अंधश्रद्धेच्या ‘जटेतून’ शेकडो महिलांची सुटका करणाऱ्या नंदिनी जाधव यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार

  • टीम बाईमाणूस

‘‘आजी, डोक्‍यावरच्या केसाच्या जटा सोडवा. तुमच्या मानेवर त्याचा मोठा भार पडलाय. जटात घाण आहे. त्याला वास येतोय, उवा आहेत, तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल’, असं या आजींना सांगून सांगून सगळेजण दमले. आजी म्हणायची, ‘‘नको गं बाई, जटा देवाच्या आहेत.’’ हे म्हणतानाही आजी घाबरायची. कदाचित तिलाही वाटत असावं, 20 वर्षे डोक्‍यावर असलेल्या या जटा काढाव्यात; पण भीतीचा पगडा तिच्यावर खूप होता. त्यामुळे ती नको नकोच म्हणायची…. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव डोक्यांवर जटांचं ओझं वाहणाऱ्या बाईला समजावत होत्या. पण बाई ऐकेनाच. नंदिनीताईसुद्धा तिच्यापेक्षा हट्टी. त्यांनी त्या आजींचा पिच्छा सोडलाच नाही. त्या तिच्या घरी जाऊ लागल्या, ओळख वाढवली, विश्वासाचे नाते तयार केले आणि अखेर आजीबाईंनी जटा काढून टाकण्याची तयारी दर्शवली. तासाभरात डोक्‍यावरच्या जटा निघाल्या. त्यातून उवांचा खच पडला; पण आजीच्या डोक्‍यावर आणि मनावर 20 वर्षे असलेला जटाचा भार हलका झाला.

केवळ याच आजीबाई नाहीत तर अशा जवळपास दोनशेहून अधिक महिलांच्या जटांना कात्री लावणाऱ्या पुण्याच्या नंदिनी जाधव… त्यांच्या याच कार्याची दखल घेत साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र फाउंडेशन या अमेरिकेतील मराठी माणसांनी स्थापन केलेल्या संस्थेचा समाजकार्य पुरस्कार (प्रबोधन) नंदिनी जाधव यांना आज जाहीर झाला आहे.

अनेक महिला डोक्यावर जट घेऊन फिरताना दिसतात. खरतर केसांची निगा व्यवस्थित राखली नाही. केसांना वेणी-फणी केली नाही तर मग महिलांच्या केसात अशा प्रकारच्या जटा निर्माण होतात. एखाद्या महिलेच्या डोक्यात अशा प्रकारची जट झाल्याच दिसल्यास संपूर्ण समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आजही याबाबत लोकांच्या मनात खूप अंधश्रद्धा आहेत. अनेक उच्चशिक्षित लोक देखील अशा अंधश्रद्धेला बळी पडतात. बायकांच्या डोक्यातल्या जटा हा आजही सामाजिक प्रश्‍न आहे. जटांचा संबंध श्रद्धेशी, पाप-पुण्याशी जोडला जात असल्यानं जटांना हात लावायला कुणी धजावत नाही आणि म्हणून कित्येक जणी अशा नजरेस येत राहतात. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत नंदिनी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत जनजागृती करत असून ही एक अंधश्रद्धा आहे आणि जट होण्यामागे नक्की शास्त्रीय करणे काय आहेत हे लोकांना समजावून सांगत आहेत. राज्यातील 16 जिल्ह्यांत आठ हजार किलोमीटरचा प्रवास करीत त्यांनी 191 महिला, तरुणींचे जटनिर्मूलन केले. पण, तिथे गेल्या आणि जट काढली, असे झाले नाही.

