आणखी किती ‘छपाक’…?

  • टीम बाईमाणूस

‘अ‍ॅसिड बिकताही नही, मिलताही नही, तो कोई फेकताही नही’, असा ‘छपाक’मधील दीपिकाचा संवाद आहे. देशाच्या राजधानीत एका 12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे सांगितले जात असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा भारतात शीतपेयांपेक्षा स्वस्त आणि खुलेआम मिळणाऱ्या अ‍ॅसिड विक्रीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

दिल्लीत बुधवारी एका तरूणीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. द्वारका परिसरात सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. तरुणी आपल्या लहान बहिणीसोबत जात होती, तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्या मुलीवर अ‍ॅसिड फेकले. ज्या मुलीवर हल्ला झालेला आहे. तीची प्रकृती गंभीर झालेली आहे. तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या वडीलांनी ओळखीच्या दोन जणांवर संशय घेतला आहे. मुलीच्या वडिलांनी मीडियाला सांगितले की, मुलीची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी माझ्या मुली एकत्र बाहेर गेल्या होत्या. अ‍ॅसिड फेकणाऱ्या दोन्ही आरोपींनी त्यांचे तोंड कपड्याने बांधलेले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड खरेदी केले होते.

शीतपेयांपेक्षा स्वस्त मिळते अ‍ॅसिड

अशा प्रकारचे अ‍ॅसिड हल्ले होण्याची देशातली ही पहिलीच वेळ नाहीये. पण मग महत्त्वाचा प्रश्न हा आहे की याप्रकारचे अ‍ॅसिड हल्ले करण्यासाठी सहजासहजी अ‍ॅसिड मिळतं कुठून? दुकानात सर्रास अ‍ॅसिड विकायला सुप्रीम कोर्टाने 2013 साली बंदी घातली. वाढत्या अ‍ॅसिड हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी हा निर्णय घेतला होता. कोर्टाने म्हटलं होतं की, कोणत्याही दुकानात अ‍ॅसिड विकता येणार नाही, फक्त काही ठराविक दुकानांना अ‍ॅसिड विकण्याची परवानगी असेल. “दुकानदारांनी ग्राहकांचे ओळखपत्र तपासून मगच त्यांना अ‍ॅसिड विकावं,” असंही कोर्टाने म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार अ‍ॅसिड विकणारा आणि विकत घेणार दोघांकडे परवाना असणं आवश्यक आहे. ज्या दुकानांमध्ये अ‍ॅसिड विकलं जातं तिथे खरेदी-विक्रीचं रेकॉर्ड, कोणी अ‍ॅसिड खरेदी केलं, कधी आणि का याची सगळी नोदं असणं बंधनकारक आहे.

कायदा काय सांगतो?

अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांना भरपाई, त्यांचे पुनर्वसन आणि मोफत उपचार देण्यात यावेत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. यापूर्वीही सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये अ‍ॅसिड हल्ले रोखण्यासाठी चळवळ उभारलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना अ‍ॅसिडच्या खुल्या विक्रीवर निर्बंध आणण्याचे आदेश दिले होते; परंतु त्यानंतरही देशातील अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढच होत राहिली. या हल्ल्यामध्ये सर्वाधिक पीडित या महिला असून, त्यातही 13 ते 35 वयोगटातील महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे. 2014 मध्ये झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली. 2014 मध्ये महिला पीडितांची संख्या 225 इतकी असून, त्यापैकी केवळ 154 जणांना अटक झाली आहे आणि केवळ 12 जणांना शिक्षा झाली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) माहिती नुसार 2018 ते 2020 पर्यांत देशात 386 महिलांवर अ‍ॅसिड हल्ले झाले आहेत. ज्यामध्ये 62 आरोपी दोशी असल्याचे सिध्द झाले आहे. ही माहिती देशाचे गृहराज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी संसदेत दिली. या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे स्पष्ट होते की, लाखो प्रयत्न आणि दावे करूनही दरवर्षी 100 हून अधिक अ‍ॅसिड हल्ल्यांची प्रकरणे समोर येत आहेत. महिलांवर होण्याऱ्या ऑसिड हल्ल्याची वर्षा नुसार आकडेवारी 2018 मध्ये 131, 2019 मध्ये 150, आणि 2020 मध्ये 105 येवढ्या घटना समोर आल्या आहेत. त्या मध्ये फक्त 62 आरोपीना शिक्षा झाली आहे.

पुरुषीपणा गाजवण्याची वृत्ती खोल मनात अजूनही दडलेली आहेच. जेव्हा हीच पुरुषी मानसिकता तिला केवळ संभोगण्याच्या ‘मादी’रूपात पाहते आणि याच पुरुषी मानसिकतेला जेव्हा तिचं सुशिक्षित, सक्षम मन नाकारतं तेव्हा हीच पुरुषी ‘जोर’ वृत्ती आपल्या शारीरिक बळावर तिला ओरबाडू पाहते. याच ओरबाडलेपणातून आज तिच्यावरच्या अत्याचारांच्या घटना वाढताहेत. ‘ती माझी नाही, तर कुणाचीच नाही..’ हा विचार अमानवीय कृत्याची बाजू बनतो. यातूनच लैंगिक शोषण, ऑनर किलिंग, कौटुंबिक हिंसाचाराबरोबरीनंच अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटना अगदी सर्रासपणे समाजात घडत आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या अलीकडच्या काही घटना पाहिल्या तर लक्षात येईल की, ही ‘वृत्ती’ आता ‘विकृती’ बनत चाललीय. संपूर्ण देशभरात वरचेवर घडणा-या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटना लैंगिक शोषणाइतक्याच गांभीर्यपूर्ण आहेत, ज्या आत्मविश्वासानं ती या समाजात वावरते, ते तिचं अस्तित्वच, तिची ओळख, तिचा चेहराच विद्रूप करण्याची ही विकृती एकतर्फी प्रेम, ईर्षा अशा अनेक सुडाच्या भावनांतून अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेपर्यंत पोहोचते. आज अशा घटनांनी तिच्या शरीरावरच नाही, तर मनावर झालेले व्रण न भरणारे आहेत..

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here