‘पावसा ये, ढगा ये, वाघा ये’

अभिजन, नागरी, आधुनिक वृत्तीच्या माणसासाठी पाऊस हा केवळ फुकटात मिळणारी एक गरजेची उपभोग्य वस्तू. या पलीकडे आमची समज दुर्दैवाने जाऊ शकलेली नाही. या उलट आदिवासी आणि कृषीवलांची पावसाशी पिता, देव, मित्र, माय-बाप, पोशिंदा अशी नाती जोडलेली आहेत.

  • वीरा राठोड

सोसाट्याचा गार वारा सुटला, काळे काळे ढग घार होऊन घिरट्या घालू लागले. आभाळाचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पक्ष्यांचा किलकिलाट ही साद असते सृष्टीला अन् चाहूल असते मृगाची, पहिल्या पावसाची. मृगाची चाहूल लागताच पावशा पक्षी ‘पेरते व्हा’ बोलू लागतो. कोकीळ ‘कुहू कुहू’ गाऊ लागतो आणि मोर बेचैन होऊन घेर धरू लागतो. मृगाच्या पहिल्या सरींकडे तहानलेल्या चातकाप्रमाणे अवघ्या जगाचे डोळे लागलेले असतात. एखादी मिलनातुर साजणी डोळ्यात प्राण ओतून आपल्या प्रियतमाची वाट पाहते, त्याप्रमाणे अवघी सृष्टीच या पाऊस प्रियाची वाट बघत असते. अर्थात, पाऊसही धरणी मातेचा साजणच. पावसाचे आगमन सर्वांनाच सुखावून जाणारी गोष्ट, ती कुठल्याही वरदानापेक्षा निश्चितच कमी नसते. पावसाच्या येण्याने सृष्टीत नवचैतन्य, नवतेज, उल्हास, आल्हाद आणि तृप्ती येत असते. झाडा-वेलींना, रानाला हिरवाईच्या नात्याचं दान तो देऊन जात असतो. पावसाशी धरित्रीप्रमाणे माणसांचेही आदिम आणि तितकेच जन्मजन्मांतरीचे अतूट नाते आहे.

अभिजन, नागरी, आधुनिक वृत्तीच्या माणसासाठी पाऊस हा केवळ फुकटात मिळणारी एक गरजेची उपभोग्य वस्तू, या पलीकडे आमची समज दुर्दैवाने जाऊ शकलेली नाही. या उलट आदिवासी आणि कृषिवलांची पावसाशी पिता, देव, मित्र, माय-बाप, पोशिंदा अशी नाती जोडलेली आहेत. भूमी ही माता आणि मेघ हा पिता, जो आपल्या जगण्यामरणाचा आधार मानत आलाय. मृगाचा पहिला पाऊस म्हणजे, आपल्या आदिमाता आणि आदिपित्याचा मिलन सोहळा तो मानतो. या मिलनासाठी ते वरुणराजाला आवाहन करतात. त्याचा उत्सव करतात. त्याच्या स्वागतासाठी गाणे गातात, नृत्य करतात, त्याची करुणा भाकतात. नागरी माणूस मात्र गरज पडेल तेव्हा याचना करतो, ऊर बडवतो. पाऊस पडला नाही तर ‘गावदेव पूजन’, ‘देव पाण्यात ठेवणे’, ‘नंगा लिंब’, ‘होम हवन’, ‘पर्जन्य यज्ञ’, ‘भजन पूजन’ असे नाना विधी करतो; पण निसर्गाच्या संवर्धनाकडे डोळेझाक करतो. ‘जल, जमीन आणि जंगल’ला आपलं सर्वस्व मानणारे आदिवासी त्यांची मनोभावे पूजा करतात. स्वत:पेक्षा अधिक काळजी घेतात, त्यांना जपतात. जल, जमीन आणि जंगलांचं परस्परावलंबी नातंच जणू त्यांनी जोपासलेलं आहे. म्हणूनच जल, जमीन आणि जंगलची लढाई ते आजही लढताना दिसतात.

