आदिवासी, भटक्या-विमुक्त समाजातील युवक युवतींना मिळाल्या नोकऱ्या

पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगरच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

  • भगवान राऊत

पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगरच्या वतीने आदिवासी, पारधी, लमाण, भिल्ल समाजातील युवक युवतींकरिता आयोजित रोजगार मेळाव्यात सुमारे 1500 युवक युवतींना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झाला असून काही युवक युवतींना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रेही देण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेमराज सारडा महाविद्यालयाच्या आवारात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, शहरातील विविध दैनिकाचे संपादक, त्याचबरोबर आदिवासी पारधी समाजासाठी काम करणारे सामाजीक कार्यकर्ते प्रा. किसन चव्हाण, ॲड. अरुण जाधव, राजेंद्र काळे, नामदेव भोसले आदी मान्यवर यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.

जिल्ह्यातील सुमारे 3 हजार युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. नगर जिल्हा व परिसरातील विविध 58 कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील म्हणाले की, हा रोजगार मेळावा म्हणजे आनंद मेळावा आहे. पारधी समाजातील तरुणांवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी केला जाणारा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. पारधी समाजातील युवक युवतींनी शिक्षण घेतले पाहिजे, कारण शिक्षणामुळे ज्ञान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. कष्ट करा, जिद्द ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा, मेहनत करा, कुठलेही काम हलके समजू नका. जोपर्यंत तुमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी आहे. चांगला आदर्श नागरिक घडावा हा सामाजीक संदेश देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले. तर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी असे सांगितले की, नोकरी मिळविण्यापेक्षा ती टिकवणे महत्वाचे आहे. मिळालेली नोकरी कोणी सोडणार नाही, असा विश्वास वाटतो. ज्यांना नोकरी मिळाली नाही, त्यांच्यासाठी पोलीस भरतीपूर्वीचे प्रशिक्षण लवकरच आयोजित करण्यात येईल.

रोजगार मिळाला

  • ऑनलाइन नोंदणी 2172
  • प्रत्यक्ष सहभाग 1860
  • नियुक्ती 1023
  • प्रत्यक्ष नियुक्ती 460

नियुक्तीपत्र मिळताच ‘ते’ आनंदाने हरखून गेले

रोजगार मेळाव्यात अनेक तरुणांना मुलाखत दिल्यानंतर काही वेळातच नियुक्तीपत्र मिळाले. त्यामुळे नोकरी मिळालेले तरुण आणि त्यांचे पालक आनंदाने हरखून गेले. कोणाला साडेतीन लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. दरमहा किमान २० हजार पगार मिळणार असल्याचे ऐकून तरुण आणि त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ज्या युवकांची या नोकरी मेळाव्यात निवड झाली नाही. जे बारावी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्यासाठी जेव्हा भरती प्रक्रिया सुरु होईल. त्यावेळी सर्व पारधी, आदिवासी, भिल्ल समाजातील युवकांसाठी एक पोलीस ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी शेखर पाटील यांनी मान्यता दिली असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या मेळाव्याचे उद्घाटन झाले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या मेळाव्याच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. प्रसन्न धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांनी आभार मानले. या मेळाव्यासाठी श्रीरामपूर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी सह जिल्हाभरातून पारधी समाजातील बेरोजगार युवक-युवती सहभागी झाले होते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here