दिन दिन दिवाळी : वाघबारस… आदिवासी आणि वाघाचं एक अनोखं नातं…

  • टीम बाईमाणूस

निसर्ग आणि आदिवासी समाज हे दोन्ही परस्परपूरक घटक.. निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणार्‍या आदिवासींमध्ये प्रत्येक सणात निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अर्थात त्यात निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जातोच, शिवाय स्वसंरक्षणासाठीही निसर्गाला साकडं घातलं जातं. दिवाळीच्या काळात साजरी होणारी वाघबारसदेखील यातीलच एक. दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. राज्यातील अनेक आदिवासी भागात विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे-पालघर भागातील आदिवासींमध्ये ही परंपरा अधिक दिसून येते.

वाघाचे पूजन म्हणजेज वाघबारस

वाघाने आपल्यावर हल्ला करु नये म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाघाचे पूजन केले जाते. या सणाला वाघबारस म्हणतात. इतरत्र वसुबारस सण साजरा होत असताना आदिवासी पाड्यांवर वाघबारस साजरी होते. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस. काही गावांमध्ये गाईगुरांचे रक्षण व्हावे म्हणून वाघाच्या मंदिरात कोंबड्याचा बळी दिला जातो. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांची गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा, बोकडाचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करुन त्यावर शेंदूर लावलेला दिसतो. या चित्राचे पूजन करून वाघबारस सण साजरा होतो. वाघबारसच्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या जंगलातून लाकूडफाटा आणला, तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो, अशा अख्यायिका जुन्याजाणत्या लोकांकडून सांगितल्या जातात. अशाच काही अख्यायिकांनुसार, सणाच्या एक महिना आधी आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने लोक शेतकाम बंद ठेवतात. वाडा, पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यातील अनेक गावांत वाडय़ा-वस्त्यांवर वाघ देवाची मंदिरे आजही आहेत.

अकोले तालुक्याची प्रसिद्ध वाघबारस

अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत. अन्य आदिवासी भागांतही काही ठिकाणी वाघदेवाची मंदिरेही आहेत. सह्याद्रीतील घाटरस्त्यांना वाघोबाच्या मूर्ती व ओट्यांवर असलेली मंदिरे पाहण्यास मिळतात. वाघोबाची मंदिरे जुन्नरला तळमाची येथे, ठाणे-इगतपुरी-आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे आहेत. काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून, त्यावर शेंदूर लावून ती चित्रे ठेवलेली आढळतात.

वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. त्या ठिकाणी गावातील प्रमुख जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात. वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते. रांगोळी घातली जाते. फुलांच्या माळा लावल्या जातात. देवांना शेंदूर फासला जातो. गावातील मारुतीच्या व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटवली जाते. गुराखी मुले, काहीजण अस्वल तर काहीजण कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. त्यात एखाद्याला वाघ बनवले जाते. त्या वाघाला पळण्यास लावून ‘आमच्या शिवारी येशील का?’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणत पुढे पळतो. असा खेळ खेळला जातो.

आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर कोड्या लावतात. नारळ फोडून पूजा करत देवाच्या पाया पडून आराधना करतात. ‘आमचे, गव्हाऱ्यांचे, गोरा – ढोरानचे खाडया, जनावरांपासून रक्षण कर, आम्हाला चांगले पीक दे, आजारांना दूर ठेव’ असे मागणे मागितले जाते.

रात्री व पहाटे एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूने मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केलेली असते. रात्रीच्या व पहाटेच्या मंगलमयी वातावरणात ते सर्व बांधव तालासुरात “दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायी-म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या”! अशी गीते वेगवेगळ्या तालात म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात. सायंकाळी घरच्या गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते. तेलाचा किवा तुपाचा दिवा लावला जातो. सर्व प्राण्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडधोडाचा नैवद्य खाऊ घातला जातो. आदिवासी तरुण व तरुणी रंगेबीरंगी कपडे घालून, एकत्र जमून तारपाकऱ्याच्या तालावर नाचण्यासाठी त्यांच्या वाडीवस्तीत निघतात. ते त्यांच्या परिसरात बेधुंद नाचतात. तारपकरी त्याच्या तारप्यावर वेगवेगळी चाली वाजवून मजा आणतो. प्रत्येक चालीचा नाच वेगवेगळा असतो. त्या चाली वेगवेगळया नावाने परिचित आहेत. मोराचा = मुऱ्हा चाली, बदक्या चाली, लावरी चाली बायांची, देवांची, रानोडी, टाळ्यांची, नवरदेवाची चाल अशा प्रकारच्या चाली असतात.

