अपंगत्वावर मात करत ‘तो’ बनवतो मुखवटे

जव्हारमध्ये कागदी मुखवट्यांचा उभारला स्टुडियो

टीम बाईमाणूस / 15 जून 2022

आदिवासींचा प्रकृतीशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. प्राकृतिक शक्तींना प्रसन्न करण्यासाठी ते पारंपरिक पद्धतीने अनेक प्रकारचे विधी, उत्सव साजरे करीत असतात. त्यापैकी पश्चिम सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील वारली, भिल्ल, ठाकर, कातकरी, कोकणा, महादेव कोळी या आदिवासींचा ‘बोहाडा‘ हा मुख्य उत्सव आहे. ठाणे, पालघर, नाशिक आणि खान्देश परिसरामध्ये तो अत्यंत धूमधडाक्यात उत्साहाने साजरा केला जातो. बोहाडा हा उत्सव आता फक्त आदिवासींचा राहिलेला नसून देशविदेशातील पर्यटक या भागात बोहाडा पाहायला येत असतात. बोहाड्यामध्ये देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे विविध मुखवटे चेहऱ्यावर धारण करून, सोंगे घेतली जातात. या वेगवेगळ्या मुखवट्यांनाही पर्यटकांकडून मोठी मागणी सुरू झाली आहे. अपंग असलेला भगवान कडू हा असे मुखवटे तयार करण्यात अतिशय उत्तम कलाकार. जव्हार येथील आदिवासी पाड्यांवर पिढय़ानपिढय़ा कागदी देवी देवतांचे, प्राण्यांचे मुखवटे, तारपे व इतर वस्तू तयार करण्याचा व्यवसाय रामिखड येथील भगवान कडू हे कित्येक वर्षांपासून करीत आहेत. अपंग असतानाही त्यांनी हा कलेचा आविष्कार केला असून त्यांच्या या कलेमुळे जव्हारला मुखवटय़ाचे गाव म्हणूनही ओळखले जात आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सोंगे, देवदेवतांचे मुखवटे, पाळीव प्राणी, तारपा, घरातील संसार उपयोगी वस्तू विशेष म्हणजे ऐतिहासिक परंपरा असलेला बोहाडा सणात वापरले जाणारे देवी-देवतांचे मुखवटे जव्हारला तयार केले जातात. तसेच मुखवटा निर्मिती करणारा रामिखड येथील अपंग असलेला एकमेव कलाकार भगवान कडू असून, सोबत कुटुंब त्यांना मदत करतात. ही वडिलोपार्जित परंपरा आजही कडू कुटुंब जोपासत आहे. स्पर्धेच्या युगात हस्तकलेतून निर्मिलेल्या खेळण्यांना बाजारात मागणी घटली. त्यामुळे या व्यवसायाला घरघर लागून व्यावसायिक आर्थिक मंदीचा सामना करीत आहेत.
दरम्यान कडू या आदिवासी बांधवांने स्वत:च्या घरात स्टुडिओ बनविला आहे. हा आदिवासी तरुण बोहडा या उत्सवासाठी 52 देवांचे मुखवटे तयार करतो. त्याने त्याच्या वडिलांकडून ही मुखवटे तयार करण्याची कला जोपासली आहे. त्यात त्याने भर टाकत पत्नी व मुलांसह रद्दी कागदाच्या लगद्यापासून आकर्षक खेळणीही तयार करून विक्री करीत आहे.

असे बनतात मुखवटे

तो एका हाताने अपंग असूनही सुबक मूर्तीना आकार देतो. या मूर्ती बनविण्यासाठी जंगलातील चेरी झाडाची साल पाण्यात भिजवून डिंक तयार करतो, त्या साहित्याचा वापर करून देवाच्या मूर्तीसह कासव, हरीण, असे अनेक प्राणीही साकारले जातात. हरीण, सांबर, बकरी, वाघ मुखवटा, सूर्य नारायण, दळण दळणारी महिला, तिरकमान चालविणारा पुरुष, कासव, गणपती, असे आकर्षक मुखवटे बनवीत आहे. तारप्याचे विविध आकर्षक प्रकार, गौतम बुद्ध आणि अनेक प्रकारच्या हुबेहूब मूर्ती साकारत आहे. ह्या मूर्ती बनविण्यासाठी रद्दी पेपर, झाडाची चिकट साल, माती याचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही साचे वापरले जात नाहीत.

“जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कर्ज मिळाले. त्या माध्यमातून सरकारकडून भरविल्या जाणाऱ्या विविध प्रदर्शनात भाग घेतला. तिथे मूर्ती, खेळणी इ. विक्री होते. परंतु हक्काची बाजारपेठ नाही”.

भगवान कडू

(मुखवटा कलाकार, रामिखड, जव्हार)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here