महाराष्ट्रात विधवा पुनर्विवाहासाठी एकही योजना नाही

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत विधवा पुनर्विवाह योजना राबवल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीत विधवांच्या मुलींसाठी विवाह योजना आहे.महाराष्ट्रात मात्र, विधवा महिलांसाठी कोणतीही स्वतंत्र योजना नाही.

टीम बाईमाणूस /२० मे २०२२

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. त्यानंतर विदर्भात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीनेही असाच ठराव केला. या पार्श्वभूमीवर विधवांसाठीच्या योजनांचा आढावा घेतला असता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत विधवा पुनर्विवाह योजना राबवल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीत विधवांच्या मुलींसाठी विवाह योजना आहे. महाराष्ट्रात मात्र, विधवा महिलांसाठी कोणतीही स्वतंत्र योजना नाही. संजय गांधी निराधार योजनेतून विधवा महिलांना दरमहा फक्त १ हजार रुपये मदत केली जाते. ‘दिव्य मराठी’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

विधवा महिलांना सन्मानाचे आयुष्य जगता यावे यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात २६ जुलै १९१७ रोजी विधवा पुनर्विवाह कायदा केला होता. त्याला १०५ वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात १५ जून १८६९ या दिवशी पुणे येथे गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह पार पडला. अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी योजना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यनिहाय योजना अशा :

मध्य प्रदेशात ४० वर्षांखालील विधवा महिलेला पुनर्विवाहासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.


दिल्लीत विधवा बेटी शादी योजना एका कुटुंबातील दोन मुलींसाठी लागू आहे. यात ३० हजार रुपयांची मदत दिली जाते.


राजस्थानात २००७ पासून विधवा पुनर्विवाह योजना लागू आहे. प्रारंभी १५ हजार रुपये मिळत होते. भाजपा सरकारने २०१६ मध्ये ही रक्कम वाढवून ३० हजार रुपयांवर नेली. पाच वर्षांत ४२ महिलांनी लाभ घेतला.


उत्तर प्रदेशातही अशी योजना २००७ पासून लागू आहे. तेथे १८ ते ५० वर्षांच्या विधवेला पुनर्विवाहासाठी १५ हजार रुपये मदत दिली जाते. सुरुवातीच्या ७ वर्षांत तिथे केवळ एका महिलेनेच योजनेचा लाभ घेतला.


हिमाचल प्रदेशात ५० हजार रुपयांची मदत दिली जाते.


बिहारमध्ये ४० वर्षांखालील विधवा महिलेला पुनर्विवाहासाठी २ लाखांची आर्थिक मदत दिली जाते.

छत्तीसगडमध्ये नेचर्स केअर अॅण्ड सोशल वेलफेयर सोसायटीने विधवेशी विवाह करणाऱ्याला आशियातील ४५ स्थानांपैकी कुठल्याही एका ठिकाणी ४ दिवस व ३ रात्रीचे पॅकेज मोफत देण्याची घोषणा केली आहे.

या सगळ्या योजनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही विधवा पुनर्विवाहासाठी योजना आखण्यात यावी अशी मागणी होत आहे.

हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला आगळा वेगळा ठराव :

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here