोकांना आपल्या हक्काची जमीन कसण्यासाठी आणि राहण्यासाठी मिळालेली नाही.

first voter in india
अजून किती वर्षे इथेच राहून तब्बल पन्नास किलोमीटरवर असणारे शेत कसायचे ? म्हणून वडिलांचे घर वसाहतीत हलविण्याचा निर्णय वर्सन ने घेतला पण त्यासाठी लागणारी जमीन मात्र त्याला काही मिळाली नाही.

अशाप्रकारे एकेकाळी देशाचा पहिला मतदार असणाऱ्या वर्सनचे पूर्ण पुनर्वसन मागील तीस वर्षे होऊ शकले नाही पण ही व्यक्ती अजूनही घराची हक्काची जागा न मिळाल्याने आपल्या बुडितात गेलेल्या मूळगावातच राहत आहे. दरवेळेस धरणाच्या वाढत्या उंचीबरोबर आपले राहते घरही पाण्याखाली जात असल्याने त्यांना त्याचे राहते घर बदलावे लागते. अजून किती वर्षे इथेच राहून तब्बल पन्नास किलोमीटरवर असणारे शेत कसायचे ? म्हणून वडिलांचे घर वसाहतीत हलविण्याचा निर्णय वर्सन ने घेतला पण त्यासाठी लागणारी जमीन मात्र त्याला काही मिळाली नाही.

दरवेळी प्रकल्प बाधितांनी उरलेल्या 46 प्रकल्पबाधितांच्या घरांसाठी जागा खरेदी करून गावठाण निर्माण करा, सर्व नागरी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या अशी मागणी केली जाते. नंदुरबारमध्ये मागील कित्येक वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या मेधा पाटकर यांनीही पूर्ण पुनर्वसनाची ही मागणी लावून धरली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घर देण्याचा कालावधी निश्चित केला होता आणि आता दिलेला कालावधी कधीच संपला परंतु अद्याप हि पुनर्वसनाची कारवाई संबंधित विभागाने पूर्ण केली नाही त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पुनर्वसनासाठी लागणारी 4 .36 हेक्टर जमीन देण्यासाठी स्थानिक शेतकरी तयार आहेत पण ही फाईल नेमकी कुठे अडली आहे? हेच कुणाला माहिती नाहीये.

आता पावसाळा तोंडावर आला आहे , संथगतीने चालणाऱ्या कामामुळे याही वर्षी मुळगावात राहूनच या ४६ कुटुंबांना जमीन कसावी लागते की काय म्हणून आता बाधितांचा संयम आता संपत आला आहे. आता ह्या पावसाळया पूर्वी हा प्रश्न सोडवला नाही तर, रस्त्यावर उतरून घरे बांधून आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here