पारधी समाजातील तरुणांसाठी रोजगार मेळावा

  • भगवान राऊत

जिल्हा पोलिस दलातर्फे सध्या कार्यरत असणारे, तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पाल्यांसाठी, होमगार्ड आणि पारधी समाजातील तरुणांसाठी 17 जुलै रोजी अहमदनगर येथे ‘रोजगार मेळाव्या‘चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते. मनोज पाटील म्हणाले, ‘ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर येथे विविध खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहे‘.

पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या पाल्यांबरोबर होमगार्ड यांना स्वत: देखील या मेळाव्यात भाग घेता येणार आहे. महाराष्ट्रातील पारधी समाजाच्या कोणत्याही ठिकाणी वास्तव्य असणाऱ्या तरुणाला भाग घेता येणार आहेत. बारावी किंवा कोणत्याही शाखेचे पदवीधर, उच्चशिक्षित असणारे पाल्य तसेच पारधी समाजातील किमान पाचवीपासून पुढे शिक्षण झालेला तरुण यासाठी पात्र असणार आहे. 35 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना या मेळाव्यात भाग घेता येणार आहे.

आतापर्यंत पोलिसांच्या एक हजार 300, तर पारधी समाजातील सुमारे 200 युवकांनी नोंदणी केली असून, अडीच ते तीन हजार तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. 70 कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

गुन्हेगारीपासून परावृत्त करणे

शिक्षण झाल्यानंतरही नोकरीची संधी उपलब्ध न झाल्याने अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात. यामध्ये पारधी समाजातील तरुणांचाही सहभाग असतो. रोजगार मेळावा आयोजित करून बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येणार आहे. तरुणांचा हाताला रोजगार मिळाला तर त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यास मदत होईल, असा विश्वास अधीक्षक पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here