राजकारण सुपोषित पण मुलं मात्र कुपोषित!

स्त्रीभ्रूणहत्या, अवैध गर्भपात आणि आता कुपोषण... भय बीडचे संपत नाही.

सुकेशनी नाईकवाडे / 07 जुलै 2022

बीड जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात येणारे ग्रामीण भागात अंगणवाडीचे 11 तालुक्यामध्ये एकूण 13 प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांच्या अंतर्गत तब्बल 2957 अंगणवाडी केंद्रे सुरू आहेत. बालविकास केंद्रामार्फत अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार आणि त्यांच्या आरोग्याबाबत या केंद्रांवर शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा आणि सर्व विद्यार्थी सुदृढ व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आहारावर कोट्यवधींचा खर्च करत आहे. मात्र तरीही बीड जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मे 2022 अखेर जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटापर्यंत तब्बल 261 बालके तीव्र कुपोषीत आढळून आली आहेत. यात ग्रामीण भागातील 247 तर बीड नागरी प्रकल्पाअंतर्गत 14 बालके कुपोषीत असल्याचे आढळून आले आहे. हे आकडे अतिशय धक्कादायक असून या कुपोषित बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम आणि पोषण पुनर्वसन केंद्र च्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच त्यांना पोषण आहार देऊन त्यांची प्रकृती सुदृढ करण्यावर देखील भर दिला जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये कुपोषित बालकांची संख्या कमी झाल्याचे समोर आले होते मात्र मे 2022 च्या अखेर आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या 2 हजार 958 अंगणवाड्यातून 0 ते 5 वयोगटातील बालकांची संख्या 1 लाख 72 हजार 377 इतकी असून मे महिन्याच्या अखेर 1 लाख 65 हजार 45 बालकांचे वजन घेण्यात आले. यात 1 लाख 55 हजार 781 बालके हे साधारण श्रेणीत असल्याचे समोर आले तर 1 हजार 516 बालकांचे वजन अतिशय कमी असल्याचे आढळून आले, तसेच 247 बालके ही सॅम श्रेणीतील म्हणजे तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले. याशिवाय 1 हजार 317 बालके ही मध्यम कुपोषित म्हणजे मॅम श्रेणीतील असल्याचे दिसून आले आहे.

Source : Hindustan Times

जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील ग्रामीण भागात 13 प्रकल्पामध्ये बीड शहर आणि गेवराई प्रत्येकी 2 प्रकल्प असून केज, आष्टी, माजलगाव, पाटोदा, शिरूर, वडवणी, परळी वैद्यनाथ, धारूर याठिकाणी प्रत्येकी एक एक प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतर्गत 0 ते 5 वयोगटातील मुलांमध्ये ग्रामीण भागात 247 तीव्र कुपोषित मुले आढळली तर बीड नागरी प्रकल्प विभागात एकूण 14 तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत तर ग्रामीण भागात बीड तालुक्यात सर्वाधिक 43 बालके तीव्र कुपोषित असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

तालुका निहाय कुपोषीत बालकांची संख्या

बीड-1 प्रकल्प:- 43, बीड-2 प्रकल्प:-16, गेवराई 1:-12, गेवराई-2 :-18, केज :- 34, आष्टी :-15, माजलगाव:-18, पाटोदा:-17, शिरुर:-19, वडवणी:-16, परळी:-17, धारुर:-9, अंबाजोगाई:-22

RBSK सह NRC मध्ये कुपोषित बालकांवर उपचार!

तीव्र कुपोषित बालकांवर ग्राम बाल विकास केंद्राच्या माध्यमातून RBSK अंतर्गत उपचार केले जातात व त्यानंतर त्या बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर डॉक्टरांच्या तापसणीनंतर पुढील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयातील पोषण सुधार केंद्रात पाठवले जाते. कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून सातत्याने विविध मोहीमा आणि पोषण आहार दिला जातो परंतु तरीही ग्रामीण व शहरी भागात कुपोषित बालकांची संख्या ही वाढतच असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सरकार अश्या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाही बीड जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या काही कमी होत नसल्याच्या चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरताना दिसून येत आहेत. या अशा अतिशय चिंताजनक गोष्टीला नेमक कोण जबाबदार आहे यंत्रणा की प्रशासन? असा सवाल उपस्थित होत आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here