मी बहुलिंगी दिशा…

काळ बदलत असला तरी आजही बहुलिंगी समाजाला ठरावीक साचातच पाहिलं जातं. अरेरे! बिच्चारे! किंवा घाणेरडे, विकृत या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार होताना फार कमी दिसतो. त्यासाठी त्यांचे जगणे कळून घ्यावे लागेल.

  • दिशा पिंकी शेख

मी दिशा… सर्वसामान्यपणे हिजडा म्हणून ओळखली जाते. वर्तमानपत्रात तृतीयपंथी, सरकारी फॉर्मवर ‘इतर’ अशी मला नोंद करावी लागते. कुणी तरी पहिला, कुणी तरी दुसरी, मग आम्ही तिसरे, असे क्रम आपण का लावावे? स्त्री, पुरुष, आणि बाकी सारे इतर, असं का व्हावं? इतर किंवा इत्यादीला कितीसं महत्त्व देतो आपण? म्हणून बहुलिंगी हा शब्द वापरताहेत हल्ली. मलाही तो शब्द प्रभावित करून गेला. म्हणून मीही ‘हो, मी या बहुलिंगी समुदायातील एक आहे…’ अशी माझी ओळख सांगायला सुरुवात केलीय. अर्थात हा शब्द रुळायला वेळ  लागणार आहे. पण माझी ओळख ज्या नावाने व्हावी, असे मला वाटते तशी सुरुवात मीच तर केली पाहिजे, असं मला वाटतं. माझ्या एका कवितेत मी माझी ओळख करून दिली ती अशी…

भौ… फोटूवर जाऊ नगस,

म्या तुझ्या व्याख्येतली बाई न्हाय.

बहुलिंगींचा एक भाग हाय म्या.

काय म्हणतूयास?

समजलं न्हाई का तुला?

अच्छा ठिक हाय, सोप्या भाषेत सांगते.

आर… हिजडा म्हणत्यात मला.

वाईट वाटू देऊ नगस.

मलापण वाईट वाटत न्हाय…

आरे वळख हाय ती माझी.

आणि हो, खूप लवकर शाळा सोडली मी.

शाळत शिकले होते कधी,

याचाही काही पुरावा न्हाय बघ माझ्याकडं.

नकोयपण मला त्यो, कागदावरचा शिक्का.

इकत पण भेटतोय म्हणं बाजारात.

काय?

कामाइषई इचारतोयस होय…?

भिक मागते बाजारात.

देवी देवतांच्या आण पीर फकिरांच्या 

गाभाऱ्यात नाचतेसुद्धा.

का म्हणून इचारतुयास परत?

अरं पिढयानपिढया मपल्या तेच्यातच.

म्हणून मी पण तेच करते.

तू म्हणतोयस ना, तशी नोकरी पण केलीया बरका मी.

हिशोब बसला नाही बघ, आयुष्याचा.

एकटं राहा, ते पण पुरुष नावाच्या जनावरापासून 

नेहमी वाचत राहा.

त्यात नाही वाचलं की, शिकार होती बघ…

बाईला तरी बाई म्हणून सोडून देईल एकदा,

पण मला नाही सोडायचं बग हे जनावर.

त्याच्या बापाची ठिवच हाय मी.

बरं नोकरीत पगार कमी

म्हातारपण असुरक्षित 

म्हणून परत कळपात आले

अण कळपात राहायचं म्हंजी 

कळपाचे नियम पाळावे लागतात, बघ

आता जास्त ईचारू नगस बाबा

कळपाइषई तर काहीच नको

जगू दे चार दिस हितं तरी सुखानं…

असं काही होतं त्यात, तर असो. म्हणून माझ्या समुदायातील अंतर्गत संस्कृती, परंपरांविषयी लिहिताना मला मर्यादा येतील. कारण, आपल्यापर्यंत पोहोचताना मला आपल्याच माणसांपासून दूर होण्याची मुळीच इच्छा नाही. या सदरातून आपल्यासमोर माझ्या समुदायाची प्रतिनिधी म्हणून व्यक्त तर व्हायचंच आहे. पण फक्त बहुलिंगी लोकांच्या विषयावर लिहिणारी लेखिका म्हणून शिक्का नकोय मला. समाज, राजकारण, अर्थव्यवस्था, अारोग्य, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, सामाजिक जाणिवा या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर आणि माझ्या समुदायावरही परिणाम होतोच की, मग त्यावरील मतंही जनसामान्यांपर्यंत पोहोचायला हवीत, असं या क्षणी वाटतंय.

