- शुभम सोळसकार
सैनिकी गावांची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात आता नवनवीन कल्पनांवर आधारित गावे निर्माण होत आहेत. भिलार हे पुस्तकांचे गाव, मांघर हे मधाचे गाव यानंतर फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने धुमाळवाडीला हा दर्जा देण्यात आला आहे. नव्वदच्या दशकात कोरडवाहू शेतजमिनीत डाळिंबाच्या फळबागांपासून झालेली सुरुवात आज तब्बल वीस प्रकारच्या फळबागांवर येऊन ठेपली आहे. सध्या सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, पेरू, अंजीर या फळांचे प्रामुख्याने उत्पादन होत असून द्राक्षे, पपई, ॲपल बोर, चिंच अशा वीस प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जात आहे.
धुमाळवाडीचे सरपंच श्री दत्तात्रय धुमाळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, “पाण्याची अनुलब्धता होती तेव्हा आम्ही टँकरने बागा जगवल्या आहेत. आता धोम बलकवडी प्रकल्पातील कालव्याचे पाणी आल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शासनाने कोल्ड स्टोरेज निर्मितीसाठी सहकार्य करावे व फळबागांच्या कीड नियंत्रण औषधांवरील वाढता खर्च आटोक्यात ठेवावा. कारण दोन वर्षांपूर्वी जी लिक्वीड स्वरूपातील औषधाची बॅग हजार रुपयाला मिळायची त्याची किंमत आता तीन ते चार हजारांपर्यंत झाली आहे. त्याचा प्रभाव देखील कमी झालेला दिसतो म्हणून बोगस औषधांची बाजारातील विक्री याकडे देखील सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे”.

धुमाळवाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेले कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी देखील फळबागांच्या लागवड व संवर्धनासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. सध्या बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीकडे वळले आहेत. त्यामुळे फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील उपलब्ध झालेली आहे. गावातील शेतकऱ्यांचा फळउत्पादना सोबतच दुग्धव्यवसाय हा प्रमुख जोडधंदा आहे. फळांचे गाव हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर कृषी पर्यटनास देखील चालना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी गावातील शेतकरी, एकत्र येऊन फळ प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी अनुकूल असून शासन स्तरावरून यासंबंधी प्रशिक्षण व अनुदान उपलब्ध करून द्यावे. अशी अपेक्षा गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित वृत्त :
धुमाळवाडीत सद्या सीताफळ, पेरू काढणीचा हंगाम सुरू असून सर्वत्र तीच कामे सुरू आहेत. शेतीच्या माध्यमातून स्वावलंबन होऊ शकते व जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण होऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ धुमाळवाडीने निर्माण केला आहे.
⭐ ⭐⭐⭐⭐