- टीम बाईमाणूस
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका मंदिराच्या बाहेर काही आक्षेपार्ह पोस्टर लावलेले आढळून आले आहेत. या मंदिरात असणाऱ्या वॉटर कुलर मधून पाणी पिण्याच्या संदर्भातील नियम या कागदावर छापण्यात आलेले असून हे नियम वाचून आपल्या देशात जात आणि धर्म किती खोलवर रुजला आहे हे कळून येते. विशेष म्हणजे पाणी पिण्यातही जातीभेद आणि धर्मभेद करणारी मानसिकता दाखवून देणारे हे पोस्टर आहेत. यामध्ये विशिष्ट धर्म आणि जातीच्या लोकांना स्पष्टपणे उद्देशून सांगण्यात आले आहे की तुम्ही जर या जातीचे अथवा धर्माचे असाल तर या मंदिराच्या कुलर मधून पाणी पिऊ शकत नाही. पोस्टरच्या खाली ज्या व्यक्तीचे नाव लिहिले आहे तो मंदिराचा सेवक आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण कमला नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटरा सुलतानाबाद येथील अन्नपूर्णा धाम मंदिराशी संबंधित आहे. या पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की “अन्नपूर्णा धाम मंदिरात बसवण्यात आलेल्या वॉटर कुलरमध्ये पाणी पिण्याचे नियम. हजरत महंमद किंवा महंमद पैगंबर यांच्या धर्मातील लोकांनी पाणी पिऊ नये. लहान जातीच्या लोकांनी पाणी पिऊ नये. बाटलीत पाणी घेऊ नये अन्यथा कडक दंडात्मक कारवाई केली जाईल. आदेशानुसार – भाई केसर सिंग लल्लू”

विशिष्ट धर्म आणि जातीच्या लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचा आणि मंदिराच्या सेवकाला गोवण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात दिसते. कारण खुद्द मंदिराच्या सेवकानेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोस्टर मिळाल्यानंतर मंदिराजवळ लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक व्यक्ती चेहऱ्यावर कापड बांधून पोस्टर चिकटवत असल्याचे दिसून आले. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराचे सेवक केसर सिंह यांनी तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, “सोमवार, 27 फेब्रुवारीच्या सकाळी, पूजा करण्यासाठी आलेल्या लोकांना मंदिराच्या भिंतीवर आणि वॉटर कुलरजवळ पोस्टर चिकटवलेले दिसले. त्यावर आक्षेपार्ह शब्द लिहिले होते. मंदिरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यात सोमवारी पहाटे 3.45 वाजता एक व्यक्ती हे पोस्टर लावताना दिसली.”
याप्रकरणी शहर परिसराचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रशेखर पांडे यांनी सांगितले की, “मंदिर सेवकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.