रंगूचा ‘वात्सल्यमूर्ती’ सुलोचना दीदीपर्यंतचा प्रवास…

पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या असंख्य आठवणी सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांच्याकडे आहेत.

  • दिलीप ठाकूर

‘विठू माझा लेकूरवाळा’ या मराठी चित्रपटाच्या सेटवरची ही गोष्ट! चित्रपटातील एका करुण प्रसंगाचे चित्रीकरण सुरु होते, देवाचा कंठा चोरण्याचा आळ जनाबाई (सुलोचनादीदी) यांच्यावर येतो. ती देवाच्या पुढ्यात येऊन चिडून देवाला खूप शिव्या घालते आणि आर्त किंकाळी मारते व तेथेच कोसळते…

कॅमेरा सुरु झाला, दृश्य सुरु झाले, पण सुलोचनादीदीनी यावेळी अशी काही किंकाळी मारली की त्यांचा तो आर्त स्वर सेटवर असलेल्या प्रत्येकाचे काळीज कापीत गेला. दृश्याचं शूटिंग संपले आणि या चित्रपटात नामदेवांची भूमिका साकारणारे अरुण सरनाईक पुढे येत सुलोचना दीदींच्या पायाला स्पर्ष केला. अरुण सरनाईक यांचे डोळे पाणावले होते. ते दीदीना म्हणाले, बाई, आता जो अभिनय केलात त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत… सुलोचना दीदींना मिळालेली ही उत्कट दाद होती. तशी ती त्यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेकदा तरी मिळाली. कधी कलाकारांकडून, कधी समिक्षकांकडून तर अगणित वेळा रसिक प्रेक्षकांकडून…

खरं तर ‘सुलोचनादीदी’ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा एक चेहरा. सुलोचनादीदी असं म्हणताक्षणीच डोळ्यासमोर एव्हाना आले असेल ते मराठी चित्रपटातून जपलेल्या मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतिक! हे त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राला असलेले खूपच मोठे देणे आहे आणि त्यांची एकूणच दीर्घकालीन विविधतापूर्ण अभिनय वाटचाल पाहता त्यांना अतिशय मानाच्या अशा “दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्या”त यायला हवे. सुलोचनादीदीनी नायिका म्हणून रुपेरी कारकिर्द सुरु केल्यावर मग ताई, वहिनी, आई, आजी असा खूपच मोठा प्रवास अनुभवला. रसिकांच्या किमान चार पिढ्या ओलांडूत त्यांनी अभिनय प्रवास केला. त्यांच्यासाठी “वात्सल्यमूर्ती” हा एकच शब्द त्यांच्या कार्यकर्तृत्व आणि प्रतिमा यासाठी परफेक्ट ठरतो.

सुलोचना यांचे मूळ नाव रंगू दीवाण. कोल्हापूरजवळच्या खडकलाट या खेड्यात त्यांचा 30 जुलै 1929 रोजी जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रपट पाहण्याची विशेष आवड होती. मा. विनायक यांना एकेकाळी शिकवलेल्या शिक्षकांशी या रंगूच्या वडिलांचा परिचय होता. त्यांच्या ओळखीने रंगूला मा. विनायक यांच्या ‘प्रफूल पिक्चर्स’ या कंपनीत प्रवेश मिळाला. मा. विनायक यांनी रंगूला ‘चिमुकला संसार ‘ या चित्रपटात छोटीशी भूमिका दिली. रंगूची भाषा, खेडवळपणा यामुळे स्टुडिओतील लोक त्यांची थट्टा करायचे. प्रफुल्ल पिक्चर्सचा मुक्काम कोल्हापूरवरुन मुंबईला हलला तेव्हा त्या कोल्हापुरातच भालजी पेंढारकर यांच्या प्रभाकर स्टुडिओत दाखल झाल्या.

Sulochana Latkar - baimanus

1946 मध्ये प्रभाकर पिक्चर्सच्या ‘सासूरवास’ या चित्रपटात भूमिका साकारली. तर ‘करीन ती पूर्व’ या नाटकाच्या वेळी भालजीनी त्यांचे नाव ‘सुलोचना’ असे केले. आणि मग 1947 साली त्या ‘जय भवानी’ या चित्रपटात नायिका झाल्या आणि त्यांची अभिनेत्री म्हणून वाटचाल आकार घेऊ लागली. भालजी पेंढारकर यांच्या अतिशय शिस्तबद्ध काम आणि प्रशिक्षणातून ‘सुलोचना’ हे प्रातिनिधिक नाव झाले. त्यानंतर त्यांनी त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याबाबत त्यांना अष्टपैलू अभिनेत्री असे कौतुकाने म्हणायला हवे, तोच त्यांचा गौरव ठरेल. कधी गरीब शेतकरी कष्टकरी शेतकरीची पत्नी तर कधी ब्राह्मणाच्या संसारात कोंड्याचा मांडा करणारी स्री, तर कधी राजघराण्याच्या, मराठा सरदारातील घराण्याचा आब राखून असलेली करारी स्री, कधी प्रेमळ पत्नी तर कधी वात्सल्य मूर्ती! ‘तारका’ आणि ‘भाऊबीज’ या चित्रपटात त्यांनी आपल्या या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका साकारली.

