- टीम बाईमाणूस
केंद्राने देशातील एफएम रेडिओ चॅनेलना दारू, ड्रग्ज, शस्त्रे, गुंड आणि बंदूक संस्कृतीचा गौरव करणारी गाणी वाजवण्यापासून किंवा प्रसारित करण्यापासून रोखणारे आदेश काढले आहेत. एफएम रेडिओ चॅनेल्सना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना ‘ग्रँट ऑफ परमिशन अॅग्रीमेंट’ (GOPA) आणि ‘मायग्रेशन ग्रँट ऑफ परमिशन अॅग्रीमेंट’ (MGOPA) मध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे आणि यामध्ये देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणारी सामग्री प्रसारित न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याविषयीच्या चर्चेत असे म्हटले आहे की, “या नियमांचे उल्लंघन केल्यास मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.“
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार खाजगी एफएम वाहिन्यांना अधिकृत मान्यता देणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे 30 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, ‘काही एफएम चॅनल्सच्या माध्यमातून दारू/ड्रग्ज/ शस्त्रे/ गुंड/ बंदुक संस्कृतीचा पुरस्कार करणारी गाणी आणि सामग्री प्रसारित करतात. अशा गाण्यांचे/सामग्रीचे प्रसारण ऑल इंडिया रेडिओ कार्यक्रम संहितेचे उल्लंघन आहे.’ मंत्रालयाने सांगितले की हे लक्षात आल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की काही चॅनल हे दारू, अंमली पदार्थ, बंदूक आणि गुंडगिरीच्या संस्कृतीला प्रवृत्त करणारी गाणी प्रसारित करीत आहेत. त्यात म्हटले आहे की अशा प्रकारची गाणी प्रसारित करणे हे ऑल इंडिया रेडिओ कार्यक्रम संहितेचे उल्लंघन आहे आणि केंद्राला अशा प्रकरणांमध्ये निर्बंध लादण्याचा अधिकार आहे ज्यात परवानगी निलंबित करणे आणि प्रसारणावर बंदी घालणे अशा नियमांचा समावेश होतो.
‘परवानाधारकाला वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे किंवा केंद्र सरकार वेळोवेळी लिहून दिल्याप्रमाणे, ऑल इंडिया रेडिओद्वारे पाळल्या जाणार्या समान कार्यक्रम आणि जाहिरात नियमांचे पालन करावे लागेल.’ याविषयी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या अलीकडील निरीक्षणांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की अशा वादग्रस्त गाण्यांमुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो आणि यातून गुंडगिरीची संस्कृती वाढीस लागते. 13 नोव्हेंबर रोजी पंजाब सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा दंडाधिकारी, आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना एक पत्र जारी करून शस्त्रास्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन (सोशल मीडियासह) आणि बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांवर बंदी घातली होती. यांचीही नोंद यामध्ये घेण्यात आलेली आहे. सार्वजनिक सभा, धार्मिक स्थळे, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये शस्त्र बाळगण्यास व प्रदर्शन करण्यास पूर्ण बंदी असावी, असे आदेशात म्हटले आहे. तसेच द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणीही या आदेशात करण्यात आलेली होती.
सरकारने रेडिओ चॅनेलना नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यात म्हटले आहे, “परवानाधारकाने परवानगीच्या कोणत्याही अटी व शर्तींचे किंवा FM रेडिओ धोरणातील इतर कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केल्यास परवानगी निलंबित करण्याचा आणि प्रसारणावर निर्बंध लादण्याचा अधिकार अनुदानकर्त्याला असेल.” माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जून 2019 पर्यंत, सुमारे 381 खाजगी एफएम रेडिओ स्टेशन्स शंभरहून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहेत.