- संजना खंडारे
नुकतेच राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतींचे निकाल लागले असून या निवडणुकीत अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना मागे टाकत विजय मिळवला. अनेक गावांचा गावगाडा हाकण्याची जबाबदारी गावकऱ्यांनी तरुणांना दिली. या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन 21 वर्षीय तरुणींनी देखील सरपंचपदाचा मान पटकावला आणि याची चर्चा राज्यभर होत असून या युवा महिला सरपंचांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोण आहेत या दोन तरुण तडफदार युवती सरपंच पाहुयात. यातील पहिली महिला सरपंच आहे अकोला तालूक्यातील नैराट ग्रामपंचायतीची नवनिर्वाचित सरपंच प्रिया सराटे. प्रियाचं वय अवघं 21 वर्ष 6 महिने इतकं आहे. नैराट ग्रामपंचायतीचं सरपंचपद यावर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होतं. नुकतीच बी. ए. झालेल्या प्रियाला आता गावाच्या विकासाची कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.
‘बीए’ची पदवी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रियाने आज गावगाड्यातील राजकारणाची मोठी परीक्षा ‘उत्तीर्ण’ केली. अन यात तिला पदवी मिळाली गावाच्या ‘सरपंच’ पदाची. प्रियाने नात्याने तिची आजी असलेल्या विजया सराटे यांचा 92 मतांनी पराभव केला. यासोबतच गावात झालेल्या सहा सदस्यांपैकी चार सदस्य तिच्या पॅनलचे विजयी झालेत. त्यामूळे संपुर्ण नैराट ग्रामपंचायतीवर प्रियाच्या पॅनलची स्पष्ट बहूमतासह सत्ता आली आहे. प्रियाला 284 मतं मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या विजया सराटे यांना 192 मतं मिळालीत. याआधीचा कोणताही राजकीय वारसा नसतांना प्रिया यांनी थेट सरपंचपदावर घेतलेली गरूडझेप गावकऱ्यांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय आहे. प्रियाला आता राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ‘एमए’ला प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, त्याआधीच त्या राज्यशास्त्राचं प्रत्यक्ष शिक्षण ग्रामपंचायतीच्या कारभारातून घेणार आहे.

गावकऱ्यांसह आई-वडील-भावानं दिलं निवडणुक लढण्याचं बळ
गावात सरपंचपदासाठीचं आरक्षण हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी असल्यानं अनेकांनी प्रियाचे वडील रामेश्वर सराटे यांना मुलीला उभं करण्याची विनंती केली. रामेश्वर यांना तीन मुली आणि एक मुलगा. या सर्वात प्रिया सर्वात धाकटी. प्रियानंही आनंदानं ही जबाबदारी स्विकारण्यास होकार दर्शविला. कारण, तिच्या या नव्या जबाबदारीसाठी तिच्या पंखांना विश्वासाचं बळ दिलं गावकऱ्यांसह तिच्या आई-वडिलांनी. तिची आई माया सराटे या निर्णयासह प्रचारातही तिच्यासोबत अगदी उत्साहानं सहभागी झाल्या. आज आपली लेक गावाची प्रथम नागरिक झाल्याचा मोठा आनंद तिच्या आई-वडीलांसह गावकऱ्यांना झाला. आज निकाल लागल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात तिचं स्वागत आणि अभिनंदन केलं. सरपंच प्रिया सराटे यांनी नव्या जबाबदारीचा विनम्रतापूर्वक स्वीकार करीत असल्याचं म्हटलं आहे. गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं टाकलेल्या जबाबदारी कधीच तडा जाऊ देणार नाही असे त्या म्हणाल्या . नैराट गाव खारपाण पट्ट्यात येत असल्यानं पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न गावात आहे. गावाला सध्या 15 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होतो आहे. ही परिस्थिती सुधारणे ही सर्वात मोठी प्राथमिकता राहणार असल्याचे त्या माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या. गावकऱ्यांना प्राथमिक सुविधा पुरवितांना इतर विकासाच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचं सरपंच प्रिया सराटे यांनी सांगितलं.

फॉरेन रिटर्न सरपंच यशोधरा शिंदे
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या वड्डी गावातील तरुणी यशोधरा शिंदे मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी जॉर्जिया या देशात गेली होती. मेडिकल शिक्षण घेतलेली यशोधरा महेंद्रसिंह शिंदे ही सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे. यशोधरा शिंदे या देखील सर्वात तरुण महिला सरपंच ठरली आहे. वड्डी हे मिरज तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेवर असलेले जवळपास पाच हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाही, तसेच महिला आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत यशोधरा निवडणुकीच्या रिंगणार उतरली होती. शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचत का नाहीत? या मुद्यांवर शिंदे यांनी घराघरात जाऊन प्रचार केला होता. गावकरी ही या मुलीच्या मागे भक्कमपणे उभे राहिल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
महिलांसाठी स्वच्छतागृहे, परदेशासारखे शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सॅनेटरी पॅडचे व्हेंडिंग मशीन्स गावात बसवण्याचा मुद्दा त्यांनी प्रचारात आणला. यशोधराने परदेशातील धर्तीवर गावाचा विकास करण्याचे व्हिजन गावकऱ्यांसमोर ठेवले व मते मागितली आणि सरपंचपदी ती निवडूनही आली. माध्यमांशी संवाद साधताना यशोधरा म्हणाली की ” मला असे वाटते की, महिला देखील सक्षम आहेत हे सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळायला हवी. मी त्यांना सक्षम, सुशिक्षित आणि स्वतंत्र बनवू इच्छिते आणि त्यांनी पुरुषांवर अवलंबून राहू नये, महिला आणि बालकांच्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.