राष्ट्रपती येऊन गेल्या, पंतप्रधान आले… तरीही बिरसा मुंडाच्या ‘उलिहतु’ जन्मगावाची परिस्थिती जैसे थै…!

झारखंड राज्यातील राजकीय पक्ष बिरसा मुंडा यांचे नाव घेतल्याशिवाय मोकळा श्वास घेत नाहीत… देशभरात पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी स्वाभिमान दिवस साजरा केला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली तरी बिरसा मुंडा यांचे जन्मगाव ‘उलिहतु’ मध्ये विकास अजून पोहचलेलाच नाही.

  • टीम बाईमाणूस

झारखंड राज्यातील राजकीय पक्ष बिरसा मुंडा यांचे नाव घेतल्याशिवाय मोकळा श्वास घेत नाहीत. राज्यातील 26% आदिवासी जनता बिरसा मुंडाला देवरुपात मानतात. मात्र असे असून देखील, देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली तरी बिरसा मुंडा यांचे जन्मगाव ‘उलिहतु’ मध्ये विकास अजून पोहचलेलाच नाही. देशभरात पंधरा नोव्हेंबरला, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी स्वाभिमान दिवस साजरा केला जातो. मागच्या वर्षी याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उलिहातुमध्ये आल्या होत्या. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. केंद्र सरकार बिरसा यांची जयंती देशभरात आदिवासी जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करत आहे. सोबतच 15 नोव्हेंबर हा दिवस झारखंड राज्याचा स्थापना दिवस असतो.

मात्र केवळ वारसा हे विकासाचे प्रगतीपुस्तक नसते. त्यामुळेच भगवान म्हणून पुजले जाणारे बिरसा यांचे गाव विकासापासून वंचित राहिले आहे. विकासाच्या नावावर या गावात काळ्याशार दगडांनी आणि डांबरापासून बनवलेले रस्ते व लोकांच्या खिशातील स्मार्टफोन वगळता काहीच झालेले नाही. जवळपास सव्वा हजार लोकसंख्येच्या उलिहातु गावात आणि शेजारच्या इतर गावांत एकच फरक आहे तो म्हणजे बिरसा यांचे स्मारक आणि त्यांचे जन्मगाव असल्याचा वारसा. देशभरातील खेडी ज्या मूलभूत पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत तीच परिस्थिती उलिहातु गावाची आहे. मुख्य उद्योग शेती व मजुरी असणारी येथील बहुतांश लोकसंख्या मुंडा आदिवासी जमातीची आहे.

Droupadi Murmu pays tributes to Birsa Munda at Ulihatu - Tattva News

गावातील युवक रोजगाराच्या शोधात पश्चिम बंगाल मधील आसनसोल, दुर्गापूर, मुर्शिदाबाद या शहरांसोबतच मुंबई, दिल्ली सारख्या शहरांत स्थलांतर करत आहेत. झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरापासून 70 किलोमीटरवर असलेल्या व खूंटी जिल्ह्यात येणाऱ्या उलिहातु गावास आदर्श गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. यासोबतच शहीद ग्राम विकास योजना व केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी गावात होत असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र गावातील अनेक समस्या आजही त्याच स्वरूपात आहेत. जंगलाने वेढलेले उलिहातु गाव एकेकाळी नक्षल प्रभावित होते. आता परिस्थिती बदलली आहे. अर्ध सैनिक दलांच्या तुकड्यांची तैनाती करण्यात आली आहे. याच दलांनी सरकारी कार्यालयांवर आपल्या ताब्यात ठेवली आहेत यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे. या त्रासाची चर्चा दबक्या आवाजात ग्रामस्थ करत असतात.

बिरसा मुंडा यांची तिसरी व चौथी पिढी गावात राहतात. बिरसा यांच्या स्मारकाच्या पाठीमागेच असलेल्या कुडाच्या घरात त्यांचे कुटुंबीय राहते. बिरसा यांचे पणतू सुखराम मुंडा आजही मातीपासून बनलेल्या घरात राहतात कारण त्यांच्याजवळ घर बांधण्याएवढी देखील पुरेशी जमीन नाही. यामुळेच सरकारी योजनेतील घर मिळण्यास अडचणी येत आहेत. शहीद ग्राम विकास योजनेअंतर्गत घर मिळण्यास त्यांना जागेचा अडसर आहे. सध्या बिरसा यांच्या स्मारकाची देखभाल व स्वच्छता करतात. सुखराम बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले होते की, “2017 साली अमित शहा इथे आले होते. त्यावेळी रघुबर दास मुख्यमंत्री होते. त्यांनीच शहीद ग्राम विकास योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत 150 हून अधिक लोकांना पक्की घरे बांधण्यात येणार होती. परंतु अजूनपर्यंत एकही घर पूर्णपणे बांधण्यात आलेले नाही. यासारखेच पिण्याच्या पाण्यासाठी ‘हर घर नल’ लावणार होते मात्र आजही हे काम झालेले नाही. दरवर्षी मोठमोठे नेते येतात. आश्वासने देतात पण बहुतांश आश्वासने पूर्ण होत नाहीत. उलिहातुची प्रमुख समस्या म्हणजे गाव दुष्काळी क्षेत्रात येते. इथे पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनासाठी मोठ्या प्रयत्नाने पाणी उपलब्ध होते.

