ती एक दिशा आहे ‘जगण्याची!’

ती एक परिपूर्ण मानव… ती एक सक्षम जाणीव… तमाम वंचितांची आशा. दाही दिशा घुमवणारी ती अकरावी दिशा…! बहुलिंगी समाजाची प्रतिनिधी म्हणून ‘दिशा पिंकी शेख’ हे नाव आज समाज माध्यमांतून गाजतं आहे. तृतीय पंथीयांचं जीवन कसं आहे, त्यांच्या समस्या काय आहेत.. त्यांच्या जगण्याचा संघर्ष काय आहे, यासाठी तिचा लढा सुरू आहे आणि अखंड सुरू राहणार आहे. आज (७ मे) दिशाचा जन्मदिवस. ‘बाईमाणूस’तर्फे आघाडीच्या कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

खरं तर जगाला दहाच दिशा माहिती आहेत. मात्र ही ‘अकरावी दिशा’! ‘दिशा पिंकी शेख’ या नावाचं रहस्यही यातच दडलयं. बहुलिंगी समाजाची प्रतिनिधी दिशा आज तृतीय पंथीयांच्या समस्यांसाठी लढते आहे. ‘जेंडर’ लोकांना कळावेत, त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी दिशाचे प्रयत्न आहेत.
दिशाचे जन्मगाव ‘येवला’ आहे, तर सध्या वास्तव्य श्रीरामपूरला आहे. एकदा कामानिमित्त फिरत असताना एका बोर्डवर ‘अकरावी दिशा’ हे नाव दिसलं. यावेळी स्वत:चा शोध घेताना सापडलेलं ‘दिशा’ हे नाव आज तिची ओळख बनलं आहे, तर ‘पिंकी शेख’ हे तिच्या गुरूचं नाव. तृतीय पंथीयांच्या लढय़ासाठी, त्यांच्या माणूसपणासाठी ‘दिशा पिंकी शेख’ हे नाव पुढे आलं आहे. पूर्वापार चालत आलेली तृतीय पंथीयांच्या संघर्षाची कहाणी आज ‘दिशा’च्या रूपाने त्यांच्या समस्यांना वाचा फोडू पाहणारी आहे. पूर्णत्वाची वाट धुंडाळणारी आहे.
ती एक दिशा आहे ‘जगण्याची!’ बहुलिंगी समाजाची प्रतिनिधी म्हणून ‘दिशा पिंकी शेख’ हे नाव आज समाज माध्यमांतून गाजतं आहे. तृतीय पंथीयांचं जीवन कसं आहे, त्यांच्या समस्या काय आहेत.. त्यांच्या जगण्याचा संघर्ष काय आहे, यासाठी तिचा लढा सुरू आहे आणि अखंड सुरू राहणार आहे. दिशा पिंकी शेख हे नाव आज सभा-समारंभात, सोशल मीडिया, साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन सोहळा, कविसंमेलन, लेक्चरर आणि लेखणीच्या माध्यमातून लढत आहे, संघर्षातून पुढे येत आहे, ते तृतीय पंथीयांच्या ‘माणूसपणासाठी.’

दिशा एक उत्तम कवयित्री आहे. अलीकडेच दिशा पिंकी शेख यांचा ‘ कुरुप’ हा पहिला काव्यसंग्रह मुंबईच्या नामांकित शब्द प्रकाशनाने जागतिक स्त्री मुक्ती दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केला आहे. पार लिंगी समूहाचे दुःख मांडणारा भारतातील पहिला काव्यसंग्रह म्हणून या काव्यसंग्रहाचे महत्त्व आगळेवेगळे आहे. साहित्याचं अंग तिच्या लेखणीतून फुलारतं आहे. तृतीय पंथीयांच्या समस्या मांडण्यासाठी उचललेली तिची लेखणी आज सभा-समारंभ, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख घडविणारी ठरली अहे. dhonda.in या पोर्टलच्या माध्यमातून तसंच LGBT कम्युनिटीद्वारे दिशाने आपलं पाऊल सकारात्मकतेसाठी उचललं आहे. ते निश्चितच परिवर्तनात्मक आहे. तृतीय पंथीयांच्या व्यथा मांडताना दिशा म्हणते, आजही समाजात पुरुष स्त्रीला कमी लेखतात, तर स्त्री वर्गाच्या खालोखाल तृतीय पंथीयांकडे वेगळ्या नजरेने, तुच्छतेच्या दृष्टीने पाहिलं जातं यासारखी विषमता नाही. लोकांना ‘जेंडर’ माहीत नाहीत. समाज त्यांच्या व्यथा जाणत नाही. त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले गेले पाहिजे.
रेल्वे स्टेशननजीक हिरकणी कक्ष असतात. हिरकणी कक्षाची गरज का पडते? समाजामध्ये आई-बाळाचं नातं पूजनीय मानलं जातं. अशा ठिकाणी आई-बाळाला स्तनपान करत असेल तर तिथे पुरुषांची नजर का पडते? त्या आईला असुरक्षित वाटते. कारण आज मानसिकताच तशी आहे. आपली लेखणी समाजातील संघर्षाचं साधन आहे. ते ‘साहित्य’ आहे हे लोकांनी नंतर ठरवलं, पण लेखन हे त्याआधी आपल्या आयुष्यातील अभिव्यक्तीचं साधन असल्याचं दिशाने सांगितलं.

