पंकजा मुंडेंना डावलून विधानपरिषदेवर संधी देण्यात आलेल्या उमा खापरे कोण आहेत ?

भाजपच्या अंतर्गत कुरघोडी की नवीन चेहऱ्यांना संधी? आधी भागवत कराड आता उमा खापरे….

शमिभा पाटील / ०८ जून २०२२

महाराष्ट्राच्या ओबीसी राजकारणातील महत्वाचा चेहरा असणाऱ्या पंकजा मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारा एक निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना भारतीय जनता पक्ष संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण पंकजा मुंडेंना दरवेळी डावलून भाजप त्यांच्याच जातसमूहातील किंवा समर्थक गटातील इतरांना मोठे करू पाहत आहे की काय असा प्रश्न राजकीय विश्लेषक विचारु लागले आहेत. २० जूनला राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे यावेळी भाजपने आपले एकूण पाच उमेदवार जाहीर केले आहेत या पाचही जणांमध्ये पंकजा मुंडेंचं नाव नाही पण त्यांच्या समर्थक समजल्या जाणाऱ्या उमा खापरे यांचं नाव मात्र यामध्ये आहे.

श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या दोन नव्या चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर कोण आहेत या उमा खापरे पाहुयात…

उमा खापरे या पिंपरी चिंचवडच्या असून त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. आक्रमक पदाधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत भाजपने त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. उमा खापरे या मुंडे गटातील नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
उमा खापरे या भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग दोन वेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केले आहे. 2001-2002 मध्ये पिंपरी चिंचवड पालिकेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या.

महिला मोर्चा प्रदेश सचिव पदासह त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. 2000 ते 2002 भाजप महिला मोर्चा सचिव तर 2002 ते 20011 तीन टर्म भाजप महिला मोर्चा सरचिटणीस होत्या. 2017 ते 2020 या काळात त्या सोलापूरच्या प्रभारी होत्या.

योगींचा प्रचार ते दिपाली सय्यद यांच्यावरील टीका

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अन्य राज्यांमध्ये प्रचारासाठी पाठवणे ही भाजपाची कार्यपद्धत आहे. मार्चमध्ये झालेल्या उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमा खापरे या उत्तरप्रदेशमध्ये गेल्या होत्या. उत्तरप्रदेशमधील महिला मतदारांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी गोरखपूर आणि लगतचा परिसर पिंजून काढला. दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं.

भाजपाने संधी देण्यामागची तीन कारणे

एक पक्षनिष्ठा दुसरे ओबीसी समीकरण आणि तिसरे उमा खापरेंचे महिला असणे या तीन कारणांमुळेच भाजपाने उमा खापरे यांना संधी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here