- सुकेशनी नाईकवाडे (बीड)
इंग्रजी वर्षानुसार चौथ्या महिन्याच्या 1 तारखेला “एप्रिल फुल” म्हणून अनेक लोकांना मूर्ख बनवले जाते. ही पद्धत जनमानसांत फार रूढ झालेली आहे. मात्र परळी येथील काही सुजाण नागरिकांनी एक संदेश असलेली पाटी झाडाला लटकवली असून या झाडाला पाणी देखील दिले आहे. या पाटीवर “परळीला एप्रिल फुलच्या ऐवजी एप्रिल कुल करा” या आशयाचा संदेश दिला आहे. आज हा उपक्रम राबवण्यामागचा हेतू पाहता परळी ही डोंगर दऱ्यानी नटलेली आहे मात्र, या परळीच्या वैभवाला प्रदूषणाची कीड लागली आहे. हळू हळू डोंगर ही पोखरली जात असून या डोंरातील झाडांची ही खुले आम कत्तल केली जात आहे. त्याठिकाणी सिमेंट अन काँक्रेटची जंगले उभारली जात आहेत.
उद्योग व व्यवसायच्या दृष्टीने या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. परिसरात सिमेंट फॅक्टरी, तर साखर कारखाने सुद्धा उभारण्यात आले. हजारो हाताला काम ही मिळाले मात्र लाखो लोकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले. औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या लाखो टन राखेपासून परळी परिसरात जणू विटभट्ट्यांची रांगच उभारण्यात आली आहे. अन बघता बघता याच डोंगर दऱ्यांच्या कुशीत या 4000 हजार अवैध विटभट्ट्यानी जणू आपली जागाच कायम केली अन संबंध परळीला जणू विळखा घातला. जसा महादेवाच्या पिंडीला नाग विळखा घालतो अगदी त्याच पद्धतिने परळी या गावाची परिस्थिती पाहवयास मिळते.

या उद्योगामुळे भलेही काही हाताला काम मिळाले मात्र लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हवेत पसरलेले धुळींचे कण श्वासामार्फत माणसांच्या फुफ्फसांत जात असून यामुळे अनेकांना श्वासाचे आजार झाले आहेत, डोळ्यांना त्रास होत आहेत. अनेक प्रकारच्या ऍलर्जी झाल्या आहेत. तर कॅन्सरचे प्रमाण या भागात खूप वाढले आहे. लहान मुलांना निरोगी वातावरण मिळत नाही, म्हणून या ठिकाणचे बालक नेहमी आजारी पडतात, त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे.
तर परळीकरांचे आयुष्य हे घटत जात असल्याचे ही तज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे. म्हणून हे सर्व थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे असल्यामुळे भलेही निमित्य कोणतेही असो मात्र, यातून नक्कीच परळीला एप्रिल फुलच्या ऐवजी “एप्रिल कुल करा” या आशयाचा संदेश देत काही नागरीकांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला.