राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ

  • टीम बाईमाणूस

राज्यातील ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथालयांच्या अनुदानात 60 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे. तसेच ग्रंथालयांबाबतचे कठोर निकष बदलण्यासाठी कार्यवाही सुरू असून त्यासाठी सूचना व शिफारसी मागविण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील ग्रंथालयांना थकीत अनुदानाची रक्कम वितरित करण्यासह ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील बोलत होते.

ग्रंथालयांबाबतच्या त्रुटी व कठोर निकष बदलण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वांनी सूचना पाठवाव्यात, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. राज्यात नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या परवानगीची प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येतील. राज्यामध्ये ग्रंथालयांना शासनामार्फत परिरक्षण अनुदान देण्यात येते. याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत संबंधित ग्रंथालयांनी उचित निर्णय घ्यावा. पेटीतील ग्रंथालयाची चौकशी करून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. ई-ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली जातील, असेही पाटील यांनी सांगितले.

या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे शशिकांत शिंदे, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला होता.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here