मी कायम वाचकांचा ऋणी – प्राचार्य रा. रं. बोराडे

औरंगाबादेत 'सुवर्णमहोत्सवी पाचोळा' कार्यक्रमाचे शानदार आयोजन

  • टीम बाईमाणूस

वाचनाने मला घडवले, माझ्या लिखाणप्रवासाची प्रेरणा हे माझे वाचनच आहे. गेल्या 65 वर्षांच्या माझ्या साहित्यिक प्रवासात मी एकाच वाङ्मय प्रकारात अडकून राहणार नाही याची काळजी घेतली आणि नेहमी त्याच अंगाने लेखन करीत राहिलो. माझ्या लिखाणामध्ये माझ्या पत्नीचे मला नेहमी सहकार्य लाभले आणि कुटुंबाच्या तसेच माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अधिक सोपा झाला. पाचोळा कादंबरीच्या यशामध्ये या कादंबरीच्या प्रकाशकांचा मोठा वाटा आहे.” असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी त्यांच्या गाजलेल्या पाचोळा कादंबरीच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या पाचोळा या गाजलेल्या कादंबरीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज शुक्रवार रोजी औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात ‘सुवर्णमहोत्सवी पाचोळा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील तर समारोपाला ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि कथाकार भारत सासणे, प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक फ. मु. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. औरंगाबाद, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. पाचोळा या ग्रामीण साहित्यातील कादंबरीच्या प्रकाशनाला पन्नास वर्षे पूर्ण होत असून याचनिमित्ताने औरंगाबाद येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पाचोळा ही मातीचा सुगंध अबाधित ठेवणारी कादंबरी असून. समकालीन स्पंदनांनी प्रेरित होऊन रा. रं. बोराडेंनी साकारलेली ही एक अप्रतिम साहित्यकृती आहे. पाचोळ्यातून त्यांनी गरिबीशी लढणाऱ्या एका माऊलीची कथा जगासमोर मांडली आहे. मराठी साहित्याला त्यांनी पाचोळ्याचा रूपाने एक अनमोल ठेवा दिला आहे.” असे प्रशंसोदगार 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी सुवर्णमहोत्सवी पाचोळा या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलताना काढले.

सुवर्णमहोत्सवी पाचोळा’निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या उदघाटन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील युवा साहित्यिकांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. साहित्यिक सुनीता बोर्डे, मेघा पाटील, प्रसाद कुमठेकर, सुशील धसकटे आणि संतोष जगताप यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या पाच गुणवान तरुण साहित्यिकांतर्फे प्रसाद कुमठेकर आणि सुनीता बोर्डे यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले.

पाचोळा आणि समकालीन साहित्यावर, मराठी साहित्यातील मराठवाड्याच्या साहित्यिकांच्या योगदानावर बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, “मराठवाड्यात दीर्घकाळ निजाम आणि परकीय सत्तेचा प्रभाव असल्याने मागील काही शातकांमध्ये साहित्य समृद्ध होऊ शकले नाही. एकदोन उदाहरणे सोडता दर्जेदार साहित्यिक तयार झाले नाहीत मात्र 17 सप्टेंबर 1948 नंतर मराठवाडा भारतात सामील झाला आणि तेथून साहित्यिकांच्या पिढ्या मराठवाड्यात तयार होऊ लागल्या. मराठवाडी साहित्याला घडविणाऱ्या पहिल्या पिढीचे महत्वाचे साहित्यिक म्हणजे रा. रं. बोराडे. मराठवाड्याचे साहित्य पाच खांबांवर उभारले गेले आहे. कवितांचा विचार केला तर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, विचारांच्या बाबतीत नरहर कुरुंदकर, साहित्य समीक्षेच्या क्षेत्रात सुधीर सराळ, कादंबरीकार लक्ष्मीकांत तांबोळी आणि मराठवाडी साहित्याचे पाचवे स्तंभ म्हणजे रा.रं. बोराडे हे आहेत.”

या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून उपस्थित असलेले 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनीही बोराडेंच्या पाचोळा या कादंबरीचे कौतुक करताना म्हटले की , “पाचोळ्यात मातीचा सुगंध आहे. समकालीन स्पंदनांचे ते वास्तव चित्रण आहे. एखाद्या कादंबरीच्या पन्नाशीनिमित्त एवढा मोठा सोहळा आयोजित केला जाणे आणि त्या सोहळ्याला साहित्य रसिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त उपस्थिती असणे हेच या कादंबरीचे महत्व विशद करत असते.” याचबरोबर भारत सासणे यांनी अजूनही पाचोळा या कादंबरीची योग्य समीक्षा साहित्य समीक्षकांनी केलेली नसल्याची खंतही यावेळी व्यक्त केली.

उदघाटन सोहळ्यानंतर ‘पाचोळा 71 ते 21’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात रणधीर शिंदे, नितीन रिंढे, दत्ता घोलप या समीक्षकांनी वेगवेगळ्या अंगांनी पाचोळा या साहित्यकृतीबद्दल आपले मत नोंदवले.

दुपारच्या सत्रात ‘पाचोळा 70 mm’ या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते यामध्ये पाचोळा कादंबरीवर आधारित एका चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यात काम केलेल्या रंगाकर्मींतर्फे अभिवाचनही करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मकरंद अनासपुरे आणि ज्येष्ठ नाटककार अजित दकवी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पाचोळा कादंबरीचे लेखक रा. रं. बोराडे यांचा सन्मानही आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोराडेंच्या सत्कारासाठी कार्यक्रमाल आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनीही आपल्या भाषणात बोराडेंचे मराठी साहित्य विश्वाला मोठे योगदान असल्याचे सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद येथे सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी काम केले. ज्यामध्ये महात्मा गांधी मिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा मराठी विभाग, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्र औरंगाबाद, अभ्युदय फाऊंडेशन या संस्थांचा सहभाग होता.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here