मानवतेकडे वाटचाल करणाऱ्या जोडप्यांची ईद

दोन भिन्न धर्मीय व्यक्ती विवाहबंधनात अडकतात. आयुष्यभराच्या सहजीवनाची, सोबतीची आस धरतात तेव्हाही उन्नीसबीस होतच असणार, पण आणि म्हणूनच अशा आंतरधर्मीय लोकांच्या घरात साजर्‍या होणार्‍या उत्सवांचा, सणांविषयी आपल्याला कुतूहल वाटणं, आकर्षण वाटणं साहजिक आहे. ईदच्या निमित्तानं ईद वा कुठल्याही सणांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, धर्माची बंधंनं तोडून पुढं येताना त्याच धर्मांतून येणार्‍या या धार्मिक उत्सवांकडे ते कसे पाहतात, हे पाहणं संयुक्तिक वाटलं. मानवतेकडं वाटचाल करणार्‍या या जोडप्यांनी धार्मिक सणांना एक वेगळाच सांस्कृतिक चेहरा देण्याचे त्यांचे प्रयत्न जाणवत राहिले...

संकलन आणि शब्दांकन : हिनाकौसर खान-पिंजार

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. व्रतवैकल्ये, सणवार, उत्सव, रीतभात, परंपरांच्या झुल्यात झुलत रहायला बहुतांश भारतीयांना प्रचंड आवडतं. धर्मचिकित्साची छुपी वा खुली मोकळीक असणार्‍या घरांमध्येही साग्रसंगीतसणउत्सव साजरे होतात. लग्नसमारंभांचही तेच. सामाजिक-सांस्कृतिक-वैज्ञानिक आणि लैंगिक दृष्टिकोनापेक्षाही धार्मिक दृष्टिकोनातून विधिवत लग्न समारंभ केले जातात. त्यातही प्रत्येक घराच्या, समूहांच्या, जातींच्या, जातींमधल्याही भौगोलिक ठिकाणांच्या अशा कितीतरी परिप्रेक्ष्यातून परंपरा आणि रीतींची मुळं घट्ट रूतलेली असतात. प्रत्येक घराची आपली म्हणून एक संस्कृती. आपला एक धर्म. एकाच खानदानातल्या भावा-भावांच्या घरातल्या संस्कार-संस्कृतीतही आपल्याला कित्येकदा फरक दिसतो. खाण्यापिण्यापासून-वस्त्रांपर्यंत भिन्नता असते. ही एकाच घरातल्या दोन भावांची तर्‍हा.  तिथं दोन भिन्न धर्मीय व्यक्ती एकत्र येतात तेव्हा काय? 

धर्माची अडचण होत नसणार कारण अर्थात अशी जोडपी प्रेमातून सहजीवनाकडे निघालेली असतात. पण सवयींचा प्रश्न असतोच. खाण्यापिण्या-राहण्यावागण्या सगळ्यांच्या सवयीचा प्रश्न असतोच. त्यामुळं काहीप्रमाणात धार्मिक-सांस्कृतिक धडका बसतच असणार. खरं पाहता, एकाच धर्मातल्या वा जातीतल्या दोन भिन्न व्यक्तींनाही हाच नियम लागू असतो.

सौहार्दाची ईद (आरजू तांबोळी, विशाल विमल)

घरात दोघंही घरात कुठल्याही धर्माचं कोणत्याही प्रकारचं कर्मकांड करत नाहीत. तसा आमचा तो अलिखित करारच आहे. परंतु ज्या सणउत्सवांमध्ये धार्मिक सौहार्द आहे आणि ज्यांची सांस्कृतिक मूल्य जोपासली जातात असे सण आम्ही साजरे करतो. सण साजरा करताना सणांना असणारी धार्मिक चौकट वगळून त्याऐवजी सणांमध्ये दडलेली खाद्यसंस्कृती, वेशभूषा संस्कृती आणि निखळ आनंदाची संस्कृतीं जपण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही लग्नानंतर जाणीवपूर्वक काही सण साजरे करायला लागलो. त्यात दिवाळीतला बळीराजाचा महोत्सव, ईद आणि वारी अशा सणांचा समावेश आहे. अर्थात दिवाळी असो ईद असो की वारी आमचा या सणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि ती साजरा करण्याची भूमिका सारखीच आहे. दिवाळीच्यावेळेस आम्ही दोघंही पुणे जिल्ह्यातल्या मंचर तालुक्यातल्या पिंपळगाव या आमच्या गावी जातो. फराळ बनवणे, नवीन कपडे घालणे अशा सगळ्या उपक्रमांत आम्ही सहभागी असतो. ईदच्यावेळेस आमच्या गावाकडची मंडळी, आमचे पुण्यातले मित्र-मैत्रिणी आमच्या घरी येतात. गावाकडून केवळ माझे कुटुंबियच नव्हे तर इतर नातेवाईकही येतात.

