‘आपले गुरुजी’ झाले नाराज…

शिक्षकांचा फोटो वर्गात लावण्याच्या शासनाच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध

  • टीम बाईमाणूस

राज्य शासनाचे ‘आपले गुरुजी’ हे अभियान आणि या हास्यास्पद अभियानाला राज्यातील शिक्षक संघटनांनी केलेला विरोध यावरून आता वाद पेटायला सुरूवात झाली आहे. हे असले तुघलकी निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांची 25 हजार रिक्त पदे भरा अशी मागणी शिक्षण वर्तुळातून पुढे येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांची माहिती आणि त्यांच्याविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी ‘आपले गुरुजी’ उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो वर्गखोल्यांमध्ये दर्शनी भागात लावण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण उपसंचालकांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे फर्मान शिक्षणाधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा अजब गजब निर्णय घेतल्याने या निर्णयामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षकांचे फोटो का आणि कशासाठी लावावे, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘हा’ निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शाळेत न जाताच सरकारचा पगार घेऊन कामावर दांडी मारणाऱ्या शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सरकारने आता कंबर कसलीये. यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकाचे फोटो लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. सरकारी शाळामंधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम मात्र दुसऱ्याचे असे करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक शाळेकडे फिरकतच नसल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करीत सरकारकडून मात्र चांगला पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे या शिक्षकांना शिस्त लागण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे आपल्यासाठी सरकारने कोणते शिक्षक नियुक्त केलेत, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांनासुद्धा चाप लागणार आहे.

सगळ्या शिक्षकांना वेठीला का धरता?

शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टद्वारे एक परिपत्रक शेअर केलं आहे. यापरिपत्रकानुसार सरकारकडून वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फेसबुक पोस्टमध्ये हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, “यापूर्वीही यावर मी पोस्ट लिहिली होती. आता तो आदेश आला आहे. काही शिक्षक त्यांच्या जागी दुसरे शिक्षक नेमतात आणि स्वतः पगार घेऊन बाहेर फिरतात. विद्यार्थ्यांना आपले खरे शिक्षक कोणते आणि बनावट कोणते हे समजावं म्हणून मूळ शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे आदेश दिले गेले आहेत. हे हास्यास्पद आणि संतापजनक आहे. फारतर अर्धा टक्के, असे प्रकार होत असताना सगळ्या शिक्षकांना वेठीला धरणं आक्षेपार्ह आहे आणि समजा मुलांनी फोटोपेक्षा वेगळे शिक्षक ओळखले, तर ती लहान मुलं काय करणार आहेत? पोलीस स्टेशनला जाणार आहेत का? शिक्षण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पाहणी करणारी यंत्रणा असताना, असे शिक्षक नेमले जातात आणि त्यांना पकडून देण्याचं काम त्या लहान मुलांनी करायचं आहे. एसटी स्टँडवर चोरांचे आणि वर्गात सरांचे फोटो लावायचे आहेत. लहान मुलांना भ्रष्टाचार पकडून देण्याचं प्रशिक्षण देणारं शासन नक्कीच थोर आणि दूरदृष्टीचं आहे.” 

परिपत्रक मागे घ्या, अन्यथा आंदोलन

सरकारकडून काढण्यात आलेल्या ‘आपले गुरुजी’ परिपत्रकाबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी म्हटलं की, ‘शिक्षण खात्यानं आपल्या गुरुजी परिपत्रकाच्या माध्यमातून शिक्षकांचा सन्मान नाही, तर अवमान केला आहे. सदर परिपत्रक लवकरच मागे घ्या, अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही‘, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा परिपत्रकाला तीव्र विरोध आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. दरम्यान, सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानंतर शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. या परिपत्रकावर शिक्षकांनीही आक्षेप नोंदवला आहे. परिपत्रक मागे घ्या नाहीतर आंदोलन करु असा इशाराही शिक्षण संघटनांकडून देण्यात आला आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे. असा निर्णय देण्यापेक्षा शिक्षकांची 25 हजार रिक्त पदे भरा अशी मागणी केली जात आहे. तसेच निर्णयाच्या विरोधात अनेक शिक्षक काळ्या फिती बांधून काम करणार आहेत.

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा भरून, मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी, शिक्षकांचे फोटो वर्गांमध्ये लावून राज्य सरकारला काय साध्य करायचे आहे,’ असा सवाल शिक्षकांनी उपस्थित करून या निर्णयाला विरोध केला आहे. ‘राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्त करून, त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून द्या,’ अशी मागणीही शिक्षकांकडून करण्यात येत आहे. शिक्षकांनी वर्गात फोटो लावण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने दिला आहे.

शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामासाठी आणि प्रशिक्षणात गुंतवून ठेवणे बंद करणे गरजेचे आहे. वर्गात फोटो लावून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी जिव्हाळा निर्माण होईल, असा विचार करणे अनाकलनीय आहे. शिक्षकाला विद्यार्थ्यासोबत दिवसभर राहू द्या. वर्गात होणाऱ्या शैक्षणिक देवाण-घेवाणच्या प्रक्रियेतून आपोआप जिव्हाळा निर्माण होईल. त्यासाठी प्रतिकात्मक फोटोच्या कोणत्याही कृत्रिमतेची गरज नाही.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here