लळा लागला या जीवा…

टीम बाईमाणूस / १२ मे २०२२

वाट चुकलेल्या एका बिबट्याच्या बछड्याने शेतकरी कुटुंबाच्या घरी तब्बल एक हप्त्याचा मुक्काम ठोकला…या काळात कुटुंबीयांनाही बछड्याची ओळख न पटल्याने त्यांनीही मांजरीचे पिलू म्हणून मायेची ऊब देत या बछड्याला जीवापाड जपले. घरातील लहानगी तन्वी तर त्या बछड्याला अंगाखांद्यावर घेऊन खेळवू लागली.मात्र ते मांजरीचे पिलू नसून बिबट्याचे बछडे आहे हे जेव्हा कळले तेव्हा सर्वांचीच पाचावर धारण बसली.. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.. लळा लागलेल्या या जीवाला वनविभागाच्या स्वाधीन करताच कुटुंबियांच्या डोळ्यात मात्र अश्रू तरळले.

…आणि तन्वीने बछड्याला कवटाळले

मालेगावच्या मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ आठवडाभरापूर्वी एक मांजरीच्या पिलासारखे दिसणारे पिलू घरातील लहान मुलांना दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुलांनी त्याच्यासोबत खेळू – बागडू लागले. मात्र हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडे असल्याचे कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांची पाचावर धारण बसली..मात्र सावधगिरी बाळगत आणि बछड्याला रोज मायेची उब देत दररोज दीड लिटर दूध पाजून त्याचे संगोपन केले. इतकेच नव्हे तर दररोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई त्याला घेवून जाईल, अशी देखील काळजी घेतली. मात्र वाट चुकलेल्या बछड्याची माय त्याला घ्यायला आली नाही.एक आठवडा उलटून गेला तरी बछड्याची आई न आल्याने हताश झालेल्या कुटुंबियांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळविली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले.दरम्यान, बछड्याची तपासणी करून त्याला सुखरूप बनविभागाच्या हद्दीत सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चाल, बैठक बिबट्यासारखी ऐटदार

ठाकरेंच्या शेजारी भाऊबंदकीतील लोकांकडे एकूण २५न ते ३० कुत्रे आहेत. मात्र या कुत्र्यांवरदेखील या बछड्याची दहशत होती. एकही कुत्रा बछड्याजवळ येत नसे. बछड्याची चाल, पाणी पिताना असलेली बैठक, तोंड उघडून दात दाखवत स्वरक्षणाची तयारी, सावध पवित्रा घेऊन उडी मारण्याची पद्धत हे सर्व काही बिबट्यासारखेच ऐटदार असल्याची निरीक्षणे कृष्णराव ठाकरेंनी नोंदवली आहेत.

संगोपनासाठी बछडा नाशिकच्या वन कार्यालयाकडे

वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने बछडा ताब्यात घेऊन मालेगाव कार्यालयात आणला होता. पशूवैद्यक अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार केले आणि बछड्याला नाशिकच्या वन कार्यालयात पाठवले. बछड्याला स्कीन इन्फेक्शन आणि १०२.६ इतका ताप असल्याचे डॉ. खाटीक यांनी सांगितले.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here