सुखराम मुंडा पुढे सांगतात, “गावातील लोक धान व महुआची शेती करतात. धानासाठी पुरेसे पाणी लागते मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांवर परिणाम होतो. पिण्याच्या पाण्यासाठी लोक हॅण्डपंप व विहिरींवर अवलंबून आहेत.” गाव बाडी निजकेल या तालुक्यात येते. गावच्या सरपंच मरियत देवी यांनी सांगितले की, “ग्रामीण पेयजल योजनेशी गाव जोडले गेले आहे, मात्र याचा काहीच फायदा झालेला नाही. योजनेअंतर्गत असलेली पाण्याची टाकी पाच वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. सौर अवलंबित जलपूर्ती योजनेचाही काहीच फायदा झालेला नाही. या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तरच आम्हाला पिण्यास पाणी उपलब्ध होईल. आता हिवाळ्याच्या दिवसांत थोडेफार पाणी आहे पण उन्हाळ्यात विहिरी आटतात. त्यावेळी परिस्थिती फार भयंकर असते.”

बिरसा मुंडा यांच्या आई वडिलांनी त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी चाईबासा येथील एका मिशनरी शाळेत दाखल केले होते. त्यावेळी उलिहातु भागात शाळा नव्हती. आता उलिहातु येथे बिरसा मुंडा यांच्या नावाने निवासी विद्यालय आहे. निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मात्र पुरेसे पाणी उपलब्ध नाही. विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी तत्वावर तीन शिक्षक आहेत. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खूंटी किंवा रांचीला जावे लागते. झारखंड राज्याला उघड्यावर शौच मुक्त राज्य घोषित केले आहे. मात्र उलिहातु गावातील शौचालये मोडकळीस अवस्थेत आहेत. त्यामुळे लोक उघड्यावरील शौचाचा पर्याय स्वीकारतात.

गावातील कोटे मुंडा म्हणतात की, “जेव्हा शौचालये सुस्थितीत होती तेव्हाही पाण्याच्या अभावाने लोक उघड्यावरच जात असत. ही तेव्हाची परिस्थिती आहे जेव्हा येथील खासदार अर्जुन मुंडा केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत.

प्रसिद्ध लेखक विकास कुमार झा यांनी बिरसा मुंडा यांच्या स्मारक स्थळावर आज एक दिवसीय उपोषण केले. या उपोषणामागचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्याची 76 वर्षे उलटून देखील बिरसा मुंडा यांचे गाव विकासात खूप मागे आहे.येथील ग्रामस्थांशी चर्चा व संवादाच्या कार्यक्रमात झा म्हणाले की, 75-76 वर्षे झाले,15 नोव्हेंबरला बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडून उलिहातु गावच्या विकासाची तीच ती कॅसेट वाजवली जाते परंतु येथे कसलाच विकास झालेला नाही. साडे सात दशके होऊन गेली हे गाव पाण्याच्या एका एका थेंबासाठी आतुर आहे. आधी इथे दहा दहा फूट खोलीचे पाण्यासाठी तीन स्त्रोत होते. मात्र डागडुजी अभावी त्यात माती जाऊन ते स्त्रोत केवळ पाच फुटांवर आले आहेत. गावातील एकाच तलावातून ग्रामस्थ पाणी पीत आहेत जो तलाव खूपच खराब आहे.

2017 पासून सशस्त्र दलाच्या 26 व्या बटालियनचा तळ उलिहातु मध्ये आहे. जवानांना देखील पाणी संकट भेडसावत आहे.अशा वेळी ते त्यांची गरज पाण्याचा टँकर मागवून पूर्ण करतात. पाण्याच्या अभावामुळे बिरसा मुंडा निवासी विद्यालयातील विद्यार्थी आता विद्यालय सोडून चालले आहेत.प्राथमिक शाळेची स्थिती तर कायमच बंद अशा अवस्थेत आहे. शिक्षणासाठी जवानांनी पुढाकार घेतला आहे. लहान मुलांना शिक्षण देण्यासाठी ते पुढे आले आहेत. आरोग्याच्या समस्यांसाठी येथील सुविधा शून्यवत अवस्थेत आहेत.

विकास कुमार झा या सगळ्या दैन्यावस्थेकडे पाहून म्हणतात, “झारखंडच्या राजधानी असलेल्या रांची शहरापासून या भागातील विविध भागांत, शहरांत भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. या सगळ्या मूर्त्यांना बनवायला जेवढा खर्च आला त्याच्या अर्धी रक्कम जरी खर्च केली तरी उलिहातु गावचा विकास होईल. रांचीपासून उलिहातुला येण्यासाठी चांगला रस्ता आहे. गावात हेलिपॅड देखील आहे कारण व्हीआयपी गेस्टसाठी सोयीचे पडेल. 2022 साली बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु इथे आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी भाषणात सांगितले, उलिहातु गावाला देशातील आदर्श गाव करू. परंतु आज याला एक वर्ष होत आले गावात काहीच झालेले नाही आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती व्हायच्या आधी द्रौपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या.”

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here