स्वतःच्या पैश्यातून मुलींसाठी योजना चालविणाऱ्या सरपंच बाई!

लातूर जिल्ह्यातील एका गावात एक अशी महिला सरपंच आहे जी त्या गावात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आणि त्या गावात होणाऱ्या प्रत्येक कन्यादानासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून योजना चालविणार आहे.

  • टीम बाईमाणूस

गावपातळीवर होणारे कुरघोड्यांचे राजकारण, निवडणुकीत होणारी पैश्यांची प्रचंड उलाढाल, राजकारण, भ्रष्टाचार हे शद्ब आपल्या अंगवळणी पडले आहेत पण लातूर जिल्ह्यातील बेंडग्याच्या सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी मात्र गावातील मुलींच्या आणि महिलांच्या विकासासाठी कंबर कसली आहे. केवळ निवडणूक जिंकेपर्यंत आश्वासने देऊन एकदा का निवडणूक जिंकली की या आश्वासनांचा विसर पडणाऱ्या राज्य आणि देशभरातील लोकप्रतिनिधींना एक धडाच जणू मोहरबाईंनी दिला आहे असं म्हणावं लागेल कारण 1 जानेवारी 2023 पर्यंत त्यांच्या गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी त्या स्वतःची पदरमोड करून एक योजना राबवित आहेत. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सुकन्या योजनेसाठी त्यांनी स्वतःचे पैसे देण्याचे ठरवले असून मोहरबाईंच्या या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

बेंडगा लातूर जिल्ह्यातले सतराशे लोकवस्तीचे गाव. या गावात काही महिन्यांपूर्वी मोहरबाई धुमाळ या सरपंच म्हणून निवडून आल्या. सरपंचपदाचा कार्यभार संभाळल्यापासूनच मोहरबाईंनी त्यांच्या कामाचा एकच धडाका लावून दिला आहे. एकामागून एक अनेक चांगले निर्णय त्या घेत असल्याचे गावकरी सांगतात. या योजनांमध्ये कन्यादान आणि सुकन्या योजनेचा समावेश आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी त्या कोणत्याही शासकीय निधीवर अवलंबून राहिल्या नाहीत. यासाठी लागणारा निधी त्यांनी स्वतः दिला आहे, तोही पुढील पाच वर्षासाठी.

संबंधित वृत्त :

काय आहेत योजना?

मुलाच्या जन्मदराच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी आहे. यासाठी सामाजिक मानसिकता कारणीभूत आहे. समाजाने मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणून नूतन सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी पहिल्याच ग्रामसभेत आपले पती आदर्श शिक्षक कै. तात्याराव कडाजी धुमाळ यांच्या स्मरणार्थ खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या नावाने गावात जन्मलेल्या मुलीसाठी सुकन्या योजना सुरू केली आहे. यात गावातील कोणत्याही घरात मुलगी जन्म घेत असेल तर अकरा हजार रुपये एफडी करण्यात येतील. तसेच येणाऱ्या पाच वर्षात गावातील ज्या मुलीचा विवाह होणार आहे त्या मुलीस भेट द्यावी या हेतूनं अकरा हजार रुपयाचे संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने गावातील कन्यादान होणाऱ्या प्रत्येक मुलीला संसार उपयोगी साहित्याचा आधार व्हावा म्हणून 11 हजार रूपयांचे साहित्य कन्यादान स्वरूपात देण्यात येणार आहे. गावातील सर्वांना याचा लाभ घेता येईल. त्यासाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही हे विशेष.

मोहरबाई तात्याराव धुमाळ यांचे पती कै. तात्याराव धुमाळ हे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्याच्या निधनानंतर मोहरबाई यांना पेन्शन मिळते. एक मुलगा आहे तो घराची सहा एकर बागायत शेती पहातो. यामुळेच मोहरबाई यांनी पेन्शनच्या पैशातून या कामासाठी लागणारा निधी देण्याचे ठरवले आहे. सरपंचपदी नुकत्याच विराजमान झालेल्या मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी ही योजना 1 जानेवारीपासून अमलात आणली आहे. याचा लाभ गावात जन्म घेतलेल्या दोन मुलींना झाला आहे. संपूर्ण गावच एक घर आहे या विचाराने आम्ही काम करतोय, पुढील पाच वर्षे असेच काम सुरू राहणार आहे, सात सदस्य आणि एक सरपंच असे आठ लोक गावाचा कारभार कुटुंबप्रमुखाच्या रुपात पहाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सरपंच पदासाठी निवडून आल्यानंतर गावाच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करावे अशी इच्छा होती. त्याची सुरुवात स्वतःपासून करावी यासाठी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या दोन योजना स्वत:च्या खर्चातून सुरू कराव्या असे वाटले. पहिल्याच ग्रामसभेत तशी घोषणा केली, 1 जानेवारी 2023 पासून योजना लागू केली. याचा लाभ गावातील दोन नवजात मुलींना झाला आहे. यासाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. गावात लेक जन्मली, गावातील मुलीचे लग्न जमले तर कळतेच की असे मत सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी व्यक्त केले आहे. गावाच्या विकासाला निधी मिळत नाही, योजना मंजूर होत नाहीत अशी तक्रार अनेक सरपंच करत असतात. मात्र गावाच्या सर्वागीण विकासासाठी फक्त सुरुवात स्वत:च्या घरातून केली तर एक छोटी पायवाट विकासाचा महामार्ग बनू शकतो.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here