‘प्रोजेक्ट टायगर’ची पन्नाशी!

देशात वाघांची संख्या 3500 हून अधिक! देशात वाघांच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच वाघांची संख्या 3500 च्या पुढे गेली आहे. अधिकृत वाघांची संख्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • टीम बाईमाणूस

भारतातील वाघांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. 1 एप्रिल 1973 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट प्रकल्पात प्रोजेक्ट टायगरचा पाया रचला होता. ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, देशात प्रथमच 9 ते 11 एप्रिल दरम्यान कर्नाटकातील म्हैसूर येथे आयकॉन (ICCON) भारत संवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा लोगो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात वाघांच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच वाघांची संख्या 3500 च्या पुढे गेली आहे. अधिकृत वाघांची संख्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. करोनामुळे 29 जुलै 2022 रोजी वाघांच्या संख्येची आकडेवारी जाहीर होऊ शकली नाही, असे संशोधकांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संवर्धन योजनेमुळे देशात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या देशातील 53 व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या 3500 च्या पुढे गेली आहे.

दरवर्षी केंद्रीय वन, पर्यावरण, हवामान बदल मंत्रालय 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनी वाघांची संख्या जाहीर करते. 29 जुलै 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची एकूण संख्या 2967 असल्याचे सांगितले होते. जे 2006 च्या तुलनेत जवळपास दुप्पट होते. केंद्रीय वन, पर्यावरण, हवामान बदल मंत्रालय, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था आणि कर्नाटक वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील वन व्यवस्थापक, संरक्षक आणि वन संवर्धन क्षेत्र आदी विषय एकाच छताखाली आणणे हा परिषदेचा उद्देश आहे. बैठकीत वाघांच्या ज्वलंत समस्या तथा वन्यजीव संरक्षणासाठी उपाय शोधले जातील. तसेच वन संरक्षण क्षेत्रातील धोरण तयार करणे आणि इतर चर्चा होईल. देशात दर चार वर्षांनी वाघांची गणना केली जाते. उल्लेखनीय आहे की, देशात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाघांची संख्या 2006 मध्ये 1411 होती. 2010 मध्ये 1706, 2014 मध्ये 2226, तर 2018 मध्ये 2967 वाघांची संख्या आहे. अशा प्रकारे देशातील वाघांची संख्या वाढली आहे. या परिषदेत वाघांच्या संख्येचा लेखाजोखा पंतप्रधान जाहीर करतील. वार्षिक गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज आहे.

(सौजन्य : दैनिक लोकसत्ता)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here