- हेरंब कुलकर्णी
प्रिय कुस्तीगीर मुलींनो,
काल पदके गंगेत विसर्जित करायला गेलेल्या तुम्हाला रडत परतताना बघितले, त्याच्या आधी पोलिसांच्या बुटाखाली दबलेला रडवेला चेहरा बघितला आणि जंतर मंतरवर रडताना गेल्या महिनाभरात कितीदा तरी बघितले… मुलींनो, नाही बघवत आता. उठा आता मुलींनो, चला हरलो आपण,
ब्रिजभूषण जिंकला.
त्यांना साजरा करू द्या आनंद… भुशभुशीत झालेल्या लोकशाही नावाच्या लाल मातीत आपली पाठ कुस्तीत टेकली हे आपण कबूल करू या..
यापेक्षा नाही पणाला लावू शकत,
या देशातील सभ्यता, या देशातील करुणा आणि सत्याग्रह…
आपल्या पराभवात एक लिहिला जातोय इतिहास आणि तुमचे अश्रू देशवासीयांच्या काळजावर वाहताहेत….
चीन मधल्या तिआओमेन चौकात बुलडोझर फिरवलेली मुले चिरडून मेली 30 वर्षापूर्वी. ती मुले हरली पण चीनचा बुरखा टराटरा फाटला… कोणताही विकासदर आणि प्रगतीचा सुईदोरा अजूनही नाही शिवू शकला तो बुरखा…
तीच गोष्ट, तुमचा जंतर मंतरचा पराभव….
9 वर्षाच्या प्रगतीचे ढोल ऐकूच येत नाहीयेत तुमच्या हुंदक्यांपुढे…
विकासाचे सारे तर्क निरुत्तर होताहेत तुमच्या आरोपांपुढे,
न्याय देणारा सेंगल स्थापना होताच दीन झालाय पोलिसांचा बुट तुझ्या चेहऱ्यावर बघुन…
आणि जाहिरातींचे सारे सोहळे वाहून गेलेत तुमच्या रोजच्या अश्रूत…
काल सोशिक गंगा मातेने तुमचे अश्रू स्वीकारले आणि शांतपणे ती वाहत राहिली… जशी कोरोनातील प्रेत वाहताना गप्प राहिली. तिलाही देशातील सर्वात महत्वाच्या मतदारसंघात राहायचे आहे ना ? पदकेच काय तुम्ही स्वतः चा जीव जरी दिला असता तरी आम्ही तुम्ही केलेला आणखी एक स्टंट, इतकेच म्हणत राहिलो असतो..
गावागावात पालक आपल्या मुलींना ज्युदो कराटे शिकवत असतात,हेतू हा की आपल्या मुलीला कोणी छेडायला नको आणि छेडले तर ती प्रतिकार करू शकेल पण तुमच्या या प्रकरणाने अशा भाबड्या पालकांना आणि मुलींना हा धडा दिलाय की या देशातील स्त्री कितीही सबल झाली, अगदी आंतरराष्ट्रीय मल्ल झाली तरीसुध्दा ती स्त्रीचं असते. तिने कितीही बाहुबल कमावले तरी तिला छेडणाऱ्या हातांना ती रोखू शकत नाही की त्याला दोषी सुध्दा दाखवू शकत नाही. शिक्षा करणे तर दूरच… स्त्री ही अबलाच असते.
शेवटी तुम्ही स्वतः ला भाग्यवान समजा की तुमच्यावर चा अन्याय टाहो फोडून तुम्ही जिवंत आहात…हातरस ची बेटी अन्याय सांगायला ही जिवंत राहिली नाही… चिन्मयानंदचे वास्तव सांगणारी तरुणी तुरुंगात गेली. त्या मानाने तुम्ही भाग्यवान समजा आणि बिल्कीस चे आरोपी सुटल्यावर तुमच्या अटकेच्या आग्रहाचे हसू येते… 13 माणसांचे खून करणारे सन्मानाने सत्कार घेत बाहेर येत असतील तर तसा ब्रिजभूषण चा सत्कार आणि अग्निदिव्यातून बाहेर आलो हे भाषण तुम्हाला आणखी काही वर्षांनी ऐकायचे आहे का..? इतकी उदाहरणे असताना का हट्ट धरताय तुम्ही…
तुम्ही कुस्तीपटू म्हणून नुरा कुस्ती शब्द आठवला. लुटूपुटूची कुस्ती खेळण्याला नूरा कुस्ती म्हटले जाते. या देशातील राजकारण आणि प्रशासन एकमेकांशी फक्त नुरा कुस्ती खेळत आहेत. फक्त समाधान करण्यापुरते कारवाई करतात… कुस्ती खेळात तयार झालेल्या तुमच्या नजरेला ही नुरा कुस्ती दिसत नाही का मुलींनो…?
शेवटी मला आज आठवण येते त्या भाग्यवान निर्भयाची. दिल्लीच्या रस्त्यावर तिच्यावर अत्याचार घडला आणि संपूर्ण देश तिच्या वेदनेने हलला… किमान तिच्यावरील अत्याचाराला देशाची सहानुभुती मिळाली म्हणून तिला मी भाग्यवान म्हणतोय…
10 वर्षात देश किती बदलला…
पण दिल्ली तीच आहे. तेव्हा मेणबत्ती घेणारे तिथेच आहेत. पण आज सन्नाटा आहे. त्याच शहरात आज तुम्ही त्याच प्रकारची तक्रार करताना दिल्ली आणि देशातील मध्यमवर्ग गप्प आहे. ब्रिजभूषणचा पक्ष वेगळा हवा होता का? म्हणजे निर्भयाचे भाग्य तुम्हालाही लाभले असते..?
तुम्हाला मेडल मिळाले तेव्हा घराघरात पालक आपल्या करियर करणाऱ्या मुलींना तुमची यशोगाथा सांगत होते आणि तरुण करियर करणाऱ्या मुली तुमचे फोटो DP ला ठेवत होत्या… त्या मुली आज कुठे आहेत? कुठे आहेत ते त्यांचे पालक? दिल्ली शहरातील लाखोंच्या संख्येने असलेल्या सुशिक्षित करियर करणाऱ्या महिलांना का नसेल वाटले यावे महिनाभरात तुमचे अश्रू बघायला तिथे? मला हे बदललेले चित्र आणि वाढती असंवेदशीलता जास्त वेदनादायक वाटते मुलींनो…
तेव्हा अशा माणसांच्या जगात का पणाला लावताय? तुमच्या आरोपांना अजिबात न मोजणारी पी. टी. उषा आज सरकारचे 9 वर्षाचे यश मोजणारे लेख लिहितेय. क्रिकेटचा देव यशाच्या स्वर्गात स्थितप्रज्ञ आहे… त्यांच्याकडून काही शिका. पी टी उषा सारखे राजकीय खुषमस्करीच्या धावपट्टीवर तिच्यापेक्षा जास्त वेगाने धावत सुटा… ब्रिजभूषण लोकसभेत आणि तुम्ही राज्यसभेत असाल…
तेव्हा उठा मुलींनो, घरी चला. आता कुठे एक महिना झालाय… त्यांचा रेकॉर्ड एक वर्ष दुर्लक्ष करण्याचा आहे… राकेश टिकैत सारे सांगतील… तेव्हा आणखी 11 महिने थांबू नका… या पोलादी पडद्यापुढे आजच्या काळात अब्रुचा विचार नाही परवडत आता…