बहुलिंगी समाजाची प्रतिनिधी म्हणून ‘दिशा पिंकी शेख’ हे नाव आज समाज माध्यमांतून गाजतं आहे. तृतीय पंथीयांचं जीवन कसं आहे, त्यांच्या समस्या काय आहेत.. त्यांच्या जगण्याचा संघर्ष काय आहे, यासाठी तिचा लढा सुरू आहे

आपल्या साहित्याविषयी सांगताना दिशा म्हणते, ‘आपण जे लेखन करतो, त्याला ‘साहित्य’ म्हणतात, ते फार उशिरा कळलं. आपल्या मनातलं, आनंदाचं, दु:खाचं, मनात सलणारं जे काही ते लेखणीच्या रूपाने पुढे आलं, कवितेच्या, लेखाच्या रूपाने चितारलं, पण ते ‘साहित्य’ आहे ते लोकांनी ठरवलं. यातूनच वर्तमानपत्रांसाठी स्तंभलेखन, वेबसाठी लिहिलं, खासकरून तृतीय पंथीयांच्या व्यथा, समस्या कुणाला दिसत नाहीत. प्रत्येक माणसाला भूक असते, प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा असतात. त्या भागविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. समाजात माणसांबरोबर उभं राहण्यासाठी झगडावं लागतं. त्यांनी माणूसपण कसं सिद्ध करावं! कारण माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलंच जात नाही. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तृतीय पंथीय म्हटले की त्यांना टाळले जाते, त्यांना बघून दरवाजा बंद केला जातो. ट्रेनमध्ये, रस्त्यावर दिसले तर मार्ग बदलला जातो. सिग्नलला हायवेवर गाडय़ांच्या काचा बंद केल्या जातात. माणसं त्यांच्यापासून दूर राहतात. समाजाकडूनच नाही तर कुटुंबाकडूनही त्यांची अवहेलना केली जाते. अतिशय हीन वागणूक त्यांना मिळते अशावेळी वाटय़ाला येणारा संघर्ष हा आयुष्यभरासाठीचा संघर्ष असतो. यासाठी समाजकार्याच्या माध्यमातून लोकांना ‘जेंडर’ समजून सांगणं, त्यासाठी लेक्चरच्या माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू अहेत, असे दिशाने सांगितले. dhonda.in या पोर्टलमध्ये आपले काम सुरू असून समाजकार्य करताना साहित्याचं माध्यमही उपयुक्त ठरतं असं ती म्हणाली.

मेल – फीमेल व्यतिरिक्तही समाजात वावरणारा घटक आहे. त्यांनाही मन आहे. तृतीय पंथीय म्हणून त्यांच्याकडे तुच्छतेने पाहण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे. ‘जेंडर’ प्रश्नांना वाचा फोडण्याची गरज आहे. पुस्तकांच्या रूपाने, व्याख्यानांच्या रूपाने कधी चर्चेच्या माध्यमातून ते पुढे येण्याची गरज आहे.
दिशा म्हणते, ‘आजच्या नव्या पिढीला याचे ज्ञान देणे गरजेचे आहे. एलजीबीटीक्यू कम्युनिटी समजून सांगितली गेली पाहिजे. अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ‘तृतीय पंथीयांच्या‘ जीवनाचा विषय पुढे आला पाहिजे. शालेय पातळीवर आज तृतीय पंथीयांवर एकही अभ्यासक्रमात धडा नाही. त्यांच्या जीवनाची संघर्षमय कहाणी मांडली गेली पाहिजे. ‘तृतीय पंथीयांबद्दल आज समाजात असणारे गैरसमज दूर झाले पाहिजेत. मुलांच्या, महिलांच्या मनात त्यांच्याविषयी असणारी भीती दूर झाली पाहिजे. शिक्षणात एक धडा हवा! अशी विनंतीच दिशाने बोलताना व्यक्त केली.

दिशा पिंकी शेख आज तृतीय पंथीयांच्या समस्यांसाठी, संघर्षासाठी लढत आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम, समारंभातून सहभागही घेतला आहे.अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा, सावित्रीबाई फुले संमेलनाच्या अध्यक्षा, पुणे शाखा, पहिलं विद्रोही साहित्य संमेलन-कविसंमेलनाची अध्यक्षा तसेच नुकतंच कणकवली येथे पार पडलेल्या ‘ऐलमा पैलमा’ कार्यक्रमातील दिशाच्या हस्ते पार पडलेला पुस्तक प्रकाशन सोहळा असो. दिशा आज ‘तृतीय पंथीयांच्या समस्यांसाठी, त्यांच्या जगण्यासाठी आणि माणूसपणासाठी लढते आहे आणि संघर्षातून नवी दिशा समाजमनात रुजवते आहे.
————–

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here