- वर्षा कोडापे
तरुणाईची दिशा भटकवणारा हा अस्वस्थ काळ. पदव्यांची कागदपत्रं घेवून ‘पॅकेज’ च्या मागे काॅर्परेट दुनियेत शिरणारी अवतीभवती भरभक्कम आहेत. त्यात संवेदनेची भाषा बोलणारे गडप होत चाललेत. अभियांत्रिकीची पदवी घेवून ग्रामीण विकासात पदव्यूत्तर होणे हा त्याचा आवडीचा भाग. प्रवाहाच्या विरुद्ध मनाला पटेल तेच करायचं आणि जगायचं, हा ध्यास घेतलेला रवी चुनाकर नावाचा तरुण कार्यकर्ता वेगळ्या वाटेचा प्रवासी आहे.
गडचिरोलीच्या नक्षलप्रभावित अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या अतिदुर्गम गावचा हा सामाजिक जाणिवेने धडपडणारा कार्यकर्ता तरुण. या परिसरातील गावांचा शैक्षणिक अनुशेष भरायला पुन्हा बरेच दशक लागतील. चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तो अभियंता झाला. तो गावचा पहिलाच अभियंता. चांगली गुणवत्ता मिळवूनही इतरांपेक्षा हटके कामाच्या अंदाजाने त्याचा वेध घेतला. सामाजिक गतीशिलता त्याच्या मागावर होतीच. परिवर्तनाच्या लढाईत त्याची सोशल इंजिनिअरिंग सुरु झाली. सामाजिक प्रश्नांवर आता तो थेट भिडतो आहे. ग्रामीण विकासाला, आदिवासींच्या जल, जंगल, जमीन हक्काच्या संवर्धनासाठी लढतो आहे.

पद्मश्री डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांच्या मार्गदर्शनात ‘निर्माण’ शिबीरातून त्याला दिशा मिळाली. प्रत्यक्ष समाजात लोकांमध्ये मिसळून काम करण्याची अभिलाषा जागली. निर्माणने त्याला समाजाभिमुख जडणघडणीसाठी ‘कर के देखो’ फेलोशीप दिली. त्याने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात शिक्षण व आदिवासींचे अधिकार याबाबत अभ्यास केला. कार्यकर्ता म्हणून वर्षभर समस्यांच्या शोधात कामाला सुरुवात केली. त्याच्या जाणीवा मोठ्या विस्तारत गेल्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 2017 साली महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशीप’ सुरु केली.
या राज्यव्यापी फेलोशीपच्या पहिल्याच निवड प्रक्रियेत रवीची निवड झाली. या अंतर्गत तो कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायतीत तीन वर्षे विकासात्मक कामे करत राहिला. प्रत्यक्ष लोकांत मिसळला. गावाचा विकासात्मक आराखडा तयार केला. शासनाच्या करोडो रुपयांच्या योजनेची अंमलबजावणी केली. हे गाव स्मार्ट व्हिलेज ठरले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात चमकले. फेलोशीप नंतरही रवीने या गावाशी नाळ तोडली नाही. ती त्याची कायम कर्मभूमी झाली.
कुरखेड्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ.सतीश गोगूलवार व शुभदा देशमुख यांच्या सहवासात त्याच्या मार्गक्रमणाला टर्नींग पाईंट गवसला. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ सोबत त्याने नक्षल प्रभावित कोरची तालुक्यात आदिवासींच्या हक्काची जाणीव जागृती करण्यात पुढाकार घेतला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या नामवंत संस्थेत रवीची संशोधक म्हणून निवड झाली. कोरची तालुक्यातील वनहक्क प्राप्त गावांचा अभ्यास व त्या आधारित कार्ययोजना तयार करण्यासाठी तो प्रत्यक्ष गावागावात जावून बैठका घेतो आहे. लोकांना वनहक्क, पेसा, जैवविविधता कायदा समजावून सांगतो आहे. त्याची गरज पटवून देतो आहे. ग्रामसभा सक्षमीकरणासाठी धडपडतो आहे.

‘इंडियन स्कूल ऑफ बिजनेस’ च्या प्रकल्पात तो विशेष तज्ञ म्हणून योगदान देतो आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गौण वनोपजाचा रवी अभ्यास करतोय. गौण वनोपजाचे नियोजन करून येथील मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत तो प्रयत्न करतोय. गौण वनौपजातून आर्थिक समृद्धी या परिसरात घडवून आणण्यासाठी रवी क्रियाशील आहे. त्याची शिकण्याची प्रक्रिया थांबणारी नाही. परदेशात जावून उच्चशिक्षण घ्यावे व परत मातीच्या सेवेत तत्पर व्हावे, या स्वप्नाला साकारण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय.
रवी प्रचंड आशावादी आहे. गावगाड्यातून आलोय, याचा कुठलाही न्यूनगंड त्याच्यात नाही. ‘खूद मरे बिगर स्वर्ग नही दिखता.’ इतका तो पारदर्शक आहे. त्याची शोधक वृत्ती येथील संस्कृतीला सभ्यतेने वंदन करते. खरेतर तांत्रिक शिक्षणानंतरही गलेलठ्ठ पगाराच्या नौकरीचा तो विचार करत नाही. जगण्यातला आनंद, सुख, समाधान तो समाजाभिमुख कामात अनुभवतोय. तळागाळात काम करण्यासाठी आश्वस्त असतो. हे त्याचं सोशल इंजिनिअरींग समाजाच्या उत्थानाला दिशादर्शक आहे.