कोण आहेत ‘पाथरवट’ लिहिणारे जवाहर राठोड?

डोंगराचे ढोल आणि पाथरवट हे शब्द ऐकले की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पेटलेल्या एका वादाची आठवण होते. शरद पवारांनी साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात 'पाथरवट' या कवितेचा उल्लेख केला आणि महाराष्ट्रातील पवार विरोधकांच्या हातात एक आयतेच कोलीत मिळाले पण ज्या कवितेवरून हा सगळा वाद निर्माण झाला ते जवाहर राठोड नेमके कोण होते ? त्यांची गोष्ट काय आहे हे पाहुयात.

आशय बबिता दिलीप येडगे / २० मे २०२२ :’

“तुमच्या ब्रम्हा , विष्णू, महेशाला
लक्ष्मीला अन सरस्वतीला
आम्हीच की रूपड दिलंय.
आता तुम्हीच खर सांगा –
ब्रम्हदेव आमचा निर्माता की
आम्हीच ब्रम्हदेवाचे पिता ?”

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी जवाहर राठोडांची ही कविता एका कार्यक्रमात म्हटली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच वादंग उठला. तर ज्यांच्या कवितेने हे सगळ रामायण घडलं ते जवाहर राठोड नेमके कोण होते ? पाहूयात….

जवाहर राठोड जन्म आणि त्यानंतरचा प्रवास

जवाहर राठोड यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कवाना पांगरी या गावात झाला. लमाण तांड्यावर जन्मलेल्या जवाहरचे आई वडील दोघे मजुरी करायचे पण आपल्या नशिबी जी मजुरी आयुष्यभर आली ती आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या मुलाला अनेक काबाडकष्ट करून शिकविले. जवाहर राठोड आणि शब्द यांच्या मैत्रीची सुरुवात तेथूनच झाली. पुढे आयुष्यात मजल दरमजल करीत प्राध्यापक पदापर्यंत जवाहर जाऊन पोहोचला. औरंगाबादच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात तांड्यातला जवाहर प्राध्यापक जवाहर राठोड झाला. आपल्या देशात कुणी काहीही झालं तरी त्याची जात काही लोक विसरत नाहीत. शिक्षणाच्या , नोकरीच्या आणि त्यानंतरच्या प्रवासात देखील जातीयवादाचे चटके सहन करून जवाहर राठोड आपल्या मनातला विद्रोह कागदावर उतरवू लागले. स्वतःची आर्थिक , सामाजिक आणि वैचारिक परिस्थिती तर सुदृढ झाली पण आपल्या समाजाचे काय होणार ? हा प्रश्न तरुण जवाहर राठोडांना सतत सतावत असे आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदविला आणि यथाशक्ती समाज प्रबोधनाचे काम केले.

कवितेची सुरुवात कशी झाली ?

मराठवाड्यात नामांतराची चळवळ सुरु होती. एकूणच या प्रश्नावरून औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवाड्यात एकप्रकारचे भारावलेले वातावरण निर्माण झाले होते. मोतीराम राठोड, बापूराव जगताप अशा विद्रोही कवीमनाच्या नामांतरवादी सहकाऱ्यांसोबत जवाहर राठोडांच्या रोज चर्चा झडायच्या. या चर्चांमध्ये कधी पारध्यांच्या पालापासून लमाणाच्या तांडयापर्यंतच्या वेदना असायच्या तर कधी भांडवलवादी व्यवस्थेच्या शोषणाविरुद्धचा हुंकार. त्याचवेळी तिकडे मुंबईत दलित पँथरची चळवळही जोरात होती. वृत्तपत्रातून कळणाऱ्या पँथरच्या बातम्या विषमतावादाविरुद्धच्या लढ्याची प्रेरणा देत होत्या. ही प्रेरणाच पुढे कवितेत परावर्तित झाली आणि जवाहर राठोड कविता करायला लागले.

कविता आणि जवाहर राठोड

जवाहर राठोडांच्या कवितेचा आत्मा हा कधी सुखावलेला, गोड, गुलाबी नव्हताच. प्रचंड सामाजिक जाण असलेल्या जवाहर राठोडांच्या कवितेचा आत्मा होता ‘विद्रोह’. विद्रोहाच्या प्रेरणा देणाऱ्या , विद्रोहाभोवतीच अखंड विणलेल्या कविता जवाहर राठोड करीत असत. पला समाज शतानुशतकापासून दारिद्र्यात खितपत पडलाय. यामागे वर्णवादी व्यवस्थेचे मोठे षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र भेदून या निद्रिस्त समाजाला ‘स्व’ची जाणीव करून द्यायची असेल तर त्याला व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह शिकवावाच लागेल, ही जवाहर राठोडांची धारणा होती. याच धारणेचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यसंग्रहाच्या पानापानांवर उमटलेले दिसतात.

‘डोंगराचे ढोल’

dongrache dhol book cover
जवाहर राठोड यांचा एकमेव कविता संग्रह

जवाहर राठोड या विद्रोही कवीचा केवळ एकच कवितासंग्रह येऊ शकला आणि त्या कविता संग्रहाची ताकद हीच होती की या पुस्तकातील एका कवितेच्या केवळ काही ओळींनी महाराष्ट्रात एका वादाला तोंड फोडले आहे. ९० च्या दशकात प्रकशित झालेला ‘डोंगराचे ढोल’ जवाहर राठोडांच्या नंतरही जोरजोरात वाजतो आहे आणि महाराष्ट्रातील वंचित, उपेक्षितांच्या वेदना सांगतो आहे. या पुस्तकांचे सर्वाधिकार बाबुराव जगताप यांच्याकडे होते. आयुष्याची दाहकता शब्दात बांधण्याचे सामर्थ्य अंगी असूनही राठोड यांचा वाङ्मयीन प्रवास ‘डोंगराचे ढोल’च्या पुढे का जाऊ शकला नाही, याची कथाही फारच विदारक आहे. जवाहर राठोड यांच्या पत्नी अकाली गेल्या. त्यांचा वियोग राठोडांना सहन होऊ शकला नाही. शेकडो आव्हानांना थेट भिडणारा हा हाडाचा कार्यकर्ता मनातील भावनाकल्लोळासमोर मात्र हतबल ठरला आणि उण्या-पुऱ्या ५० व्या वर्षी ऐन उमेदीच्या काळात त्यांनी देह ठेवला.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here