निळया हाताची व्रजमूठ

एक दिवस रमेश तारीच्या वाकड्या हुकाने खडीयंत्राच्या पट्टयावर अडकलेले दगड काढत होता. अचानक हातात अडकवलेला तारेचा लोखंडी हुक खडीयंत्राच्या पट्टयांत अडकला. आपल्या हातातून लोखंडी काढण्याआधीच खडीयंत्राचा पट्टा रमेशला आत ओढू लागला. काही क्षणातच रमेशचा हात खडीयंत्राच्या पट्टयांत ओढला जाऊ लागला. तेव्हा रमेशने दुसऱ्या हातांची भक्कम मिठी खडीयंत्राच्या पट्टयाला मारली. खडीयंत्र जागेवर बंद पडलं. उसाच्या चरख्यात उस पिळत जावा तसाच रमेशचा हात पिळला गेला आणि कोपरापासून तुटून वेगळा पडला.

  • अनिल साबळे

खडी मशीनची धडधड ऐकली म्हणजे खडीच्या पट्टयातले दगड तारीच्या आकड्यांने काढता काढता हात तुटलेला रमेश गायकवाड आठवला. गरीबांच्या पोटाचं हातांशी अतूट नातं आहे. हात चालत राहिले की पोट भरत राहतं. पोट भरणारा हात तुटल्यावर जगणं कसं अवघड होऊन बसतंय, हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय.

आपल्या सायकलला पेरुचे दोन टोप बांधून रमेश दूरच्या गावात पेरु विकायला जायचा. दोन्ही हातांच्या ओंजळीत बसत नसायचा असा पेरु रमेश आपल्या हातात घेऊन आम्हाला कापून मीठ-मिरची भरुन द्यायचा. केवळ पेरु विकून आपल्या संसाराचा गाडा ओढणं असहाय्य झाल्यावर रमेशनं आपल्या बायकोसह वीटभट्टीची वाट धरली होती. एक हजार वीटा थापल्यावर रमेशला अवघे साठ रुपये मिळायचे. रात्रभर जागून दुपारी लाल वीटांच्या भिंतीआड थोडीफार झोप मिळायची. वीटभट्टीवर असं तसं एक वर्षं गेलं… अवकाळी पावसाचं वातावरण झाल्यावर कच्च्या वीटा झाकून ठेवताना वीटांची सगळी भिंतच रमेशच्या पत्नीच्या मानेवर कोसळली. आपल्या पत्नीच्या मणक्यात गॅप पडल्यावर रमेशनं वीटभट्टीवरचं काम सोडून दिलं.

पुन्हा गावाला आल्यावर जगायचं कसं हा प्रश्न रमेशच्या पुढे उभा राहिला होता. गावाजवळच्या खाणीवर अनेक माणसं कामाला जात होती. खाणीवर आपल्याला काहीतरी काम मिळेल, ह्या आशेनं रमेश खाणीवर काम मागण्यासाठी गेला. रमेशला खाणीवर काम मिळाले… सुंरुग लावून फोडलेले दगड खडीयंत्रात बारीक खडी होऊपर्यंत दळले जायचे. ते दगड दळले जात असताना काही मोठे दगड बाजूला उडून फिरणाऱ्या पट्टयांत पडायचे. काही दगड हाताने उचलून खडीयंत्रात टाकायचे, तर काही बारीक दगड तारीच्या आकड्यांने बाहेर ओढायचे.

खडीयंत्रात दगड दळणाऱ्या मुलांची विजार खडीच्या यंत्रात अडकली तेव्हा तो मुलगा डोक्यावरच्या लोखंडी दांडयाला धरुन जीवाच्या आंकाताने ओरडला. त्या मुलांची खडीयंत्रात गुंतलेली विजार पायातलं कातडं सोलत सोलत कमरेपर्यंत आली तेव्हा दुसऱ्या कामगाराने खडीयंत्र बंद केले. खडीयंत्रावर मृत्यूच्या जबडयांत जाऊन पुन्हा माघारी आलेली माणसं रमेशला दिसायची. त्यामुळे रमेश सांभाळून काम करत होता. पुन्हा वीटभट्टीवर कामाला जाणं तर अशक्यच होतं. कारण पत्नीच्या मानेवर वीटांची भिंत पडल्यामुळे तिला जड काम करता येत नव्हते. दिवसभर खडीयंत्राची खडखड… मोठमोठे दगड दळून त्यांची बारीक होणारी खडी… आभाळात पसरलेले दगडी धुराचे काळेकुट्ट ढग… हेच जणू रमेशचं जीवन झालं होतं.