एका वृद्ध स्त्रीची जट कापताना नंदिनी जाधव

ब्युटिशियन्स आहेत, मात्र आता एकच ध्यास

मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातल्या नंदिनी जाधव या खरं तर मेकअप आर्टिस्ट. ब्युटिशियन्ससाठी महत्त्वाचा असणाऱ्या लंडनच्या सिडास्कोमधून त्यांनी पार्लरसंबंधी सखोल प्रशिक्षण घेतलंय. कॉलेजवयात त्या व्हॉलिबॉल, भालाफेक या खेळात राष्ट्रीय खेळाडू राहिल्यात. व्हॉलिबॉलच्या सांघिक पातळीवर राष्ट्रीय खेळाडू म्हणून सलग पाच वर्षं खेळत होत्या. उंचपुऱ्या, शिडशिडीत बांध्याच्या, ‘रॉयल एनफिल्ड’वर रुबाबदारपणे वावरणार्‍या नंदिनी जाधव यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वावर खेळाडूपणाची छाप दिसतेच. त्यांचं एकूण व्यक्तीमत्त्वच धडाकेबाज असलं तरी त्या प्रचंड संवेदनशील आहेत. बी. ए.चं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी स्त्री अभ्यास केंद्रातून शिक्षण घेतलं. त्यानंतर एमएसडब्ल्यू केलं. पहिल्यापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. विधवा, परित्यक्त्या महिलांना फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस शिकव, शाळेत लाठीकाठीचे प्रशिक्षण घे, ग्रामीण महिलांना मोफत प्रशिक्षण दे, अशा प्रकारची कामं त्या करत होत्या. त्यांनी रेड लाईट एरियामध्ये दोन वर्षं काम केलं. तसेच अंध, अपंग, अनाथ आश्रममधील मुलांसाठी विविध क्राफ्टचं मोफत प्रशिक्षण शिबिर घेणं अशा विविध स्वरूपातील कामं त्या करत होत्या. मात्र 2012 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी त्यांचा परिचय झाला आणि त्या तेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडल्या गेल्या.

समितीसोबत काम करताना त्यांना महिलांचे प्रश्न अधिक जवळून कळू लागले. त्यांच्यात उपजत असणाऱ्या कार्यकर्तेपणाला दिशा मिळाली. आणि काहीच दिवसात त्यांच्याकडे जट निर्मूलनाचं पहिलं प्रकरण आलं. नंदिनी जाधव सांगतात, ‘आठ मार्च 2013 रोजी पुण्यातल्या जनवाडी भागात हा प्रसंग घडला. तिथल्या 16 वर्षांच्या मुलीच्या डोक्यात जट दिसली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी घाबरून तिला शाळेतून सोडवून घरी बसवलं होतं आणि ते तिला कर्नाटकातील सौंदत्ती देवीच्या मंदिरात नेऊन देवदासी होण्यासाठी सोडणार होते. त्या मुलीच्या मैत्रिणींनी ही माहिती अंनिसपर्यंत पोहोचवली. आम्ही लगेच तिच्या घरी पोहोचलो. सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांनी आमच्या घराचा मामला आहे म्हणत हाकललं. पण आम्ही धीर सोडला नाही. दिवसभर बसून राहिलो, त्यांना जट कशी येते सांगू लागलो. देवीचा कोप होत नाही हे समजावलं, बराच काथ्याकूट केला. मी जटा कापणार आहे; त्यामुळे जो काही कोप व्हायचा तो माझ्यावर होईल, असं निर्वाणीचं सांगितलं. माध्यमांतही ही बातमी पसरली. दबाव निर्माण झाल्याने शेवटी ते तयार झाले. 16 वर्षांची मुलगी पुढच्या भयंकर प्रतापातून वाचली.’