ईदची तयारीही दोन तीन दिवस आधीपासून सुरू करतो. सुकामेवा आणणे, भिजवणे आणि कापाकापी ही कामं आम्ही दोघंही मिळून करतो. आमच्यासोबत अर्शल हा आमचा छोटुकलाही सहभागी होतो. त्याच्या लुडबुडीमळे आम्हालाही मजा येते. आम्ही ईदच्या तयारीही आनंद घेत करतो. काही वेळा आमचे जवळचे मित्र-मैत्रिणी या कामी मदत करायला येतात. त्यानिमित्ताने गप्पा होता. ईदच्या दिवशी तर कर्मकांडांला फाटा असतो. गावाकडची मंडळी, मित्र-मैत्रिणी असं हसत खेळत मजा करत आम्ही शिरकुर्म्याचा आनंद घेतो. यानिमित्ताने अर्शलवरही सर्वधर्मीय बंधुत्वाचा संस्कार घडतो. तो आता या लहानवयातच घरात सर्वधर्मीय व्यक्तींची ये जा बघतो. मजेत, गप्पागोष्टी करताना पाहतो तर त्याच्या वाढीच्या दृष्टीनंही आम्हाला आमचं घरातलं हे वातावरणं फारच आनंददायी वाटतं. शिवाय गावाकडून न येऊ शकणार्‍या मंडळींना आम्ही डबा पाठवून देतो तर आरजूच्या ऑफिसमध्ये हसत-खेळत मजा घेत शिरकुर्म्याचा आस्वाद घेणं सुरू असतं. ऑफिसमधल्या सर्व सहकाऱ्यांना ईदच्या दिवशी घरी येणं शक्य नसतं. अशावेळी पुन्हा एकदा शिरकुर्म्याचा बेत बनतो. त्यावेळेस हमखास मदतीला मित्रमैत्रिणी असतात. तो शिरकुर्मा डब्यातून ऑफिसमध्ये जातो. त्यामुळं तेव्हा परत एकदा ईदचा आनंद मिळतो. हा आनंद सौहार्दाचा, सलोख्याचा असतो.

रमजान महिन्यात जकात देणे म्हणजेच आपल्या कमाईतील काही भाग गोरगरिबांना देणे या गोष्टी अनिवार्य मानल्या आहेत. कर्तव्यच. जेणेकरून गोरगरिबांनाही आनंदाने ईद साजरी करता यावी, हा हेतू. आम्ही रमजान महिन्यासाठी असं विशेष काही करत नाही मात्र वर्षभरच आम्ही आमच्या कमाईतून काही ना काही हिस्सा कुठल्या ना कुठल्या समाजकार्यासाठी देत असतो. अनेकदा समाजाच्या कार्यासाठी वेळही देतो. उद्बोधक कार्यक्रमाची सामाजिक-आर्थिक जबाबदारी पेलतो. विशिष्ट महिन्यासाठी न करता संपूर्ण वर्षभरच आपल्या हातून चांगलं काही घडावं यासाठी आम्ही धडपडत असतो, हेही या निमित्तानं नमूद करावंसं वाटलं.

सर्वधर्मसमभावाची ईद (मुमताज शेख, राहुल गवारे)

आमच्या घरी रमजान ईद, दिवाळी, ख्रिसमस असे सर्व सण साजरे होतात. सणांवरून धर्माची ओळख व्हावी, सणांमुळे हा आमचा सण तो तुमचा सण असा भेदाभेद रूजावा, हे काही आम्हाला मान्य नव्हतं. आपल्या मुलांना सर्व सणांचा आनंद घेता यावा आणि सणांचा धार्मिक अंग पुसला जावा असं आम्हांला वाटतं. त्यामुळं आम्ही घरात एकच एक सण साजरा करत नाही. मुस्कान सात वर्षांची होती, तेव्हा तिनं घरात गणपती बसवण्याचा हट्ट केला. मी तर मुस्लिम वस्तीत राहत होते. तेव्हा वैचारिक दृष्टिकोनही आकारास आला नव्हता किंवा संविधानिक मूल्यं यांची जाणही पुरेशी नव्हती. त्यावेळेस आपल्या मुलीच्या आनंदासाठी गणपतीसुद्धा घरात बसवला होता. आणि आता तर अगदी जाणीवपूर्वक या गोष्टी मी आणि राहूल करतो. 

