फुड मॉल पेक्षा जागोजागी ट्रॉमाकेअर सुरू करा…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे ठरतोय मृत्यूचा सापळा

  • टीम बाईमाणूस

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या निधनानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर (द्रुतगती मार्ग) गेल्या दीड वर्षात तीनशे अपघातांमध्ये 125 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 211 जण गंभीर जखमी झाले आहेत. या वर्षी गेल्या सहा महिन्यांत प्राणांतिक अपघातांचे प्रमाण घटले असले, तरी गंभीर जखमी होणाऱ्या अपघातांमध्ये 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई-पुणे प्रवास हा जलद आणि सुरक्षित व्हावा या उद्देशाने एक्स्प्रेस-वे बांधण्यात आला. पण, गेल्या काही वर्षांत एक्स्प्रेस-वेवर भरधाव वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी महामार्गावर ट्रॉमाकेअर रुग्णालय सुरु करण्यापासून ते हवाई रुग्णवाहिका सेवा देण्याबाबतचे मुद्दे उपस्थित झाले आहेत. मात्र राज्य सरकारने आजपर्यंत याबाबत सुस्पष्ट धोरण निश्चित करून रस्ते अपघातातील रुग्णोपचारासाठी हवाई रुग्णवाहिकेबाबचे साधे धोरणही निश्चित केलेले नाही. रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच ट्रॉमाकेअर रुग्णालय सुरु करण्याबाबतचे धोरण केंद्र सरकारने तयार केले असून यातील रस्ते अपघात टाळण्यासाठीच्या अनेक उपाययोजना राज्य शासनाने केल्या असल्या तरी टर्शरी ट्रॉमाकेअर रुग्णालय सुरु करण्याबाबत राज्य शासन उदासीन राहिल्याने तसेच आरोग्य विभागाला यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न करून दिल्यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांसाठीचे टर्शरी ट्रॉमाकेअर रुग्णालय खर्या अर्थाने आरोग्य विभाग अद्यापि सुरु करू शकलेले नाहीत. सुसज्ज ट्रॉमाकेअर सेंटर सुरु करावयाचे असल्यास येणारा किमान 15 कोटींचा खर्च लक्षात घेता तसेच केंद्र सरकारचे या बाबतचे धोरण व निकष लक्षात घेता हवाई रुग्णसेवा जास्त उपयुक्त व कमी खर्चाची ठरेल हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाअंतर्गत याविषयी अनेकवेळा चर्चा होऊन प्रस्ताव तयार करण्याचे ठरले होते. मात्र निधी अभावी असा ठोस प्रस्ताव आजपर्यंत तयार केला गेला नाही.

हवाई धोरण अद्याप कागदावरच

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाल्यास गंभीर रुग्णाला पनवेल वा पुणे येथील रुग्णालयातच न्यावे लागते हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने भाड्याच्या हवाई रुग्णसेवेच्या पर्यायाचाही विचार केला होता. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गंभीर रुग्णांवर प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणारी रुग्णालये वा खाजगी मोठ्या रुग्णालयातच उपचार होऊ शकतो. राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच अपघातग्रस्त जागा यांचा विचार करता हवाई रुग्णसेवा हाच प्रभावी विचार ठरू शकतो. जागोजागी ट्रॉमाकेअर सेंटर काढणे व चालवणे हे अत्यंत खार्चिक असून प्राथमिक उपचार आरोग्य विभागाच्या कोणत्याही रुग्णालयात करता येतील. मात्र अपघातात मेंदूला इजा होणे, रक्तस्राव होणे, हाड मोडण्यासह गंभीर दुखापती होतात अशा रुग्णांसाठी तात्काळ उपचार मिळणे गरजेचे असून यासाठी किमान आतातरी राज्य सरकारने तात्काळ हवाई रुग्णसेवेचे धोरण निश्चित करून अंमलबजावणी केली पाहिजे असे, आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे

अपघाताची काही मुख्य कारणे

  • भरधाव वेगात वाहन चालविणे (ओव्हरस्पीडींग)
  • अचानक मार्गिका बदलणे (लेन कटिंग)
  • सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे
  • ड्रायव्हरला आलेला थकवा
  • इमर्जन्सी किंवा ब्रेकडाऊनमुळे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवणे
  • रात्रीचा प्रवास – 54 टक्के अपघात हे मध्यरात्रीपासून सकाळी 9 पर्यंतच्या वेळेत घडतात.
  • ट्रकसारख्या अवजड वाहनांच्या चालकांकडून होणारं उल्लंघन आणि वाहनं ओव्हरलोड असण्यामुळेही अनेकदा अपघात घडत असल्याची तक्रार वारंवार केली जाते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here