वाड्यात आदिवासी महिलेला ठरवले चेटकीण

महिलेला जबरदस्तीने मानेला धरत मंडपाच्या मध्यभागी बसविले

टीम बाईमाणूस / ११ जून २०२२

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एका खेडेगावामध्ये हळदी समारंभात सहभागी झालेल्या एका आदिवासी महिलेला चेटकणी ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटकही करण्यात आली आहे.

वाडा तालुक्यातील बेरशेती गावात एका हळदीच्या कार्यक्रमात २५ मे रोजी हा प्रकार घडला होता, मात्र संबंधित महिलेने ७ जून रोजी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार करून या प्रकरणाची वाच्यता फोडली. हळदी समारंभात पारंपरिक पद्धतीने कुळदैवताचे पूजन करताना सागर पाटील आणि करण पाटील या दोन तरुणांनी अंगात वारं आल्याचे सांगत सर्व उपस्थितांना घराबाहेर आणले. त्यानंतर आदिवासी समाजातील एका महिलेच्या अंगावर भंडारा उधळत, “तु भुताटकी आहेस, करणी करतेस’’ असा आरोप केला. या अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद घटनेमुळे महिलेची मानहानी झाली, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. यानंतर स्थानिकांच्या मध्यस्तीने हे प्रकरण मिटवण्यात आले. मात्र सदर धक्कादायक प्रकारामुळे पीडितेने घटनेनंतर दहा दिवसांनी भगतगिरी करणारे सागर आणि करण पाटील यांच्याविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या दोघांविरुद्ध अमानुष, अघोरी, अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध काद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे, याविषयी चिंताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान याप्रकरणी येथील आदिवासी व बिगर आदिवासी समाजातील पूर्ववैमस्यापासून असलेल्या संघर्षातून हे आरोप संबंधितांवर करण्यात आल्याचीही चर्चा परिसरात आहेत. या घटनेला जातीयतेचा रंग देऊन कोणीही सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष अंनता वनगा यांनी केले आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here