सरकारने विधवा पुनर्वसन धोरण आणण्याची गरज – हेरंब कुलकर्णी

अंनिसच्या विधवा प्रथा निर्मूलन विशेषांकाचे प्रकाशन

टीम बाईमाणूस / ०८ जुलै २०२२

“कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायत ने विधवा प्रथा विरोधात ठराव केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रश्नावर जागृती निर्माण होत आहे. विधवा महिलांच्या प्रश्नाबाबत शासन समाज आणि माध्यमे संवेदनशील होत आहेत ही मोठी आश्वासक बाब आहे पण या जागृतीची दिशा विधवांच्या पुनर्वसनाकडे वळवायला हवी” असे प्रतिपादन शिक्षण व विधवा बालविवाह दारूबंदी यासारख्या सामाजिक प्रश्नावर लेखन व प्रत्यक्ष काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) (अकोले) यांनी केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘विधवा प्रथा निर्मूलन विशेषांका‘ च्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

या विशेषांकाचे प्रकाशन विधवा सन्मान कायदा अस्तित्वात यावा यासाठी गेली तीस वर्षे संघर्ष करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील आवळाई येथील लतादेवी बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. अंक प्रकाशन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना बोराडे म्हणाल्या, ग्रामीण भागात अजूनही विधवा महिलांना सन्मान मिळत नाही, आता संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीतून विधवा प्रथा निर्मूलनाचे ठराव मंजूर होऊ लागले आहेत, पण केवळ विधवा सन्मानाबाबतचे ठराव होऊन उपयोगी नाही, या ठरावांना जेव्हा कायद्याची जोड मिळेल तेव्हा त्या विधवेला खरा न्याय मिळेल. आता तर राज्य सरकारने सुद्धा ही आपली जबाबदारी मानली आहे. त्यामुळे गेली तीस वर्षे लढत असलेली कायद्याची लढाई आता मी जास्तच जोमाने लढणार आहे असे सांगून या लढाईत आपण सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन करत त्यांनी आपले मनोगत संपवले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील ज्या हेरवाड (Hervad) या छोट्याशा गावाने केलेल्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या ठरावामुळे विधवांच्या प्रश्नाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले त्या गावाचे सरपंच सुरगोंडा पाटील आपल्या भाषणात म्हणाले, “राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा जोपासत आम्ही आमच्या ग्रामपंचायतीत विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव केला आणि त्याची आता लोक चळवळ झाली आहे. पण आता आम्ही केवळ यावरच थांबणार नसून विधवा पुनर्विवाहाचा प्रश्नही हाती घेणार आहोत.” या ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी विधवा प्रथा निर्मूलनाबाबतची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका सांगितली. दीपक माने यांनी गायलेल्या विधवा प्रथा विरोधी गाण्याने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता माने यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन राजीव देशपांडे, राहुल थोरात, अनिल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हे हि वाचा

👉🏽 विधवा कुप्रथा बंदीच्या पलीकडे

👉🏽 विधवांचे विदारक वास्तव….

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here