दलित स्कॉलर सूरज येंगडेची हॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’

मूळचा नांदेडचा, अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करणारा आणि अगदी तरुण वयात 'कास्ट मॅटर्स' हे इंग्रजी पुस्तक लिहून आंतरराष्ट्रीय ख्यातीवर पोहचलेल्या डॉ. सुरज येंगडेला हॉलिवूडमध्ये संधी मिळाली आहे.

  • टीम बाईमाणूस

मूळचा नांदेडचा, अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करणारा आणि अगदी तरुण वयात ‘कास्ट मॅटर्स’ हे इंग्रजी पुस्तक लिहून आंतरराष्ट्रीय ख्यातीवर पोहचलेल्या डॉ. सुरज येंगडेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नांदेडच्या दलित वस्तीत लहानाचा मोठा झालेला सूरज येंगडेने आता थेट हॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’ मारली आहे.

दिग्दर्शिका एवा ड्यूव्हर्न (Ava Duvernay) ही व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत सहभागी झालेली तब्बल 91 वर्षाच्या इतिहासातील पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला ठरली आहे. एवाचा ‘सेल्मा’ (Selma) हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होता. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये एवा तिचा ‘ओरिजिन’ (Origin) हा चित्रपट घेऊन उतरली आहे. व्हेनिस सारख्या चित्रपट महोत्सवात संधी मिळू नये यासाठी अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या सगळ्या अडचणींवर मात करून एवाने हे यश प्राप्त केले आहे. दलित स्कॉलर सूरज येंगडे एवाच्या याच ‘ओरिजिन’ चित्रपटात भूमिका करणार आहे.

पुलित्झर पारितोषिक विजेती महिला पत्रकार इसाबेल विल्करसन यांच्या “कास्ट: द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टेंट्स” या पुस्ताकवर आधारित ‘ओरिजिन’ चित्रपटाची कथा आहे. 2020 मध्ये सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक म्हणून पत्रकार इसाबेलची गणना होते. दिग्दर्शिका एवाने अवघ्या 37 दिवसांत “ओरिजिन” चित्रपट पूर्ण केला असून लेखिका इसाबेल विल्करसनच्या स्वतःच्या जीवनातील वैयक्तिक शोकांतिकेपासून नाझी जर्मनीच्या पुनर्संचयित, दक्षिण युनायटेड स्टेट्समधील जिम क्रो वेगळेपणाचा काळ आणि भारतातील दलित “अस्पृश्य” जातीने सहन केलेल्या त्रासांपर्यंतचे संक्रमण यावर भाष्य करते. संपूर्ण इतिहासात खालच्या जातीतील सदस्यांना क्रूरता आणि दहशतीद्वारे समाजाच्या तळाशी कसे अमानुषीकरण केले गेले आणि त्यांना कसे अडकवले गेले, उच्च जातीच्या व्यक्तींशी लग्न करण्याचा किंवा त्यांचे पूर्वनियोजित भागधेय बदलण्याचा अधिकार कसा नाकारला गेला हे चित्रपट स्पष्टपणे दाखवतो.

‘ओरिजिन’ चित्रपटात सूरज येंगडेने भारतीय स्कॉलर व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात औन्जान्यू एलिस-टेलर (Aunjanue Ellis) मुख्य भूमिकेत आहे, तर जॉन बर्नथलने तिच्या पतीची भूमिका केली आहे. इतर कलाकार, सुरज येंगडे प्रमाणेच स्वतःच्याच कॅरेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सूरज येंगडे - baimanus

कोण आहे हा दलित स्कॉलर…?

सूरज येंगडे युरोप, आफ्रिका या खंडात शिक्षण घेऊन सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. नेहमी सुटाबुटात आत्मविश्वासानं वावरणारा, लक्ष वेधून घेणारी आफ्रिकन हेअरस्टाईल मिरवणारा सूरज नांदेडच्या भीमनगरमध्ये हलाखीतच वाढला. दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना सूरजने अगदी शाळकरी वयापासून शेतमजूर, ट्रकवरती हेल्पर अशी कामं करत शिक्षण पूर्ण केले. सूरजचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. त्यानंतर काही दिवस मुंबईमध्ये शिक्षण घेऊन तो शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षणासाठी रवाना झाला. त्यानं आफ्रिका, युरोप आणि अमेरिका या खंडांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारा तो पहिला दलित स्कॉलर आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यानं पीएचडी मिळवली आहे. ‘द रॅडिकल इन आंबेडकर’ हे पुस्तक सूरजने आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत संपादित केलं आहे. दलित, ब्लॅक, रोमा, इराकु आणि जगभरातील स्थलांतरित यांना एकत्रित आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here