विदर्भाची अनोखी प्रथा

वाघदेवाच्या मूर्तीवर, चंद्र, सूर्य, वाघदेव, नागदेव, मोर यांची चित्रे कोरलेली असतात मग शेंदूर चढवून पूजा केली जाते. त्यावर धान्याची कणसे, नागली, भात, उडीद वाहिले जाते. जंगलातील रानभूत, डोंगऱ्यादेव, निळादेव, पाणीदेव, हिरवा देव, कणसरा, रानवा, गावदेवी, गाय या सर्व ज्ञात, अज्ञात देव-देवता, भूत-खेत या सर्वांना विधिवत पूजले जाऊन मग गावातीलच भगत वाघदेवतेला साकडं घालतो.

तो विनवणी करतो की ”हे वाघ देवा तुझ्याच कृपेनं आमचं गोधन म्हणजे साक्षात आमच्या लक्ष्मीच तू रानावनात–निसर्गात रक्षण करीत आला आहेस तसेच यापुढे सुद्धा तुझी कृपादृष्टी राहू दे” अशी श्रद्धा साद वाघदेवाला, नागदेव, मोर, सूर्य, चंद्र इत्यादींना म्हणजेच निसर्गाला घातल्या जाते. पूजनाच्या ठिकाणी कोंबडीचे जिवंत पिल्लू किंवा अंडे ठेवले जाते नंतर ढोल वाजवून, गाय-गुरांचा कळप पळविला जातो ज्यामुळे गुरांच्या पायाखाली अंडे किवा कोंबडीचे पिल्लू तुडविले जाऊन बळी प्रथा पूर्ण होते.

या नंतर सुरु होते गुराख्यांची परीक्षा. कारण तो जंगलामध्ये गोधनासोबत सतत वावरत असतो. त्याच्या परीक्षेकरिता भात– कुटाराला आग लावली जाते. त्या आगीच्या ज्वालामधून गुराख्याला धावत पळत जावे लागते. ह्या मागे एकच शुद्ध हेतू असतो कि दुर्दैवाने जंगलात बाका प्रसंग उद्भवला तर गुराख्याने आपल्या लक्ष्मीला म्हणजेच गोधनाला वाघाच्या तावडीतून, जंगलातल्या अकस्मात आगीतून, पुरापासून अथवा चोरांपासून आपल्या गुरांची सुखरूप सुटका करता यावी, यामध्ये सुधारणा, सूचना इत्यादी केली जाते. त्यानंतर गावातून गोळा करून आणलेल्या इराचे सामूहिक भोजन केले जाते. एकंदरच हा सर्व थाट निसर्ग पूजनाचा असतो. आदिवासी समाजाने या पूजनाला वाघबरस असे नाव दिलेले आहे. ज्या द्वारे वाघ देवतेला नमन केले जाते.

…जंगलातून वाघ संपले तसे वाघाची भीतीही संपली. भीती गेल्यामुळे वाघबारस साजरी करण्याची प्रथा आता लोप पावत चालली आहे. आदिवासींकडील जनावरांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या उत्साहात हा सण आता साजरा होताना दिसत नाही. कालौघात वाघबारस ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे.

आदिवासी जंगलात, दरीखोऱ्यात, कडेकपारीत निसर्गाच्या कुशीत ऊन, थंडी, वादळ-वारा, पाऊस याची तमा न बाळगता आनंदाने निसर्गाकडून मिळेल त्यात समाधान मानून जीवन जगत आहे. अत्यंत भोळा, प्रामाणिक, समाधानी म्हणून असलेली त्याची ओळख आजही संस्कृती टिकवून आहे. त्यामुळेच आदिवासी बांधव आनंदाने म्हणतात, ”आदिवासी आम्ही जंगलवाशी, चंद्रा, सूर्यापासून आदिवासी”

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here