- टीम बाईमाणूस
कृषी संशोधनात महत्वाचा मानला जाणारा व वर्ल्ड फूड प्राईझ संघटनेकडून देण्यात येणारा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार भारताच्या डॉ. स्वाती नायक यांना जाहीर झाला आहे. परिस्थिती अनुकूल भात वाण प्रणाली विकसित करण्याकरिता त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असल्याचे वर्ल्ड फूड प्राईझ या संघटनेकडून जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार मिळविणाऱ्या डॉ. नायक या तिसऱ्या भारतीय तर पहिल्या ओडिसी ठरल्या आहेत. सद्या त्या नवी दिल्लीतील, इरी (International Rice Research Institute) या संस्थेत संशोधक म्हणून कार्यरत आहेत. Outstanding young scientist अशा शब्दात वर्ल्ड फूड प्राईझ ने त्यांचा गौरव केला आहे.
मूळच्या ओडिशा राज्यातील असलेल्या डॉ. नायक यांनी आचार्य एन.जी.रंगा विद्यापीठातून कृषी पदवी घेतली. त्यानंतर आनंद येथे ग्रामीण नियोजन या विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.तर ॲमिटी विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी संपादन केली.ग्रामीण जीवनाशी संबंधित असलेल्या डॉ. नायक यांनी दहा हजारांहून अधिक शेतात जाऊन पाचशे पेक्षा जास्त भाताच्या वाणावर प्रयोग केले. कमी पाण्यावर आधारित ‘ शाहभागी धान’ हे वाण त्यांनी विकसित केले. सद्या बहुसंख्य ओडिसी शेतकऱ्यांच्या आहारात याच वाणाचा वापर केला जातो.

ओडिशाची बियाणे दीदी
ओडिशात त्या बेहाना म्हणजेच बियाणे दीदी म्हणून ओळखल्या जातात. वातावरण बदलांना अनुकूल अशा वाणाच्या निर्मितीवर त्यांचा कायम भर राहिला आहे.याआधी भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या महिला शेतकऱ्यांसाठीच्या उपक्रमाच्या प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. बांगलादेश, नेपाळ आणि भारतात त्यांनी विकसित केलेले वाण मोठ्या प्रमाणात वापरात आहेत.सद्या त्या आंतरराष्ट्रीय बियाणे धोरण करार (International seed policy Agreement) मधील महत्वाच्या संशोधक म्हणून देखील काम पाहत आहेत.दक्षिण आशिया व दक्षिणपूर्व आशियातील seeds without border या उपक्रमाला चालना देणारा हा करार असेल.महिलांच्या समावेशनासाठी त्या कायमच आग्रही राहिल्या आहेत.त्यांच्या पुढाकारातून बियाण्याच्या क्षेत्रात अनेक महिला उद्योजक निर्माण होऊन महिला सक्षमीकरणास पाठबळ मिळाले आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हरित क्रांतीचे प्रणेते असलेल्या बोरलॉग यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार चाळिशीच्या आतील संशोधकास प्रदान केला जातो. पुढच्या महिन्यात दे मोईना या शहरात बोरलॉग संवाद होणार आहे. तेव्हा 24 ऑक्टोबर 2023 ला या पुरस्काराचे वितरण होईल. दहा हजार अमेरिकी डॉलर व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कृषी क्षेत्रातील संशोधक महिलेला मिळालेला हा पुरस्कार भारताच्या आजवरच्या कृषी क्षेत्रातील वाटचाल व संशोधनासाठी अभिमानास्पद आहे.