- टीम बाईमाणूस
प्रदूषणाचे जाचक नियम, चिनी बनावटीचे अतिक्रमण, रबरांचे वाढलेले दर आणि कोरोनाचे येऊन गेलेले संकट अशा असंख्य अडथळ्यांमुळे पालघर-डहाणू परिसरातील फुगे कारखाने बंद पडण्याच्या मागार्वर आहेत. या फुगे कंपन्यांच्या कामगारांवार उपासमारीची वेळ आल्याने शेकडो कामगार गुजरातच्या दिशेने स्थलांतर करत आहेत. विशेषत: यात महिला कामगारांची संख्या अधिक आहे.
फुगे कारखान्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डहाणूत फुगे कारखानदारांची दयनीय अवस्था झाली आहे. डहाणू तालुक्यात 1962 पासून सुमारे दीडशे फुगे कारखाने होते. कच्च्या रबरावर प्रक्रिया करून पारंपरिक पद्धतीने उत्पादित केल्या जाणाऱ्या डहाणूच्या मनमोहक रंगबिरंगी फुग्यांना दिल्ली, कलकत्ता, मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब येथे मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने येथील कारखाने रात्रंदिवस सुरु होते. आदिवासी आणि माच्छी समाजाचे लोकं साधारपणपणे या कारखान्यात काम करतात. या फुग्यांच्या कारखान्यामधून जवळपास 25 हजार आदिवासींना रोजगार मिळत होता. परंतू आता गेल्या वर्षभरात डहाणूत बारापेक्षा अधिक कारखाने बंद पडले तर सध्या वीस ते पंचवीस कारखाने मृत्युशय्येवर असून ते बंद पडण्याचा मार्गावर आहेत. अनेक फुगे कारखानदार उमरगाव (गुजरात ) येथे स्थलांतर झाले आहेत. डहाणू शेहार, आशागड, गंजाड, सावटा सरावली, सोगवे, मणिपूर, रायतली, अशवे, इत्यादी भागांतील हजारो भूमिपुत्रांना रोजगार देणाऱ्या पारंपरिक फुगे कारखानदारांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या वर्षभरात 12 हुन अधिक रबर कारखाने बंद पडले आहेत. त्यावर अवलंबून असलेल्या हजारो महिला पुरुष , कुशल अकुशल कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसडली आहे.

डहाणू तालुक्यात कारखान्यांत उत्पादीत होणाऱ्या फुग्यांना कोलकाता, चेन्नई, पंजाब, दिल्ली आदी ठिकाणी प्रचंड मागणी होती. मात्र, चीनने भारतात खुला बाजार करण्यास सुरुवात केल्यापासून येथील 50 हून अधिक फुगे बनविणार कारखाने गेल्या तीन वर्षांत बंद पडले आहेत. चीनमध्ये बनवलेले फुगे देखणे, टिकाऊ, तसेच दजेर्दार असल्याने या फुग्यांनी भारतीय बाजारपेठ पूर्णत: काबीज केली आहे. त्यामुळे भारतीय कारखान्यांच्या उत्पादनांना मागणी कमी झाल्याने उत्पादनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. त्यातच केरळमधील रबराचे भाव (प्रति किलो 130 रुपये) वाढल्याने येथील फुगे कारखानदार पार मेटाकुटीला आले आहेत. जागतिक बाजारपेठेत रोजच्या रोज वाढणारा रबराचा भाव त्यातच चीन, मलेशिया श्रीलंका येथील दर्जेदार टिकाऊ, रंगबिरंगी आणि फॅन्सी स्वस्त फुगे बेकायदा समुद्री जहाजामार्गे भारतात आणले जात असल्याने डहाणूतील पारंपरिक पद्धतीने उत्पादित केलेल्या फुग्याला भारतीय बाजारपेठेत मागणी कमी होऊ लागली आहे.
डहाणू तालुक्यात फुगा कारखान्यासाठी नवीन तंत्राचा वापर करण्यास बंदी आहे. फुगा निर्मितीसाठी जुन्याच तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे उत्पादन निर्मितीला मर्यादा आहेत. त्यामुळे उत्पादनतंत्रात बदल करण्यासाठी आधुनिकीकरणाला परवानगी दिली पाहिजे. तसेच चीनहून भारतात येणाऱ्या परदेशी फुग्यांच्या आयातीवर बंदी आणली तरच हे व्यावसाय टिकू शकतील असे उद्योजकांचे मत आहे. ‘डहाणू रबर बोर्ड‘ आणि ‘डिप्पड गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने’ तालुक्यातील फुगा उद्योगाला हरित उद्योगात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
डहाणू तालुक्यातील दमट हवामानामुळे फुगा कारखानदारी 30 ते 35 वर्षांपूर्वी चांगल्या प्रकारे चालली. 1980 च्या दशकापासून फुगा कारखाने उभारणीची मालिका येथे सुरू झाली. हा प्रवास इतका वाढत गेला की डहाणू तालुक्यात 50 हून अधिक फुगा कारखाने सुरू होऊन 5 हजाराहून अधिक कामगारांच्या हाताला काम मिळाले. हे आशादायक चित्र असताना डहाणू थर्मल पॉवर स्टेशनला परवानगी देताना अनेक उद्योगांना बंदी घालण्यात आली. फुगा व्यवसाय लाल पट्टय़ात टाकण्यात आले. त्यामुळे कारखाने बंद पडण्याचे प्रकार घडले.