15 वैदू कुटुंबांना गावातून बाहेर हाकलण्याचा डाव

नागपूरच्या नरसाळा ग्रामपंचायतीने पारित केला अन्यायकारक ठराव

टीम बाईमाणूस / 14 जून 2022

‘पुरोगामी’ आणि प्रगत आजही काही कुटुंबांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतोय. याच आठवड्यात इचलकरंजी येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झाल्याने कंजारभाट समाजातील 24 कुटुंबांना जात पंचायतीने बहिष्कृत केल्याची घटना घडली होती. आता नागपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावोगावी भटकंती करून जडीबुटीची औषधी विकणाऱ्या वैदू समाजातील 15 कुटुंबांना गावातून हाकलून लावण्यासाठी गावकरीच एकवटले आहेत. मौदा तालुक्यातील नरसाळा गटग्रामपंचायती अंतर्गत कुंभापूर या गावी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या 15 कुटुंबातील 75 माणसे मागील 10 वर्षापासून या गावात वास्तव्यास आहेत. नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लोकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. अशाप्रकारे संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन होत असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.

जंगलातील औषधी जडीबुटी आणून त्याची औषधी बनवून गावोगावी विकणे हे या वैदू समाजाचे पारंपरिक काम आहे. इंग्रजपूर्व काळात होणाऱ्या युद्धात जखमी सैनिकांवर जडीबुटीच्या औषधाने उपचार करण्याचा त्यांचा हातखंडा होता. ‘राज गेले की राजपाट जाते’, असे म्हणतात. तशीच अवस्था या वैदू समाजाची झाली आहे. ना सरकारी दप्तरात नोंद, रेशन कार्ड, व्होटिंग कार्ड, आधार कार्ड अशी सरकारी कसलीही नोंद नाही. यांची मुलेही कधी शाळेत गेली नाहीत. कुठे एखाद्या गावी बस्तान बसविले तर गावकरीही त्यांना राहू देत नाहीत.

असाच प्रकार कुंभापूर गावी घडत आहे. हे गाव तसे कन्हान नदीच्या पूरग्रस्त भागात येते. त्यामुळे या जागेवर सरकारी योजना राबविल्या जात नाहीत. अशा जागेवर या कुटुंबांनी 10 वर्षांपासून बस्तान बसविले आहे. मात्र, आता गावकरी त्यांच्या जीवावर उठले आहेत. नरसाळा ग्रामपंचायतीने यांना गावातून हाकलण्याचा ठराव पारित केला आणि या लोकांना दोन दिवसांत जागा खाली करण्याचे नोटीसही बजावले आहे.

भटक्यांवर होणारे अत्याचार काही नवीन नाहीत ; स्वतंत्र भारतात असा प्रकार घडणे दुर्दैवी

“स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महाराष्ट्र आणि देशातील भटक्या विमुक्त समाजाकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत आले आहे. स्वातंत्र्यनंतरही भटक्या विमुक्तांना माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी झगडावे लागते हे दुर्दैवी आहे. या बहिष्काराच्या मागे स्थानिक पातळीवरील राजकारण आणि कायदा होऊनही न संपलेल्या जात पंचायती देखील आहेत का याचा तपास घेणे गरजेचे आहे. भटक्या विमुक्तांना सामाजिक संरक्षण देण्यासाठी बनवल्या गेलेल्या कायद्यांच्या बाबतीत आवश्यक ते प्रशिक्षण पोलिसांना देखील दिले गेले नाही त्यामुळे असे सामाजिक बहिष्कार टाकायला कुणीही घाबरत नाही आणि समाजाला कायद्याचा धाक राहिलेला नाही. 21 व्या शतकात असा प्रकार घडणे खरोखर दुर्दैवी आहे.”

दुर्गा गुडिलू

(सामाजिक कार्यकर्त्या आणि बाईमाणूसच्या रिपोर्टर)

हे ही वाचा 👉🏽 कंजारभाट समाजाच्या २४ कुटुंबावर बहिष्कार

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here