मुलांना आपण आनंद देत राहावा, वेगवेगळ्या सांस्कृतिक गोष्टींची ओळख करून द्यावी, आपल्याकडच्या या भौगोलिक-भाषिक संस्कृतींची माहिती व्हावी असं आम्हा दोघांनाही मनापासून वाटतं. पुढे मुलं मोठी झाली की त्यांना कुठला धर्म स्वीकारण्याची अगर नाकारण्याची किंवा त्यांच्या तर्‍हेनं त्यातून काहीकाही वेचून घेण्याची मुभा राहीलच. त्यांच्यावर कुठल्याही गोष्टींची जबरदस्ती करायची नाही, हे ठरलेलं आहेच. त्यामुळं ईदसाठी देखील आमच्याकडे भरपूर उत्साह असतो. माझा सांभाळ करणार्‍या मामा-मामींकडे रमजानच्या महिनाभर सेहरी-इफ्तारीची चांगली तयारी असते. मुस्कान आणि कबीर दोघांनाही त्याचा आनंद घेता येतो. कबीरने तर काहीवेळा रोजाही ठेवला होता. आम्ही कुणीही त्याला तसं करण्यास सांगत नाही. मुलांना ते आवडतं, ते करतात. आम्ही सोबत असतो, त्यांच्या निर्णयात. अलिकडं आमच्या घरी नेहा म्हणून माझी एक मानसकन्या राहण्यास आली आहे. तिच्या घरचं वळण फार धार्मिक आहे. ती रहायला आल्यापासून आम्ही तिला तिच्या आईवडिलांची आठवण येऊ नये म्हणून तर अलिकडं रमजानच्या महिन्यात बऱ्याच गोष्टी करतो. ईदसाठी म्हणून नवेकपडे नव्या चीजा घेतल्या जातातच. 

मला स्वत:ला वैयक्तिक बाकी कुठल्याही सणापेक्षा आणि खाद्यपदार्थांपेक्षा शिरकुर्मा बनवायला आणि तो खाऊ घालायला फार आवडतो. ईदच्या दिवशी शिरकुर्मा बनवण्याचं काम मी फार मन लावून करते. त्यासाठीची तयारीही आधी आम्ही सोबतीनं मिळून मिसळून करतो. शिरकुर्म्याच्या जोडीला आम्ही गुलगुलेही लागतात. ते माझ्या मामीच्या घरून येतात. मागच्या वर्षी मुस्कानने बनवण्याचा प्रयत्न केला होता. मग हा शिरकुर्मा, गुलगुल्यांना फस्त करायला आमचे मित्र परिवार आमंत्रित असतात. ते येतात. घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं. मुलांचे मित्र-मैत्रिणीही येतात. पूर्वी माझ्या सासरचं घर जवळ होतं तेव्हा सासू आणि दीर घरीच यायच्या. आता अंतरामुळं आम्ही सासरी, नणंदेकडं डबे पाठवून देतो. त्याही मुस्लिम मोहल्ल्यातच राहत असल्यानं त्यांना ईदविषयी माहीती आहेच. आमचंच काय पण इतरही शेजार्‍यांकडून त्यांना ईदसाठी निमंत्रण असतं. त्यांच्याकडूनही डबे घरात येतात. आमची ईद खुल्या हर्षोत्सवाची असते. आनंद लुटत वाटत जाण्याची असते. मैत्री, सहचराचा आनंद द्विगुणीत करणारी असते. 

(लेखक कोरो संघटनेतील कार्यकर्ते आहेत.)

 माणूसपणाची ईद (अमर हबीब-आशा अमर)

आमच्या घरात सर्व सण साजरे होतात. ईद, दिवाळी, ख्रिसमस सर्वच. आशा माझी लग्नाआधीपासूनची मैत्रीण त्यामुळं तिला ईद काय असते. शिरकुर्मा काय असतो हे माहीत होतंच. त्यामुळं उत्साहानं, हौसेनं ईद साजरी होत राहिली. मात्र ईदचे कुठले कर्मकांड होत नाही. रमजान महिना, ईद याबाबतची धार्मिक माहिती आहे. ती का साजरी केले जाते. त्यामागच्या धार्मिक धारणा, गोष्टी या माहीत आहेत मात्र त्यात आमचं कुटुंब अडकलेलं नाही. खाण्यासाठी ईद तेवढी साजरी होत राहिली. पुढे सूना आल्या. आता माझी सून तर मुस्लिमच समुदायातली आहे. त्यामुळं ती तर फार उत्साहानं रमजानची तयारी करते. शिरकुर्मा करते. मात्र माझ्यासाठी एकत्र बसून शिरकुर्माचा आनंद घेणं हीच ईद असते. माझा आणि नातवंडांचा संबंध हा असाच आहे. 