आदिवासी संस्कृतीत पावसाच्या आगमनापूर्वीच त्याचे स्वागत केले जात असे, त्याची काही उदाहरणे आजही आढळतात. डोंगरकपारीत वास करणारे आदिवासी निसर्गसृष्टीतल्या प्रत्येक ऋतूला सरावलेले. निसर्गचक्रातले छोटेमोठे बदल त्यांना संकेत देत असतात, आणि तेही या अंदाजांवर आपला रहाटपाळणा हलवतात. आदिवासींना पहिल्या पावसाची चाहूल खूप आधी लागलेली असते. विशिष्ट वाहणाऱ्या वाऱ्यांवरून, पक्ष्यांच्या स्थलांतरावरून, विशिष्ट प्रकारच्या आवाज, हालचालीवरून. बदलत्या रंग-रूपावरून मृग मान्सून जवळ आल्याचा संकेत त्यांना मिळतो. कावळे, साळुंखे, सुतार, बुलबुल आदी पक्षी घरटी बांधू लागतात. चिमणी, पक्षी धुलीस्नान करू लागतात. टिटवी पाण्यात अंघोळ करू लागते. मुंगूस, साप, घोरपड, बिळातले प्राणी बाहेर पळू लागतात. सरड्याचं डोकं लालेलाल होतं. मुंग्यांच्या रांगा पळू लागतात. बगळे पाठीवर पिवळसर रंग धारण करतात. पक्षी आपल्या मादीला साद घालतात. प्रणयक्रीडा करू लागतात. अशा अनेक बाबी सांगता येतील. या काळात आदिवासी मेघराजाच्या, वरुण देवाच्या स्वागतासाठी निरनिराळे उत्सव साजरे करतात.

‘माडिया’ लोक परसा पेन, भिला पेन देवाचे स्मरण करून पावसाचे ‘सायला नृत्य’ करतात. ‘पावसा ये, ढगा ये, वाघा ये’, अशी गीते म्हणतात. बैगा लोक ‘हे जलदायी पानी बरस जाये’ म्हणत ‘जलदायी’ची पूजा करतात.

गोंडांमध्ये ‘बिदरी’ नावाच्या उत्सवात मेघांची पूजा होत होती. बिदरी अर्थात, बदरा, बादल, मेघ, ज्यामध्ये गोंड लोक चांगल्या पावसाची प्रार्थना करतात. सामूहिकरीत्या अंगणात येऊन ‘बदरी’ देवीला प्रसन्न केले जाई. कालांतराने देवीच्या जागी ‘ठाकूर देव’ आला आणि मेघांच्या जागी भूमी आणि अन्नधान्याची पूजा होऊ लागली. पांढऱ्या कोंबड्यांचा बळी देऊन धान्याच्या ढिगावर रक्त शिंपडून, पूजेनंतर धान्य वाटून दिले जाई. त्यांचा विश्वास आहे की, असे केल्याने धान्य खूप पिकते.

भिल्ल आणि बैगांमध्ये पर्जन्य उत्सव म्हणून ‘दिवसा’ करण्यात येतो, ज्यात पावसाची देवता ‘बाबादेव’ची पूजा होते. संध्याकाळी देवाला पाण्याने अंघोळ घातली जाते. नंतर तेल, शेंदूर, वस्त्र घालून दुधात पीठ शिजवून प्रसाद दिला जातो. ‘दिवसा’ केल्याने पावसाचा आशीर्वाद मिळतो. कालांतराने यात बळी देण्याची प्रथा आली. या वेळी ‘ढाँक आणि कमडी’वर गाथा गायली जाते.

