अंदाजे गर्भलिंग निदान करून महिलांच्या जीवाशी खेळ केला जात होता!

बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली

सुकेशनी नाईकवाडे / २४ जून २०२२

बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणात आता नवीन खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी हे बीड येथील कारागृहात असून यातील शिकाऊ (कथित) डॉ. सतीश सोनवणे याची आरोग्य विभागाने कसून चौकशी केली असून या चौकशीत अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आल्याचे विश्वसनीय सूत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

असे होते शीतल गाडे प्रकरण..

सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (वय 30, रा. बक्करवाडी, ता. बीड) या महिलेचा 5 जून रोजी मृत्यू झाला होता. शीतल यांना अगोदरच तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या; परंतु रविवारी अचानक त्यांना रक्तस्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासरा, भाऊ, मनिषा सानप नावाची अंगणवाडी सेविका, लॅबवाला कथित डॉ. सतीश सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

कथित डॉ. सोनवणे याचा नवा खुलासा!

आरोपी डॉ सतीश सोनवणे यांचा म्हणण्याप्रमाणे अवैध गर्भलिंग निदानाचा कार्यक्रम हा नियोजन बद्ध होता परंतु सर्व काही अंदाजानेच चालत असल्याचेही सांगण्यात आले आहे. मुळात शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे यालाही सोनोग्राफी मशीन मधील फारसे समजत नव्हते, त्याला एजंट मनीषा सानपनेच शिकवले असल्याचा खुलासा करण्यात आला असून ते दोघे मिळूनच एखाद्या महिलेची सोनोग्राफी करीत असत आणि तीन ठिपके दाखवले तर मुलगी समजायचे, अन दोन ठिपके दाखवले तर मुलगा असे समजून अंदाजे हा सर्व प्रकार चालत असल्याचे आरोग्य विभागाला दिलेल्या जवाबात शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे यांनी सांगितले.

या प्रकारणाबाबत आरोग्य विभागाने न्यायालयात स्वतंत्र केस दाखल करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आरोपी शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे याचा जवाब घेण्यात आला, प्राधिकृत अधिकारी डॉ. महादेव चिंचोळे यांनी बीडच्या कारागृहात जाऊन जवाब घेतला आणि या जवाबात त्याने अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. जालन्याचे डॉ. गवारे यांच्याकडूनच हे सर्व शिकल्याचे सोनवणे याने काबुल केले, तसेच सोनवणे याने कबुली जवाबात ‘आपण गर्भलिंग निदान करीत होतो’ असे ही म्हटले आहे.

तर ठिपक्यावरून गर्भलिंग निदान अशक्य!

शीतल गाडे प्रकरणातील आरोपी सतीश सोनवणे याने दिलेल्या जवाबात म्हटले आहे की, तीन ठिपके आले की मुलगी अन दोन ठिपके आले की मुलगा या अंदाजला चुकीचे मानले असून ठिपक्यावरून गर्भलिंग निदान करणे अशक्य आहे. उगाच काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल केली जात आहे असा अंदाज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष जैन यांनी व्यक्त केला.

गर्भपात करण्यासाठी शीतल कोणासोबत गेली गेवराईत?

घरच्यांच्या दबावापोटी शीतल गाडे यांना गर्भपात करण्यास भाग पाडले गेले आणि ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे शीतल आणि तिचा सासरा सुंदर गाडे हे दुचाकीवरून 7 च्या अगोदर गेवराई येथे पोहोचले. गर्भलिंग तपासणीसाठी 25 हजार रुपये शुल्क ठरलेला होता शितलचा सासरा सुंदर गाडे याने हे शुल्क कमी करण्याची विनंती केली मात्र मनीषा सानपने रेट फिक्स असल्याचे सांगितले. एका खाजगी रुग्णालयाचा पत्ता त्यांना देण्यात आला आणि तेथून मनीषा सानप त्या दोघांना घेऊन तिच्या तीन मजली घरी घेऊन गेली. त्या घरी कथित डॉ. सतीश सोनवणे हा अगोदरच तयार होऊन बसला होता. अवघ्या 10 मिनिटात सुंदर गाडे कडून 25 हजार रुपये घेतले. तसेच गर्भपाताची लिंक ही मनिशाने दिल्याचे शितलचा सासरा आरोपी सुंदर गाडे याने त्याच्या जवाबात म्हटले असल्याचे समोर येत आहे.

40 ते 50 महिलांची गर्भलिंग तपासणी केल्याचे उघड!

जालन्याचे डॉ. गवारे यांना अटक झाल्यानंतर मार्च 2022 पासून सतीश सोनवणे हा गेवराईत येऊ लागला. त्याला एका सोनोग्राफीसाठी 10 हजार रुपये मिळत होते. साधारण तीन ते साडेतीन महिन्यात त्याने जवळपास 40 ते 50 महिलांची तपासणी केली असल्याचे त्याच्या जावाबात त्याने म्हटले आहे. एवढ्या कमी कालावधीत त्याने तब्बल 5 लाख रुपये कमावले आहेत.

शीतल गाडे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याच्या मागणीने का धरला जोर ?

मृत शितल गाडे प्रकरणातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची सी.आय.डी (CID) मार्फत चौकशी करावी, तपासात हलगर्जीपणा बद्दल सहपोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांना निलंबित करा, संबंधित प्रकरणातील आरोपींची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा, मृत नर्स सीमा डोंगरे हिची आत्महत्या की हत्या? याची सखोल चौकशी करा, अशा मागण्यांनी आता चांगलाच जोर धरला आहे. या प्रकरणातील तपासात विविधता आढळून येत असल्याचे आणि तसेच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

बक्करवाडीत नेमके किती झाले अवैध गर्भपात ?

शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात झाल्या कारणावरून तिचा नाहक जीव गेला आणि बीड जिल्ह्यातील छुप्या पद्धतीने सुरू असलेले गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेटच समोर आले. मात्र एकटी शीतल गाडेच या घटनेची शिकार आहे का? तर नाही अशा असंख्य महिलांना त्याच्या मनाच्या विरुद्ध जाणून त्यांचा गर्भ रिकामा करावा लागला तर काही महिलांना आपला जीवही गमवावा लागला. मात्र त्या महिलांना न्याय मिळाला नाही, त्यांच्या प्रकरणाला कोणी वाचाच फोडली नाही. एकट्या बक्करवाडी येथील झालेल्या गर्भपाताची चौकशी झाली तर पायाखालची जमीन सरकेल एवढे प्रकरण समोर येतील असा दावा येथील स्थानिक लोकांनी केला आहे. तर मग जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात खूप मोठी साखळी परत उघड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

मात्र खरच या सर्व प्रकरणाला सी.आय.डी कडे सोपवले जाणार का? बक्करवाडी गावच्या स्थानिकांच्या म्हणण्याला गांभीर्याने घेतले जाणार का? या सर्व प्रकरणाला प्रशासन कोणत्या पद्धतीने हाताळते याकडे मात्र राज्याचे लक्ष लागले आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here