काळ बदलत असला तरी आजही बहुलिंगी समाजाला ठरावीक साचातच पाहिलं जातं. अरेरे! बिच्चारे! किंवा घाणेरडे, विकृत या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार होताना फार कमी दिसतो. त्यासाठी त्यांचे जगणे कळून घ्यावे लागेल. त्यांचे नातेसंबंध, गुरू-शिष्य परंपरेने त्यांना दिलेली नाती, त्यांच्यातली बाई, आई, प्रेयसी या अंगांबाबत भावनिक विचार व्हावा, असंही मला वाटतं. ही नाती निभावताना येणाऱ्या सामाजिक तथाकथित चौकटींच्या अडचणी तर आहेतच. एकीकडे माणूस म्हणून स्वीकारण्याचा आव आणून अन्न, वस्त्र, निवारा आणि मैथुन हे मूलभूत मानवी अधिकार या समूहाला देताना तथाकथित संस्कृतीचे पांघरूण घालून शासन आणि समाज विरोध करताना दिसतो आहे. यातून होणाऱ्या शारीरिक, भावनिक, आर्थिक शोषणाच्या प्रभावामुळे हे माणूसपण या समूहाला कितपत मिळतेय, हा मोठा प्रश्नच आहे. ‘असे म्हणजे असेच’ची व्याख्या बदलावी लागणार आहे. अशा प्रसंगी त्यांचं निखळ भावविश्वही असतं, तेही आपल्यापर्यंत पोहोचावं असं मला वाटतंय…

आपल्या सभोवतालच्या जगात लक्षावधी ‘उप’ जग आहेत. प्रत्येक उप जगाच्या सीमा या आकाशाइतक्याच अनंत आहेत. तशाच त्या माझ्या समुदायाच्या जगाला, भावविश्वालाही आहेत. या माझ्या जगाला पुढे आणण्यासाठी माझ्यासारख्या खूप साऱ्या ‘दिशा’ वेगवेगळ्या क्षेत्रांत आपआपल्या परीने लढत आहेत. त्यांचे लढे आणि यश हेदेखील पुढील लेखांंमधून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

माझ्यासोबतच्या या प्रवासात या जगाचीही जर तुम्हाला सफर करून आणता आली, तर ते माझ्या लेखणीचे मोठे यश असेल. त्यातून मला आणि माझ्यासारख्यांना पाहताना तुमच्या नजरेत माणूसपण यावं, एवढीच इच्छा आहे. व्याकरण, वाक्यरचना, लेखनशैली, आणि साऱ्या चौकटीत मी कुठे बसते माहीत नाही; पण माझ्या हातून मला मिळालेल्या या जागेचा सर्वतोपरी उपयोग व्हावा, अशी इच्छा आहे. आपण निकष लावण्यात सराईत आहोत आणि सगळ्यांच्या निकषात मी तंतोतंत बसेन, असंही नाही. तेव्हा त्या सगळ्याच गोष्टींचं भान राखत मी ही सुरुवात करतेय. लिखाणातील प्रकारांमध्ये कविता हा प्रकार मला खूप जवळचा वाटतो. कारण तोच आजपर्यंत माझा आवाज बनला आहे. कवितेत व्यक्त होताना, बाकी लेखनप्रकारांपेक्षा मला मोकळं आकाश मिळतं म्हणून त्यातून मी जास्त व्यक्त होते. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्यास कविता हे माध्यम सुलभ ठरेल, असं मला वाटतं…

मी ओबडधोबड, अडाणी वाट

माझ्या प्रत्येक वळणावर, पडलेली गाठ

तहानलेल्या हाती घेऊन कोरडा माठ

तरी चालते आहे तेजाकडे, पाहण्या पहाट…

धन्यवाद…!

—————————

संपर्क : 9922640622

disha.kene07@gmail.com

—————————

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here