कधी थांबणार ‘बांबूलन्स’ची फरफट?

गर्भवती मातेचे मुल झोळीतच दगावले, तर दुसरीने झोळीतच बाळाला जन्म दिला

  • टीम बाईमाणूस

देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा पुरवल्याची कितीही शेखी मिरवली तरी सातपुडा डोंगर परिसरात राहणाऱ्या हजारो आदिवासीबहुल गावांमधील अवस्था आजही तितकीच बिकट आहे. एकीकडे या देशाच्या राष्ट्रपतीपदी पहिली आदिवासी महिला विराजमान होत असतानाच आजही या आदिवासी भागात रुग्णांना दोन तरुणांच्या खांद्यावरच्या झोळीच्या रुग्णवाहिकेतूनच रुग्णालयात जावे लागत आहे. खेदाची गोष्ट म्हणजे या भागातील लोकांना ॲम्बुलन्स माहित नाही परंतू ही खांद्यावरच्या झोळीची ‘बांबूलन्स’ कशी रुग्णालयापर्यंत न्यायची हे मात्र माहित आहे.

येथील अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील नर्मदा काठावरील गावांचे रस्ते मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यांचा संपर्क सुटला आहे. यातून वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी बालकांचे अतोनात हाल होत असून त्यांना थेट ‘बांबूलन्स’ मधून कित्येक किलोमीटर पायपीट करत रुग्णालयापर्यंत आणले जात आहे. बुधवारी दुर्गम भागातून झोळीमधून मोलगीपर्यंत आणलेल्या दोघा गर्भवती मातांपैकी एकीचे बाळ पोटातच दगावले तर दुसरीने बाळाला त्या झोळीतच जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दुसऱ्या एका घटनेत नंदुरबार जिल्ह्यातील कुवलीडाबर (ता. तळोदा) येथील गरोदर माता विमल देवेंद्र वसावे हिला गुरुवारी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. उपचारासाठी झोळी करून तीन तास पायपीट करीत तिला सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी तळोदा ग्रामीण रुग्णालयात तिला हलविण्यात आले. तळोद्याला खासगी वाहनाने नेल्यानंतर तात्काळ उपचार मिळाले आणि गरोदर मातेची प्रकृती स्थिर झाली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सातपुड्याच्या दुर्गम भागात अतिशय हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नर्मदा काठावरील सिंदुरीचा चानी डोंगरपाडा येथील मासलीबाई रुबजी वळवी या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने उपचारांसाठी मोलगी येथे नेण्यात येत होते. सिंदुरीचा चानी डोंगरपाडा ते मोलगी हे अंतर आहे 30 किलोमीटर. त्यामुळे मासलीबाई यांना झोळीत टाकून नेण्यात आले. पाऊस आणि थंड वातावरण यामुळे मातेची प्रकृती रस्त्यातच खराब झाली आणि तिचे पोटातले बाळ दगावले. ही घटना ताजी असतानाच नर्मदा काठावरील डनेलचा कुवडी डोंगरपाडा येथील साकराबाई जातऱ्या पाडवी या गर्भवती महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या आणि त्यांनाही बांबूलन्समधून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने साकराबाईंनी झोळीतच मुलाला जन्म दिला.

देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील गंभीर समस्यांना अधोरेखित करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्ता नसल्याने गर्भवती मातेला प्रसूतीकळांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातून बांबूलन्स अर्थात झोळीच्या साहाय्याने सहा किलोमीटर दरीतून प्रवास करावा लागला आहे. आदिवासी भागाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होऊन देखील, आजही प्रत्यक्षात मात्र सर्व योजना कागदावरच ओढल्या जात आहेत. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून देखील विकासकामे होत नाहीत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, मोलगी व तळोदा या ठिकाणच्या गाव पाड्याचा पाण्यात रस्ते वाहून गेल्यामुळे गाव-पाड्याचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. याची देखील चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांनी केली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here