- टीम बाईमाणूस

दिवाळीच्या खरेदीची लगबग शेवटच्या टप्प्यात आली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण. संपूर्ण घर पणत्यांच्या व दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघते. धारावीतील कुंभारवाडा हा दिवे व पणत्यांसाठी प्रसिद्ध बाजार. इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या ठिकाणी अतिशय सुबक आणि कमी किमतीमध्ये दिवे व पणत्या मिळतात. धारावीतील कुंभारवाडा येथे कुंभारांनी विविध प्रकारच्या आकाराच्या पणत्या, दिवे तसेच दिवाळीस लागणारे साहित्य सजवून विक्रीस ठेवले आहे.

दिवाळीच्या तयारीसाठी धारावीचा कुंभारवाडा सजला असून सध्या येथे मोठय़ा प्रमाणात आकर्षक पणत्यांची विक्री होत आहे. धारावीतील कुंभारवाडय़ात पणत्या तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. परंपरेने आजही गुजरातमधील एक समाज या पणत्यांच्या व्यवसायात सक्रिय आहे. या परिसरात प्रामुख्याने मातीच्या साध्या पणत्या तयार केल्या जातात. तसेच, गुजरातमधून आलेल्या नक्षीदार आकाराच्या तयार पणत्यांना रंगरंगोटी करण्याचे काम येथे केले जाते.

आजही कुंभारवाडय़ात कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून पणत्या रंगवण्याचे काम करतात. या परिसरात प्रामुख्याने साध्या पणत्या तयार केल्या जातात. मुंबईतून व क्वचित प्रसंगी गुजरातहून लाल रंगाच्या मातीपासून या पणत्या तयार केल्या जातात. पूर्वीच्या काळी माती भिजविण्यासाठी घरातच खड्डा तयार केला जात होता. मात्र सध्याची पिढी या व्यवसायात इच्छुन नसल्याने घरातील खड्डा बूजवून घराबाहेर चौकोनी खड्डा तयार करण्यात आला आहे.

येथे माती भिजवली जाते. ही माती पणत्या, माठ आदी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाते. मातीतील मोठे खडे, कचरा काढून टाकला जातो. कुंभारवाडय़ातील अधिकतर व्यवसाय हा घरातील एका खोलीत केला जातो. पणत्या तयार केल्यानंतर याला काही काळ उन्हात वाळवले जाते. पणत्या चांगल्या वाळल्यानंतर घरासमोर तयार केलेल्या भट्टीच्या वरच्या थरावर एका वेळेला हजारो पणत्या ठेवल्या जातात. या भट्टीच्या खाली कापूस व माती एकत्र करून पसरवले जाते आणि त्या भट्टीच्या वरच्या थरात पणत्या ठेवल्या जातात. भट्टीच्या खालच्या बाजूला कोपऱ्यांमधील छिद्रांमध्ये गरम माती घातली जाते. अशा प्रकारे पणत्या भाजण्याचे काम केले जाते.

धारावीच्या कुंभारवाडयाचे वैशिष्टे म्हणजे येथे बनवली जाणारी प्रांतवार मातीची भांडी. विविध प्रांतांचे कारागीर आपापल्या प्रांतानुसार भांडी बनवतात. यासाठी वापरली जाणारी माती, भांडयाची जाडी, आकार, रंगकाम, नक्षीकाम यामध्येही बरीच विविधता दिसून येते. राजस्थान येथील भांडयाचे तोंड हे लहान व निमुळते असते. तर, उत्तर प्रदेशमधील मिरज, झज्जर या विभागातील उत्तम कलाकुसरीच्या सूरयाही येथे पाहावयास मिळतात. बेळगाव, खानापूर या ठिकाणी धान्य साठवण्यासाठी मोठ-मोठी रांजण असतात. या रांजणांच्या आकाराच्या पणत्या व दिवेही येथे बनवले जातात. तर दिल्ली, जयपूर येथे निळ्या रंगाचा वापर करून अतिशय सुंदर व आकर्षक भांडी बनवली जातात.

या पणत्या गेरुच्या घट्ट रंगात भिजवून, सुकल्यानंतर विक्रीसाठी ठेवल्या जातात. कुंभारवाडय़ात या पणत्या अगदी स्वस्त दरात मिळतात. बाजारात ज्या पणत्या 10 रुपयांना तीन किंवा 4 विकल्या जातात. त्या पणत्या कुंभारवाडय़ातून खरेदी केल्यास 100 रुपयांना 90 पणत्या सहज मिळतात. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील स्थानिक छोटे व्यापारी कुंभारवाडय़ातून मोठय़ा संख्येने पणत्यांची खरेदी करतात.

धारावीतील दिवे केवळ मुंबईच नाही तर परदेशात पोहोचले आहेत. दिवाळीला एक महिना असतानाच हे दिवे अमेरिका, युरोप, दुबई आणि अन्य देशांत रवाना झाले. तर पंधरा दिवस आधी राज्यातील विविध भागांतील किरकोळ विक्रेते येऊन पणत्या घेऊन गेले.

लाल मातीच्या साध्या पणत्या 100 रुपयांना 100 तर नक्षीकाम केलेल्या 150 ते 200 रुपयांना शंभर अशा दरात उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी, कलाकुसर केलेली पणती प्रतिनग 5 ते 20 रुपयांच्या दरम्यान आहेत. दिव्यांची दीपमाळ, विविध प्राण्यांच्या आकाराच्या पणत्या 100 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

हजारो दिवे, पणत्या रंगवून होल सेल व रिटेलमध्ये विकली जातात; पण म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नाही; पण हे लोक आपल्या पूर्वजांनी चालू केलेले कार्य बंद पडू नयेत, याकरिता पोटाला चिमटा घेऊन हे काम करीत आहेत. तयार केलेले दिवे, पणत्या मुंबईतील इतर भागांत विकतात. जर हा माल नेताना काही अपघात झाला, तर ते नुकसान त्यांच्या डोक्यावर येते व सर्व मेहनतीवर पाणी फिरते. या वस्तीत तरुण मुले- मुली शाळा, कॉलेज शिकत घरच्या कामाला मदत करतात. या कामातून जगण्यापुरता पैसा मिळतो. यामुळे पूर्ण कुटुंब मिळून हे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने काम करतात.