आदिवासी जमिनींवर बेकायदा उत्खनन सुरूच

६ एकर शेतजमिनी नष्ट; आदिवासी कुटुंबांवर उपासमारीचे संकट; ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी

पूनम चौरे / 14 जून 2022

सध्या डहाणू तालुक्यात मुंबई वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम जोरात सुरू आहे. जेएनपीटी ते बडोदरा या एकूण ४४६ किमी अंतर असलेल्या या 8 लेनच्या द्रुतगती महामार्गासाठी डहाणू तालुक्यातील ऐना या गावात भरावासाठी लागणारी माती आणि मुरूमासाठी ठेकेदाराने शेतजमीनीत बेकायदा उत्खनन केल्याने आदिवासी शेतकऱ्यांची जवळपास ६ एकर शेतजमीन संपूर्ण नष्ट झाली आहे. सुसरी नदी काठावरील या शेतजमिनीत आदीवासी शेतकरी दरवर्षी पावसाळ्यात भाताचे पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होते. एक्सप्रेस-वेच्या ठेकेदाराने त्यांच्या उभ्या शेतजमिनीत जेसीबी (JCB) फिरवून अतोनात नुकसान केल्याने कुटुंबाची उपासमार होणार आहे.

मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे साठी पालघर जिल्ह्यातील विरार ते तलासरी या 78 किमीच्या विभागातील भूसंपादनाचे बहुतेक काम पूर्ण होत आल्याने आत्ता जमीनीवरील प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली आहे. मासवण ते गंजाड या पॅकेज 12 मधील मासवण काटाळे, निहे, नागझरी, किराट, बोरशेती, रावते, चिचारे, दाभोण, ऐना, रनकोळ, नवनाथ, चांदवड आणि गंजाड या गावात जमिनीचे सपाटीकरण आणि मातीचा भराव सारख्या प्राथमिक कामांना ठेकेदार कंपनीकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र डहाणू तालुक्यातील ऐना या गावातील आदीवासी खातेदारांच्या सर्वे नंबर 15 या एक्सप्रेस वे शेजारील 8 एकर सामाईक शेतजमिनीत एक्सप्रेस वेच्या ठेकेदार कंपनीने शेतकर्याांच्या नकळत व त्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्याने जवळपास 15 ते 20 फुट खोल बेकायदा खोदकाम करून हजारो ब्रास माती आणि मुरूम काढला आहे.

याविरोधात ऐना येथील आदिवासी शेतकऱ्यांनी डहाणूच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तक्रार दिली आहे. आदिवासी खातेदार कामानिमित्त बाहेरगावी असल्याचा फायदा घेऊन अवैध उत्खनन सुरू असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

“मौजे ऐना सर्वे क्र. 15 या आमच्या सामाईक जमिनीत मुंबई-वडोदरा हायवेच्या ठेकेदाराने आम्ही बाहेरगावी कामधंद्याला असल्याचा फायदा उचलत आमच्या नकळत खोदकाम केले आहे. आमच्या शेतजमिनीतून बेकायदा सुपीक माती आणि मुरूम काढल्यामुळे या जागेतून आता कोणतेही पीक काढता येणार नाही. त्यामुळे आम्ही ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.”

रमन नानू बुजड (पीडित शेतकरी, ऐना)

“संबंधित प्रकरणी महसूल कर्मचारी यांचेकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व पंचनामा करण्यात येणार आहे. यामध्ये काही अनियमितता आढल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.”

अभिजीत देशमुख (तहसीलदार, डहाणू)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here