बिब्बा फोडण्याचा जीवघेणा उद्योग….. रोजगारासाठी आदिवासी महिलांची जोखीम

गोडंबी हे नाव कानावर जरी पडलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत पण ह्या गोडंबी निर्मितीचा व्यवसाय कसा चालतो? सुका मेवा म्हणून आपल्या घरात येणारी गोडंबी कशी बनवली जाते? पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच सौंदर्य आणि आरोग्य धोक्यात टाकून आदिवासी महिला कसा चालवतात हा जीवघेणा व्यवसाय? एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना आजही ग्रामीण भागातील महिलांना का करावा लागतो हा व्यवसाय? याविषयीचा अधिक माहिती देणारा हा लेख.

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी महिलांना जीवघेणा बिब्बा उद्योग करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील अमानी, जऊळका, अमानवाडी, हनवतखेडा, कारली या गावात अजूनही आदिवासी महिलांना करावा लागत असलेल्या बिब्बा उद्योगामुळे जिल्हा प्रशासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून काम चालू करण्याची मागणी केली जात आहे.

वाशीम जिल्ह्यातील अमानी आणि आजूबाजूच्या इतर गावात वर्षभर बिब्बे फोडण्याचं काम चालतं. त्यातूनच या महिलांना रोजगार मिळतो. पण बिब्ब्यातून निघणाऱ्या हानिकारक तेलामुळे शरीरावर असंख्या जखमा होतात. महिलांचे चेहरे विद्रुप होतात. वयस्कर महिलांसाठी हे त्रासदायक नसलं तरी तरुण मुलींच्या भविष्यावर याचा परिणाम होतो.
गोडंबी हे नाव कानावर पडलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. बिब्ब्या पासून तयार होणारं गोडंबी हे विशेषत: हिवाळ्यात सुका मेवा म्हणून वापरले जाते. बिब्या पासून गोडंबी वेगळी करण्याचे काम अत्यंत जिकरीचं असतं. बिबा फोडत असताना त्यातून अंगावर उडणाऱ्या हानिकारक तेलामुळे अनेक महिलांना जखमा होतात.

वाशीम जिल्ह्यातील अमानी आणि आजूबाजूच्या इतर गावात वर्षभर बिब्बे फोडण्याचं काम चालतं

आज शेतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर होत असताना दुसरीकडे या महिलांना बिब्बे फोडण्याचं काम करून उदरनिर्वाह करावा लागतो. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये या गोडंबीला मोठी मागणी आहे. तसेच बिब्यांचा पुरवठा मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतून होतो. 50 रुपये किलो प्रमाणे बिब्यांची खरेदी केली जाते. हे बिब्बे फोडल्यानंतर मिळणाऱ्या गोडंबीची 500 ते 600 रुपये किलो दराने गावोगावी फिरून विक्री केली जाते. मात्र बिब्बे फोडणाऱ्या या महिलांच्या हातात सरासरी दीडशे ते दोनशे रुपये येतात. गोडंबीला वेगळे केल्यानंतर उरलेल्या टरफलातून तेल काढलं जातं. हे तेल मानवी त्वचेसाठी हानिकारक असलं तरी ऑईलपेंट निर्मितीसाठी वापरलं जातं. बिब्यातली गोडंबी काढून धनिकांची देहयष्टी सांभाळणारा येथील आदिवासी समाज मात्र बिब्याच्या तेलाने पार होरपळला आहे.

महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही एकही योजना अस्तित्वात आली नाही.त्यामुळं वाशिम जिल्ह्यात आदिवासी महिलांना रोजगारा अभावी हा जीवघेणा बिबा उद्योग करावा लागत आहे.त्यामुळं आतातरी अशा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here