डोक्यातून जट काढणे सोपे, पण मनातून काढणे जिकिरीचे

नंदिनी जाधव यांना अनेक वेळा संघर्षाचा सामना करावा लागलाय, तर काही ठिकाणी 3-3 वर्षे समुपदेशन करून जट काढण्यात यश आले आहे. जट येणे म्हणजे देवीची कृपा नव्हे, तर अस्वच्छतेमुळे केसात निर्माण झालेला गुंता आहे, हे पटवून देण्यात त्यांनी शक्ती पणाला लावली. संयमाने समुपदेशन आणि वेळप्रसंगी कायद्याचा दट्ट्या दाखवून अंधश्रद्धेच्या जोखडातून त्यांनी अनेकींना मुक्त केले. राज्यभरातून महिला त्यांच्याकडे मदत मागतात अन् क्षणाचाही विलंब न लावता नंदिनी हजारो किलोमीटर पदरमोड करुन महिलांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी जातात. अंधश्रद्धाविरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी त्या 49 दिवस 26 जिल्ह्यांत फिरत होत्या. यासोबतच तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठीही आणि मांत्रिक, बुवाबाजी वगैरेंमुळे महिलांचे होत असलेले शाेषण रोखण्यासाठीही त्या काम करतात. स्त्रियांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बळावण्यासाठी तीन हजार व्याख्यानेही त्यांनी दिली. यापुढे जाऊन नंदिनी यांनी अशा सर्व स्त्रियांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना 13 प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचाही प्रयत्न केला आहे.

जट डोक्यावरून काढणे तसे सोपे, पण ती मनातून काढणे अत्यंत जिकिरीचे आहे. एकेका महिलेला समजावण्यासाठी वारंवार जाणे, संयमाने तिच्या शंकांचे निरसन करणे, जटांचे शास्त्रशुुद्ध कारण पटवून देणे, यांवर माझा भर असतो. आधी महिलेला आणि त्यापुढे जाऊन तिच्या कुटुंबातील व्यक्तींना तयार करणे हे मोठे आव्हान असते. कारण, महिलेची जट काढली तर कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू होईल, ही भीती घातलेली असते. मग, मृत्यू किंवा संकट नको म्हणून तिला कितीही त्रास होत असला, तरी जट सांभाळण्याची सक्ती केली जाते, असे त्या म्हणतात.

जटा निर्माण कशा होतात?

नंदिनी जाधव सांगतात की, “जटा या बहुतेककरून मानेपासून सुरू होतात. तिथून नीट कंगव्यानं विंचरलं जात नाही. अनेकदा केसांना तेल लावलं जात नाही. मग त्यात धूळ, माती किंवा काहीतरी कचरा केसांत जाऊन अडकतो. केस नीट विंचरले जात नाहीत तसे स्वच्छ धुतले जात नाहीत. शॉम्पूने नीट न धुतल्यानं केसातली घाण तशीच राहते आणि त्याचा गुंता तयार होत जातो. तो मानेवरच्या केसांमध्ये अडकल्यानं वर चटकन दिसतही नाही. पुढे त्यात केस अडकत जातात आणि जट निर्माण झाली असं लोकांना वाटतं.’’

अशा जटा निर्माण होण्यामध्ये काही वेळा बायकांच्या कामाचं स्वरूपही कारणीभूत असतं. कचरा वेचणं, वाळू-मातीतलं काम करणं, शेतातलं काम करणं. त्यांच्या कामातून कचरा, माती किंवा शेतकरी बायांबाबत एखाद गवत केसात अडकतं आणि पुढे जटा तयार होतात. त्यांनी लगेच एक उदाहरण दिलं. एकदा तरुणीच्या केसात जटा निर्माण झाल्या होत्या. खोदून खोदून विचारल्यावर कळालं की, ती उडदाच्या पापड्या करण्याचा व्यवसाय करते. पापड लाटताना तिनं कधीतरी मानेवरचे केस मागे सारले, तेव्हा त्यात उडदाचं चिकट पीठ लागलं असणार. असं सतत होत गेलं आणि जट झाली.

थोडक्यात केसांची अस्वच्छता हा जटांना आमंत्रित करणारा प्रकार. आपले केस स्वच्छ धुणं, गुंता झाल्यास नीट सोडवणं, एक एक केस मोकळं करणं, वेळोवेळी तेल लावणं या गोष्टी केल्यास जटा होण्याचं कारणच नाही.

(सौजन्य : दिव्य मराठी)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here