सुलोचना असं म्हणताक्षणीच मीठ भाकर, जय जवानी, जिवाचा सखा, बाळा जो जो रे, स्री जन्मा ही तुझी कहाणी, चिमणी पाखरं, वहिनीच्या बांगड्या, प्रपंच, एकटी, महाराणी येसूबाई, माझं घर माझी माणसं, मराठा तितुका मेळवावा, लक्ष्मीची पावले, मीठभाकर, मोठी माणसं, शिलंगणाचे सोने, देव पावला, जोहार मायबाप, सतीची पुण्याई, दूधभात, स्री जन्मा तुझी ही कहाणी, अन्नपूर्णा, महाराणी येसूबाई, ओवाळणी, मी तुळस तुझ्या अंगणी, भाऊबीज, सुखाचे सोबती, आकाशगंगा, पतिव्रता, पंचारती, भाव तेथे देव, प्रपंच, छोटा जवान, फकिरा, मोलकरीण अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. आणि ‘मराठी चित्रपट म्हणजे सुलोचना दीदी असे नकळतपणे समीकरण होत गेले.

त्याच वाटचालीतील मराठी चित्रपटसृष्टीतील नायक चंद्रकांत मांडरे यांच्यासोबत सुलोचनादीदीनी तब्बल 46 चित्रपटात भूमिका साकारली. तर ‘वहिनीच्या बांगड्या ‘ या चित्रपटाच्या यशाने त्याना वहिनी आणि ताई अशी आदरयुक्त प्रतिमा प्राप्त झाली. तरी काही भूमिकांचा विशेष उल्लेख करायला हवा. ‘मीठ भाकरं’मधील साधी भोळी पार्वती, ‘जिवाचा सखा ‘मधील तेजस्वी चंद्रा, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ‘मधील भावाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून चंदनाप्रमाणे झिजणारी अक्का, ‘वहिनीच्या बांगड्या ‘मधील आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी झटणारी वहिनी, ‘माझं घर माझी माणसं’ मधील डाॅ. इरावती, ‘देव पावला’ मधील साधी भोळी कौशल्या, कुटुंब नियोजनाचा प्रचार करण्यासाठी खेडोपड्यातून पायपीट करणारी ‘प्रपंच’ मधील तेजस्वी पारु, दमेकरी पतीचा फाटका संसार त्याच्या चार अपत्यासह नेटाने सांभाळणारी’तू सुखी रहा ‘मधील पारू, नातवाचं मुख पाहण्यासाठी तडफडणारी नि अखेर ती इच्छापूर्ती न होताच तडफडून निधन पावणारी ‘एकटी’ मधील मधुची आई… सुलोचना दीदींचे अष्टपैलूत्व यात दिसतेय तसेच त्या काळात मराठीत अनेक प्रकारच्या गोष्टी पडद्यावर येत हेदेखील अधोरेखित होत आहे.

Sulochana Latkar - baimanus

हे सगळे घडत असतानाच ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर आदि मातब्बर मराठी साहित्यिकांची पुस्तके वाचल्यावर त्यांच्या भाषेत शहरीपण आले. त्याचे त्यांना कायमच अप्रूप वाटते.
त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील अशीच एक वेगळी गोष्ट सांगायला हवी, ‘प्रपंच’ या चित्रपटातील गावातील एका कुंभारणीच्या भूमिकेसाठी सुलोचना दीदीना निर्मात्याकडून नेसण्यासाठी नवीन साड्या देण्यात आल्या. पण यामुळे ही भूमिका योग्य वठणार नाही असे वाटल्याने त्यांनी त्या साड्या गावातील गरीब बायकांना दिल्या आणि त्यांच्याकडील जुन्या, जीर्ण साड्या घेऊन त्या नेसल्या. यामुळेच आपण या चित्रपटातील व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकू असा त्यांना विश्वास होता आणि झालेही तसेच. या भूमिकेसाठी त्यांना पहिल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.

सुलोचनादीदीनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही खूप मोठ्या प्रमाणात भूमिका साकारल्या. ‘चिमणी पाखरं’ या मराठी चित्रपटाची ‘नन्हे मुन्ने’ या नावाने रिमेक निर्माण करण्यात आली. तो सुलोचना यांचा पहिला हिंदी चित्रपट होय. सपनो का सौदागर (या चित्रपटात त्यांनी हेमा मालिनीच्या आईची भूमिका साकारली), औरत तेरी यह कहानी, सुजाता, झूला, संघर्ष, मेहरबान, रेश्मा और शेरा, नई रोशनी, मेरा घर मेरे बच्चे, अब दिल्ली दूर नहीं, आयी मिलन की बेला, आए दिन बहार के, दुनिया, आदमी, जाॅनी मेरा नाम, धर्मात्मा,मजबूर, कसौटी, संन्यासी, कोरा कागज, कटी पतंग, प्रेम नगर, तलाश, रामपूर का लक्ष्मण, हीरा, गंगा की सौगंध, टाडा, भोला भाला अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटात त्यानी प्रामुख्याने चरित्र भूमिका साकारल्या आणि त्यामुळे त्यांना पुढील पिढीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारायची संधी मिळाली.

तसेच नवीन पिढीतील कलाकारांचेही चांगले अनुभव त्यांना आले. तर हिंदीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर पौराणिक चित्रपटातही भूमिका साकारल्या. गजगौरी, गौरी पूजा, राम लक्ष्मण, नारीपरीक्षा, शेषनाग, पतितपावन, गोकुलका चोर, सति अनूसया, जय अंबे, द्वारकाधीश, बालयोगी, भक्त कबिर, एकादशी अशा अनेक पौराणिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. सुलोचना दीदीनी बंदिनी, चाळ नावाची वाचाळ वस्ती, कुणासाठी कुणीतरी या दूरदर्शन मालिकेतही भूमिका साकारलीय.
प्रेषक आणि चित्रपट यापासून आपण वेगळे होऊच शकत नाही अशीच त्यांची भावना आहे. सिनेमा, आपले गुरु आणि जनता जनार्दन यांनी आपणास मोठे केले, वैभव प्राप्त करुन दिले असे त्या मानतात. प्रेक्षकांना आपण ‘चित्रपटाच्या जगातील आहोत’ असं न वाटत, आपल्यातीलच एक वाटतोय असे त्या मानतात.

Sulochana Latkar - baimanus

बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर अशा राजकीय नेत्यांशी सुलोचनादीदींचे कौटुंबिक संबंध. एका वर्षी तर बाळासाहेब ठाकरे दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी आले. हा क्षण त्यांना विशेष वाटला.

या प्रवासात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यातील काही उल्लेखनीय आहेत. भारत सरकारने त्यांना 1999 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या शुभ हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर महाराष्ट्र शासनाने त्यांना 1972 साली ‘जस्टीस ऑफ पीस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 1997 साली त्यांना ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ देण्यात आला. सुलोचना दीदींचे सार्वजनिक कार्यही खूपच मोठ्या प्रमाणात आहे. 1961 साली चिनी आक्रमणाच्या वेळी भारत सरकारच्या आवाहनानुसार त्यांनी तात्कालिक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आपल्या दिवंगत वहिनीचे सर्व दागिने दिले. तर 1965 च्या पाकिस्तान विरुध्दच्या लढाईच्या वेळी रक्तदान करणे, मुंबईच्या अश्विनी मिलीटरी हाॅस्पीटलमध्ये जखमी जवानांची भेट घेतली. त्यांनी काही काळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. 1990 साली मुंबई जवळच्या गावांना पुराचा प्रचंड तडाखा बसला, गावे उध्वस्त झाली, संसाराची वाताहत झाली, त्यावेळी सुलोचना दीदीनी अतिशय तातडीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संसारोपयोगी भांडी पाठवली. एका वाढदिवसाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी दीदींना शुभेच्छा दिल्या आणि वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वादही घेतले.

माझाही सुलोचनादीदी आणि कुटुंबाशी माझाही दीर्घकालीन परिचय आहे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या मलाही त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यायला आवडते. दीदींचे वाचन आणि दूरदर्शन पाहणे आणि चांगल्या गोष्टीना आवर्जून दाद देणे हा गुण विशेष असाच आहे. दशकभरापूर्वी मी साप्ताहिक लोकप्रभामध्ये ‘सुलोचना दीदी ते सई ताह्मणकर’ असा मराठी चित्रपटसृष्टीतील बदलत्या इमेजच्या अभिनेत्री असा लेख लिहिला होता, तो त्यांना आवडल्याचे कांचन घाणेकर यांनी आवर्जून सांगितले. सुलोचना दीदी स्वतः चांगले वागून इतरांपुढे कायमच चांगला आदर्श ठेवायच्या. उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन, आजूबाजूच्या जगाचे दर्शन, चित्रपटसृष्टीतील बरे वाईट अनुभव आणि त्यांच्या कला जीवनाच्या प्रारंभीच्या काळात भालजी पेंढारकर आणि सौ. लीलाताई तथा माई पेंढारकर यांनी त्यांच्यावर केलेले संस्कार यामुळे त्या बहुश्रुत बनल्या.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here