भिल्लांमध्ये ‘ढोडी’ नावाचा वर्षा उत्सव करतात. मुलांच्या डोक्यावर सूप आणि हातात जळतं लाकूड देऊन घरोघरी जाऊन ‘ढेढर माता माता पानी दे, पानी दे नही तर दाना दे, दाना दे’ मग स्त्रिया सुपावर पाणी टाकतात अन् धान्य देतात. पावरा आदिवासी ‘इंदल वा गावगोदऱ्या इंदल’ आणि भिल्ल ‘इंदल’ करतात. पावरांची अशी धारणा आहे की, यामुळे परिसरात भरपूर पाऊस पडावा, अन्नधान्याची भरभराट व्हावी. निसर्ग संपन्न व्हावा, फळावा, फुलावा म्हणून ‘इंदल’ साजरा करतात. ज्यात वाजतगाजत विधीवत तरुणांच्या हातून कदंब वृक्षाची फांदी जंगलातून आणून नायकाच्या अंगणात रोवली जाते. कोंबडे, बकरे बळी देतात. सकाळी फांद्या काढून नदीवर जाऊन टाकून येतात.

संताळी जमातीत ‘करमानाच’ केले जाते. करमा पूजेच्या वेळी करमानाच करणे सक्तीचे असते. त्याशिवाय पाऊस पडत नाही, असा त्यांचा समज आहे. हात वर-खाली करून पावसाला बोलावण्यात येते.

बस्तरमधील हलबी आदिवासी तरुणी पावसाच्या आगमनासाठी गाणे गाऊन नाचतात. एकमेकींचं औक्षण करतात. ‘साय रेला रे रेला रे रे रे या रे रेला, झिमिर झिमिर मोरसे पानी, संगे गावाँ संगे झेलवाँ आमी तुमी रानी’… त्यांना विश्वास आहे, पावसानंतर त्यांचे सारे दु:ख, कष्ट दूर होणार आहेत, म्हणून त्या ‘रेला’ (लोकगीत) गाऊ लागतात.

लमाणी जमातीत कुमारिका मुली ‘भदकोला’ (मेघपूजा) करतात. पावसाळा लागण्यापूर्वी मेघराजाची मनोभावे पूजा केली जाते. यालाच ते भदकोला म्हणतात. तांड्यातल्या मुली घरोघरी जाऊन पीठ, डाळ, मीठ, हळद, मिरची आदी मागून आणतात. त्याचा नैवेद्य मेघाला दाखवतात, आपणही खातात. गाणे म्हणतात, ‘पड पड रे पाणी तोनं भजू, तारे देवेनं पुजू’ (पड पड रे पाण्या मी तुला भजते तुझ्या देवाला पूजते) लमाणांमध्ये ही आस्था आहे, की मुलींनी ही पूजा केल्यामुळे मेघराजा संतुष्ट होतो आणि बरसत येतो. आणि त्या हर्षोल्हासित होऊन नाचू, गाऊ लागतात. ‘झरमरीया वरसोये, नानी मोटी बुंदे पडं’, अशा रीतीने आदिवासी जमातींमध्ये पावसाच्या आगमनाची पूजाअर्चा, स्वागत करण्यात येते. आज नागरी माणूस इतका स्वार्थी, आपमतलबी झाला आहे की, आपण काही तरी देणं लागतो, हेच दुर्दैवाने तो विसरून गेलाय. जल, जमीन आणि जंगलांशिवाय माणूस जगू शकणार नाही, हे त्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या आधुनिक माणसाला विसर पडलाय. जगण्याचा मूलाधार असणाऱ्या या बाबींचे जतन, संवर्धन न करता दिवसेंदिवस मृत्यूला जवळ करू लागला आहे, त्याला स्वत:च्या शक्तींचा अहंकार चढलाय, पण तो हे विसरून गेलाय की, या सर्व शक्ती आपणाला निसर्गानेच बहाल केल्या आहेत. याची जाण मात्र आदिवासींना कालही होती आणि आजही आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here