शाहिरा केशर जैनू चाँद : एका लढ्याची अखेर!

लोकशाहीर कॉ. अमर शेख यांच्या कला पथकातील सहकारी शाहिरा केशर जैनू चाँद यांचे आज दु:खद निधन झाले. मुंबईतील सातरस्ता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वृद्धापकाळाने वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. शाहिरा यांनी पती जैनू चाँद, अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गिरणी कामगारांच्या चळवळीत प्रबोधनाचं मोठं काम केले होते. केशरबाईंच्या प्रत्यक्ष भेटीच्या आठवणींना उजाळा दिलाय मुक्त पत्रकार नम्रता भिंगार्डे यांनी…

  • नम्रता भिंगार्डे

शाहीर म्हटलं की डोळ्यांसमोर तुर्रेदार फेटा घातलेला, हातातला डफ घट्ट धरून मिशी पिळत उभा ठाकलेला मर्द गडी येतो, किंबहूना सध्या येता जाता मराठीचा (फुका) भिमान साजरा करणारे असेच काहीसे शाहीर जागोजागी सादरीकरण करताना दिसतात. महाराष्ट्रात अजूनपर्यंत मनोरंजनापर्यंत मर्यादीत असलेल्या शाहीरीला अण्णा भाऊ साठे, अमरशेख, आत्माराम पाटील यांनी चळवळीत आणलं आणि शाहीरी ‘ऊठा, लढा, एकजुट व्हा‘ ची भाषा बोलू लागली. हे शाहीर गेले, लढा गेला, चळवळही गेली उरले शाहीरांचे वारस….

संबंधित लेख :

शाहीर अमरशेखांचं घर शोधत मी पोहोचले मुंबईतल्या सातरस्ता भागात. माझ्या मनात अमरशेखांचं रुप होतं. केस पिंजारलेले, धोतर कुर्त्यात, डाव्या हातात डफ घेऊन त्वेषाने गाणारे…. सातरस्त्यावर हाजी कासम चाळ सापडली आणि बाचकतच पुढे पुढे चालत राहीले. ‘शाहीर अमरशेख मार्ग‘ अशी पाटी दिसली आणि माझी नजर अमरशेखांचं घर शोधू लागली. एका साध्याशा गल्लीच्या तोंडावर ‘शाहीर अमरशेख मार्ग‘ अशी पालिकाछाप निळी पाटी लावलेली दिसली आणि मी आत वळले. चौकशी केल्यावर तिथल्या बाईने एका घराकडे बोट दाखवत म्हटलं, ‘याच घरात अमरशेख राहत होते.’ मी अनिमिष नजरेने इतिहासाच्या त्या साक्षीदाराकडे पाहून घेतलं. डफावर थाप मारून सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे आणि आपल्या कवनांनी ‘अमर‘ झालेले शाहीर अमरशेख त्या घरात राहत होते याची कसलीही खुण त्या घरावर नव्हती. मल्लिका अमरशेख यांनी ते घर कोणा अनिल घाटे यांना विकलं. शेजारची एक म्हातारी सोडली तर काही वर्षांत अमरशेख नावाचं वादळ याच चारभिंतीत स्थिरावत होतं हे सांगण्यासाठी कोणाही उरणार नाही हे वास्तव आहे.

केशर जैनू शेख

अमरशेखांच्या शेजारची ही म्हातारी म्हणजे शाहीर जैनू शेख चांद यांची पत्नी शाहीरा केशर जैनू शेख. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या धुसर होत चाललेल्या आठवणींचा जर्जर ठेवा जपत केशर जैनू शेख या मुंबईतल्या सातरस्त्यावर असलेल्या बारा फुटांच्या अंधाऱ्या खोलीत राहतात. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या शाहीर अमरशेख यांनी आपल्या आवाजाने चेतवत ठेवला त्या अमरशेखांचे सख्खे शेजारी म्हणजेच शाहीर जैनू शेख चांद आणि केशर जैनू शेख! अमरशेख यांच्या कलापथकात गाणारी, नाचणारी पोर म्हणून केशर लहान्या वयात सामील झाली. अमरशेख यांचं बोट धरून केशर आणि जैनू शेख हे जोडपं महाराष्ट्र पायथा घालत होतं.

90 वर्षांच्या केशरबाईंनी मला आत्मियतेने घरात बोलावलं. मळकट भिंतीवर शाहीर अमरशेख आणि शाहीर जैनू यांच्या तसबिरी लावलेल्या होत्या. शाहीरांना ढिगानं मिळालेल्या मानपत्रं, पुरस्कार यांच्यामुळे कळकट भिंतीचं द्रारिद्र्य लपत होतं. त्याच्याच खाली एका लहानग्या मुलीचा फोटो लावलेला दिसला. “ही आम्रपाली, माझी मुलगी. पिठलं भाकरी खाऊन दिवस ढकलंत होते. तेव्हा ना संसाराचा विचार केला ना मुलांच्या भविष्याचा. ध्येय एकच होतं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र! त्याच काळात आम्रपाली आजारी पडली आणि तिच्या उपचारासाठी पैसा नसल्याने आम्ही तिला गमावली.” पाणी भरल्या डोळ्यांनी आम्रपालीच्या तसबिरीकडे पाहत केसरबाई सांगत होत्या. त्या भेटीत केसरबाईंनी मला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातली अनेक गाणी खड्या आणि सुरेल आवाजात गाऊन दाखवली. शाहीर अमर कलापथक घेऊन ते कसे महाराष्ट्रभर फिरले याच्या सुरस कहाण्या सांगण्यात केसरबाई रमून गेल्या. माझं लक्षं मात्र त्यांच्या घरातल्या परिस्थितीकडे लागलं होतं. बंद पडलेल्या शाहीर अमर कलापथकाचं सामान भरलेली एक मोठी ट्रंक टेबलाखाली निपचित पडली होती. चळवळीत कडालेले डफ, ढोलकी, झांज गेल्या कित्येक वर्षांपासून त्यात गपगार पडून राहिलेत.

शाहिरांना मिळालेले मानपत्र आणि पुरस्कार

केशरबाईंचा मुलगा निशांत जैनू शेख शाहीरीचे कार्यक्रम करतो. शिक्षण पुरेसं नाही आणि चार दोन ठिकाणी नोकऱ्या करू शकला नाही म्हणून शाहीरी ‘जपतोय‘. घरची परिस्थिती बेताचीच.

दरवर्षी 1 मे महाराष्ट्र दिनी सरकार, पत्रकार, टिव्हीवाले ज्यांच्या आरत्या गातात त्या शाहीरांना आठवायला हा वर्षातला एकच दिवस मिळतो. श्रीमंतांच्या दक्षिण मुंबईत कामगार आणि शेतकरी यांनी हातात मशाल पकडलेलं हुतात्मा स्मारक आहे. हजारो मुंबईकर तिथून ये जा करतात. लॅण्ड मार्क म्हणून किंवा मिटींग पॉईंट म्हणून अनेकजण या स्मारकाचा उल्लेख करतात. ‘कम टू हुतात्मा स्मारक‘ असं फोनवर पलिकडच्या व्यक्तीला सांगण्याइतपतच त्याचा उपयोग राहिलाय. शाहीर कधीच काळाआड गेले, त्यांची शाहीरी शासनाच्या संदर्भग्रंथांमध्ये निपचित पडली. त्या काळात शेकडोंनी गाणी लिहली गेली पण त्यांच्या चाली सांगू शकतील अशा व्यक्ती एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिल्या आहेत.

त्यातल्याच एक होत्या शाहीरा केशर जैनू शेख…

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here