मात्र ईदच्या निमित्तानं एक वेगळीच जाणीव मला नेहमीनेहमी होत राहते. ते म्हणजे ज्या पिंजऱ्यातून मी बाहेर पडण्याचा इतक्या वर्षांपासून प्रयत्न करत आहे, लोक मात्र मला त्याच्यातच अडकवत आहेत. मी माणूसपणाकडे वाटचाल करू इच्छितो आणि लोक मला माझ्या जन्मानं मिळालेल्या धार्मिक ओळखीकडं ढकलून मोकळे होतात. ईदच्या दिवशी मला भरपूर शुभेच्छा येतात. देणारे सारे खरोखरच शुभेच्छुक आहेत मात्र पुरोगामी विचारांची धूरा सांभाळणाऱ्या या मंडळींकडून फक्त ईदच्या वेळेस शुभेच्छा येतात तेव्हा आश्चर्य वाटतं आणि धक्का बसतो. ही मंडळी मला मुसलमान म्हणूनच पाहतात. दरवेळेला जाणवतं की लोक आपल्याला तिकडंच राहा म्हणतात. तुम्ही पुरोगामी व्हा मात्र मुसलमानच रहा. 

बंडखोर मुसलमान होऊन मुसलमानांच्या नाकावर टिच्चून बोला म्हणजे बाकीचे सुखावतात, अशीच धारणा भल्याभल्यांची असते. मला केवळ बंडखोरी यापेक्षाही माणूसपणाकडची वाटचाल अधिक मोलाची, महत्त्वाची वाटते. एखादी व्यक्ती आपल्या धार्मिक ओळखीतून बाहेर पडत असेल. स्वत:ची एक स्वतंत्र व्यक्ती, माणूस म्हणून ओळख प्रस्थापित करत असेल तर त्याचं स्वागत करण्याऐवजी त्याची धार्मिक ओळख अधोरेखित करण्याचे प्रयत्नच अधिक होतात. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला माणूस म्हणून जगायचं आहे ना, बाबा. मला जगू द्या ना. मला माझ्या नातवंडासोबत खेळायचं आहे. आनंदीत रहायचं पण तसं करू दिलं जात नाही. विशिष्ट समूहाशी तुम्हाला बांधून ठेवलं जातं. सर्व समाजाचं प्रतिनिधित्व का करू दिलं जात नाही. विशिष्ट समूहापुरतं का मर्यादित करून टाकलं जातं. 

ईदच्यावेळी माझी ती अस्वस्थता अधिक असते, की मला माणूस म्हणून बघितलं जात नाहीये. मला निव्वळ माणूस म्हणून मान्यता नाहीये. आणि व्यथा ही आहे की हे कुणा कट्टरपंथीयांनी आपल्याला त्यापद्धतीनं पाहिलं किंवा शुभेच्छा दिल्या तर गोष्ट निराळी, पण जर तुम्हाला सुधाणावादी विचारांच्या माणसांनीच अशापद्धतीनं पाहिलं तर त्रास होणारच. समजा आणीबाणीच्या प्रश्नावर मी तुरूंगात गेलो तर ते नको आहे, त्यांचं म्हणणं आहे की तू ते मुसलमानांचे प्रश्न बघ. अरे नाही ना तिथं माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याला बाधा येते ना, पण मला सर्व स्तराचे प्रश्न माझे वाटतात त्याचं काय. 

मुसलमानांनी आमच्या टर्मसवर काम करावं ही मानसिकता पुरोगाम्यांमध्येही खच्चून भरलेली आहे. आपण माणूस होतोय ही धडपड लाखमोलाची आहे. बंडखोर होणं हे दुय्यम आहे. तुम्ही कुठल्या विशिष्ट घरात जन्मला आणि बंडखोर झालात हा अपघात आहे. तुमची माणूस म्हणून पुढं जाण्याचे प्रयत्न मोलाचे आहेत आणि तुम्ही जेव्हा या पाटीवरून पुढं जाता ना, तेव्हा तुम्हाला ईदही आनंदानं साजरा करता येतं. त्याच्यातला खाऊ, आनंद, एकत्र येणं, नातं जपणं आहे या सगळ्या गोष्टी आनंददायी होऊन जातात. पण तुम्ही बंडखोर होता, तेव्हा तुम्ही याच सणा-समारंभांचा तिरस्कार करता. आम्हाला हे काही नकोच, आमच्याकडे हे काही पाळतच नाही. आम्ही वेगळे आहोत हे दाखवण्याची चढाओढ लागते. पण आम्ही वेगळेच आहोत. मात्र या समाजाचे घटक आहोत माणूस आहोत, एवढंच हे महत्त्वाचं नाही का ? 

माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत एक मुस्लिमेतर माणूस होता. ईदच्या दिवशी जी कुणी मुलं त्यांना सलाम करायला जायची, त्यांना तो ‘ईदी’ म्हणून दहा पैसे द्यायचा. ज्या समाजातला मुस्लिमेतर असणारा माणूस ईदी देतो त्या समाजाचं माणूसपण शोधणं जास्त महत्त्वाचं नाही का! आपण अशा सद्भावनेच्या गोष्टी शोधून काढायला हव्यात.’

सौजन्य : नब्ज विशेषांक

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here