झाडांना मिठ्या मारण्यापेक्षा…

अभिनेता सुमित राघवनचा पिंजऱ्यातील प्राण्यांना दत्तक घेण्याचा सल्ला

  • टीम बाईमाणूस

‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र, मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची (Save Aarey) हाक दिली आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्थांसह सामान्यांचा प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने ते आरेत जमा होण्याची शक्यता आहे. याआधी देखील सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी याचा विरोध केला होता. आता अभिनेता सुमीत राघवननं (Sumeet Raghavan) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आरेत होणाऱ्या कारशेडला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. आरेमधल्या मेट्रो कार शेडबाबत सुमितनं आतापर्यंत बऱ्याचदा ट्वीट्स करून आपली मतं मांडली आहेत. यावेळी त्यानं आंदोलकांना सल्ला दिला आहे.

झाडांना मिठ्या मारण्यापेक्षा, वन्यप्राणी दत्तक घ्या…

सुमित राघवन आपल्या ट्वीटमध्ये लिहितो, ‘मेट्रो कार शेड समर्थकही पर्यावरणाच्या विरोधात नाहीत. आता जागं होण्याची वेळ आली आहे. आंदोलकांनी नुसतं फलक हातात घेऊन उभं राहण्यापेक्षा खिशातले पैसे खर्च करा. समाजाचं काही भलं करा. मुक्या प्राण्यांसाठी काही तरी करा. सरकारचा भार हलका करा. ‘बस्स्स्स्स… चर्चेचा अंत झाला. सगळ्या पर्यावरणप्रेमींना सांगा, हे घ्या एक एक झाड आणि आपल्या सोसायटीमध्ये लावा. खूप झाला ड्रामा,’’ पुढे सुमितनं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संजय कांबळेंना भेटायला सांगितलं आहे. सुमित लिहितो, ‘तुम्ही पिंजऱ्यातल्या प्राण्यांना एक वर्षासाठी दत्तक घेऊ शकता. मी तारा आणि आतिश या बिबट्यांच्या पिल्लांना दत्तक घेतलं होतं. याबाबत तुम्ही जनजागृती केलीत, तर मला आनंद होईल.’

काही दिवसांपूर्वी सुमितनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टॅग करत ट्वीट केलं होतं. त्यानं लिहिलं होतं, ‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा, जीव, वेळ.. काही किंमत आहे की नाही?‘ असा थेट सवालही त्यानं केला आहे.

काय आहे वन्यप्राणी दत्तक योजना

कुत्रा, मांजरासारख्या पाळीव प्राण्याप्रमाणेच तुम्ही अभयारण्यातील आवडता वन्य प्राणी दत्तक घेऊ शकणार आहात. कारण मुंबईतील बोरिवली परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्य प्राणी दत्तक घेण्याची योजना राबवण्यात आली आहे. यासाठी उद्यान प्रशासनाने वन्य प्राण्याला दत्तक घेण्यासाठी दर निश्चित केले आहे. यात वाघ, सिंह, हरण, निलगाय यांसारखे बरेच प्राणी तुम्हाला दत्तक घेता येणार आहेत.

या राष्ट्रीय उद्यानात सिंह, वाघ, चित्ता, बिबटा, वाघाटी, निलगाय, हरिण अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल केली जाते. मात्र या प्राण्यांच्या देखभालीसाठी मोठा आर्थिक खर्च आवश्यक असतो. उद्यानातील एका वाघासाठी वर्षभरात लाखोंचा खर्च येतो. त्यामुळे प्राण्यांच्या देखभालीचा खर्च उचलण्यासाठी ही योजना दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवली जात आहे. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वनं आणि वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. यासाठी वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना एका वर्षांकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे.

Bibtya In Aarey Forest

वाघ आणि सिंह ३ लाख रुपयांना…

वाघ 3 लाख 10 हजार, सिंह रुपये 3 लाख, बिबटे 1 लाख 20 हजार, वाघाटी 50 हजार, नीलगाय 30 हजार, चितळ 20 हजार, भेकर 10 हजार रुपयांना दत्तक घेता येईल. संपूर्ण माहिती आणि आवेदन करण्याकरिता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.

वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई 2.
अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व), मुंबई.

Email: lionsafaripark@gmail.com / Mobile: 7020282714

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here