एक दिवस रमेश तारीच्या वाकड्या हुकाने खडीयंत्राच्या पट्टयावर अडकलेले दगड काढत होता. अचानक हातात अडकवलेला तारेचा लोखंडी हुक खडीयंत्राच्या पट्टयांत अडकला. आपल्या हातातून लोखंडी काढण्याआधीच खडीयंत्राचा पट्टा रमेशला आत ओढू लागला. काही क्षणातच रमेशचा हात खडीयंत्राच्या पट्टयांत ओढला जाऊ लागला. तेव्हा रमेशने दुसऱ्या हातांची भक्कम मिठी खडीयंत्राच्या पट्टयाला मारली. खडीयंत्र जागेवर बंद पडलं. उसाच्या चरख्यात उस पिळत जावा तसाच रमेशचा हात पिळला गेला आणि कोपरापासून तुटून वेगळा पडला. खडीयंत्राचा सगळा पट्टा रमेशच्या रक्ताने माखून निघाला होता. सगळे कामगार पळत आल्यावर रमेश रक्ताच्या थारोळयात पडला होता. खडी वाहण्याच्या मोठया ट्रकमध्ये उचलून रमेशला टाकले. हा अवजड ट्रक शहरामधल्या गर्दीतून वाट काढत दवाखान्यापर्यंत कसा जाणार? हा प्रश्न पडल्यावर काही कामगारांनी लगेच खडीयंत्राच्या मालकाला फोन केला. काही मिनिटांत मालकाची गाडी तिथे हजर झाली. पुन्हा ट्रकमधून रमेशला बाहेर काढलं आणि मालकांच्या चारचाकीत टाकून शहरांतल्या मोठया दवाखान्यात नेलं. तिथे डॉक्टरने फक्त रमेशचं वाहतं रक्त बंद केलं. पुढच्या उपचारांसाठी रमेशला पुण्याच्या मोठया दवाखान्यात नेलं.

उजवा हात तुटल्यामुळं आता सलाईन कोणत्या हाताला लावायची हा डॉक्टरापुढे एक प्रश्नच होता. डाव्या मांडीमध्ये सलायनांची सुई खूपसून त्यांनी रमेशवर उपचार सुरु केले. खडीयंत्रात पिळून पिळून तुटलेला रमेशचा हात पुन्हा जोडता येणार नाही, असं म्हणालेले डॉक्टर पुढे सांगू लागले, कोयत्या… कु-हाडीने तोडलेल्या हातांच्या सगळया शिरा पुन्हा जुळून येतात आणि तो हात हालायला लागतो. तसं ह्या हाताचं होणार नाही, कारण हा हात पिळून पिळून तुटला आहे. त्यामुळे आतल्या सगळया शिरा तुटून गेल्या आहे. आम्ही हा हात पुन्हा जोडला तर सगळा हात पिकण्याची भीती आहे. पुन्हा ते ऑपरेशन करण्यासाठी दोन लाख रुपये खर्च येईल. जवळ जवळ महिनाभर रमेशच्या तुटलेल्या हातांवर अनेक ऑपरेशन झाले. मलमपट्टया सुरुच होत्या. रमेश फक्त डोळे उघडून पाहत होता. एक दिवस तर मांडीमध्ये सलायनांची सुई मोडल्यामुळे रमेशचा सगळा पाय सुजला होता. अपघाताचा भयंकर मानसिक आघात झालेला रमेश अंथरुणावर नुसताच बसून होता. रमेशच्या दवाखान्यांचा सगळा खर्च रमेशच्या मालकाने केला म्हणून बरे झाले. रमेश घरी आल्यावर तोल सांभाळत चालू लागला. डाव्या हाताने जेवण करु लागला. आता आपलं ह्या पुढचं आयुष्य एकाच हातावर काढायचं आहे, आपण अंपग झालो आहे.. हे सगळं स्वीकारण्याची रमेशची मानसिकता होत नव्हती.

काही दिवस खडीयंत्राचा मालक रमेशला बाजारांसाठी काही पैसे देत होता. पुढे तेही पैसे देण्यांचे मालकाने बंद केल्यावर एका हाताने संसाराचा गाडा हाकायचा कसा? हा प्रश्न रमेशच्या पुढे उभा राहिला. रमेशचा मुलगा प्रमोद आपलं घर चालवण्यासाठी शिक्षण करता करताच रंग देण्याचे काम करु लागला.

आपण आता अंपग झालो आहोत ही भीती रमेशच्या मनातून जात नव्हाती. जवळच्या एका गावात अंपग मेळवा भरला होता. रमेश तिथे हजर झाला. तेव्हा त्या मेळाव्यात दोन्ही हात तुटलेला एक अंपग माणूस रमेशला भेटला. तो माणूस रमेशला म्हणाला,

माझी पत्नीच माझं सर्व काही करतेय! ती एक दिवस जरी गावाला गेली तरी मी मरुन जाईल रे?

त्यावेळी रमेशला वाटलं… अरे ह्या माणसाला तर दोन्ही हात नाही. आपण ह्या माणसापेक्षा कितीतरी सुदैवी आहोत, आपला तर एकच हात गेला आहे. आपण आजही एका हाताने आपल्या थोड्याफार शेतीतली कामं करु शकतो. आंबेडकर जयंतीला आपण दोन्ही हातांनी निळ्या गुलालांच्या मुठी आभाळात फेकून सगळं आभाळ निळंभोर करुन टाकायचो. आज सुद्धा हे आभाळ आपल्या एकाच हातांच्या मुठी निळं होऊन जाणार आहे. कदाचित ‘जय भीम‘ म्हणून पुन्हा हे आभाळ निळं करण्यासाठी आपल्याला हा डावा ठेवला असेल, आपण अंपग नाहीये. आपण त्या तळपत्या भीमाचे वंशज आहोत. आपल्याला असं हार मानून कसं चालेलं… कमरेला काटेरी फास आणि गळयात मडकं बांधणाऱ्या ह्या जुलमी व्यस्थेला आपल्याला अजून पाणी पाजायचं आहे. आपल्याला असं हार मानून कसं चालेलं. ह्या डाव्या हातांची वज्रमूठ आता भक्कमच होत जाणार आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here