- प्रदीप आवटे
‘रौंदळ’ हा मराठीतील नवीन चित्रपट एका दुर्लक्षित ग्रामीण वास्तवाला समर्थपणे स्पर्श करतो. खरे म्हणजे, ऊस शेती, सहकारी साखर कारखाने ही थीम मराठीला अगदीच नवीन नाही, मराठीतील ‘सामना‘ सारखा माईल स्टोन म्हणून गणला गेलेला चित्रपट याच विषयाशीच संबंधित होता. तरीही ऊस शेती, ग्रामीण महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि सरंजामशाही राजकारण मराठी चित्रपटातून अभावानेच आढळले आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल.
या पार्श्वभूमीवर ‘रौंदळ’ या तुलनेने अस्पर्श विषयाला उत्तम न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ‘सामना’ 1974-75 मध्ये प्रदर्शित झाला होता, त्याचा कॅनव्हासही वेगळा आणि अधिक व्यापक होता. त्यामुळे या दोन चित्रपटांची तुलना करण्याची गरजही नाही पण आज ‘सामना’ नंतरच्या पन्नास वर्षामध्ये सहकाराची परिस्थिती कोणत्या थराला गेली आहे, याची एक चटका लावणारी चुणूक हा चित्रपट दाखवतो. म्हटलं तर ही एका सामान्य ऊस उत्पादक शेतक-याची आणि सहकारी साखर कारखान्याच्या सरंजामशाही राजकारणाने पुष्ट झालेल्या राजकीय नेत्याच्या धारदार संघर्षाची कहाणी आहे. शिवा जाधव या मिलिटरी भरती होऊ न शकल्याने थोडयाशा नाराजीनेच शेतकीमध्ये पडलेल्या तरुणाची ही कहाणी अत्यंत मनोवेधक आणि एंगेजिंग रित्या मांडण्यात दिग्दर्शक गजानन नाना पडोळ यांना यश आले आहे.

हिंगणी सारखं नगर जिल्ह्यातील गाव, तिथले एक शेतकरी कुटुंब, गावातील राजकीय ताणेबाणे अगदी वास्तववादी ऑथेंटिकरित्या मांडत ही कथा पुढेपुढे सरकत जाते. शिवा उर्फ मेजर, त्याचे वडील, आजोबा, आई, शिवावर प्रेम करणारी नंदी ही सारेच पात्रे पाहताना आपण अगदी एका गावातून, त्याच्या शिवारातून वावरत असल्याचा फिल हा चित्रपट देतो. पात्रांची अचूक निवड, छोटया छोटया प्रसंगातून ठळक आणि सजीव होत जाणारी पात्रे, कुठेही नाटकी न वाटणारी त्यांची नगरी बोली, उत्तम छायाचित्रण यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतो. ऊस शेती, सहकारी साखर कारखान्याशी जोडले गेलेले त्याचे आर्थिक हितसंबंध आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपले राजकीय साम्राज्य अधिकाधिक भक्कम करणारे स्थानिक पुढारी याचे वस्तुनिष्ठ चित्रण ही कथा करते.
गुंडगिरी, भ्रष्टाचार, पत्रकारांची मुस्कटदाबी अशा सामाजिक विघातक शक्तींच्या आधारे सरंजामशहा निरंकुशपणे मोठे होत जातात आणि मग लोकशाही असल्याचा निव्वळ भास सर्वसामान्यांना जाणवत राहतो. ऊसाचे कमी दर, ऊसाचे वजन मुद्दाम कमी दाखवून शेतक-यांचे आर्थिक नुकसान करणे. विरोधी गटाच्या शेतक-यांचा ऊस जाणीवपूर्वक कारखान्याला नेण्यास मुद्दाम त्रास देणे, तोटयात जाणारे सहकारी साखर कारखाने कमी दरात साखर सम्राटांनी विकत घेऊन स्वतःचे ऊखळ पांढरे करणे अशा अनेक विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. आमचे आजचे राजकीय नेतृत्व अंतर्मुख होण्याची क्षमताच हरवून बसले आहे, याची प्रचंड दुखरी जाणीवही हा चित्रपट पाहताना क्षणोक्षणी होत राहते.

भाऊ शिंदे या अभिनेत्याचे विशेष कौतुक. ग्रामीण भागातील एक खराखुरा नायक भाऊच्या रुपाने मराठीला मिळाला आहे. त्याचा पडद्यावरील सहज वावर, नैसर्गिक अभिनय यामुळे तो प्रेक्षकांना भावतो. नेहा सोनवणे ही नवी नायिका देखील या चित्रपटात सहजसुंदर दिसली, वावरली आहे. फक्त त्यांची प्रेमकथा चित्रपटाच्या मूळ विषयाशी अजून एकजीव असण्याची गरज होती. चित्रपटातील बाकी सर्वच सहकलाकारांनी आपापली कामे अत्यंत सहजसुंदर केली आहेत. चित्रपटाचा खलनायक असणारा बिट्टू काहीसा बॉलिवूडी वाटतो. चित्रपटातील गाण्यांवर मात्र अजून कष्ट घ्यायला हवे होते. अनेकदा गाणी कथेला पुढे न नेता मुद्दामहून घुसडल्यासारखी वाटल्याने कथानकाचा वेग मंदावतो.
कथेचा शेवटही निव्वळ हिंसक न करता अधिक अर्थपूर्ण करता येऊ शकला असता. एका अत्यंत वस्तुनिष्ठ समस्येचा अतार्किक, बॉलीवूडी शेवट दुःखदायक आहे. ऊस उत्पादक शेतक-याला काव्यात्म पण अधिक शाश्वत न्याय देण्याचा प्रयत्न करता येणे अर्थातच शक्य होते. समाजाचा उभा आडवा छेद घेऊन आत खोलवर पाहू शकणारा लेखकच अशी कथा अधिक अर्थपूर्ण वळणावर नेऊन थांबू शकतो. अर्थात तरीही, गजानन नाना पडोळ या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात एक उत्तम चित्रपट मराठीला दिला आहे. सर्वसामान्य प्रेक्षक या चित्रपटाला उस्फूर्त प्रतिसाद देताहेत हे दृश्य मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुखावह आहे.