- टीम बाईमाणूस
आभाळात थोडीशी अनोळखी वस्तू दिसली की ती तबकडी वाटते. या तबकडी शब्दाने जगावर गेले शतकभर काहूर माजवलय. भारतही त्यापासून लांब नाही. उलट या तबकड्या आणि संस्कृती मधले दाखले एलियन नावाच्या एका गुड कथेच्या इतके जवळ गेलेत की जराशी जरी चाहूल लागली, आभाळात काही हालचाली झाल्या की कोणीतरी आहे तेथे… असं छाती ठोकपणे बोललं जातं. मग संशोधक, खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक सारे सारे कामाला लागतात. गेली शंभर वर्ष हा सिलसिला सुरूच आहे.
दरम्यान नासा आणि इस्त्रो नावाच्या दोन जगविख्यात संस्था जगाला मिळाल्या. या संस्थांनी थेट मंगळ आणि चंद्रावर स्वाऱ्या केल्या. भारताचं सूर्ययान सध्या सूर्याभोवती घिरट्या घालत आहे. चंद्र, मंगळ वर माती, खनिज, ऊन, सावल्या, तापमान, वातावरण, पाण्याची शक्यता यापासून अगदी थेट तिथे पण कुणीतरी आहे का, याचा शोध घेण्यापर्यंतचा बराचसा प्रवास जगाने केला. त्यातला एक टप्पा अर्थातच भारतातला आहे.

भारत एलियन नावाच्या या अनामिक संज्ञेच्या इतका जवळ का गेला ?
खरंतर त्याचं कारण वैज्ञानिकांपेक्षा भारतीय कल्पनाशक्ती, साहित्य, कवित्व यांचाच वाटा फार मोठा आहे. परवा मेक्सिकोच्या संसदेमध्ये पुराव्यानिशी दोन एलियन्सचे सांगाडे संशोधनासाठी आले. त्यांच्यात कुठल्याही पद्धतीची छेडछाड झालेली नाही, हे त्यांच्या शास्त्रज्ञांनी छातीठोकपणे सांगितले. या दोन ममी अर्थात सांगाडे पेरू मधल्या एका जुन्या खाणीत सापडले. या सांगाड्यांची कुणीतरी छेडछाड करून भलतंच वर्जन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप झाला होता. त्याचा सोक्षमोक्ष म्हणून शास्त्रज्ञांच्या एका मोठ्या टीमला एकत्र करून या सांगाड्यांचं रेडिओ कार्बन डेटिंग ही तपासणी करण्यात आली.
अर्थात ही तपासणी कालमापनाचीच आहे. त्यात हे सांगाडे तब्बल 1000 वर्षांपूर्वीचे आहेत, ते निर्दोष आहेत, त्यात छेडछाड झालेली नाही आणि त्यात मिळालेले डीएनए यातील 30 टक्के पेक्षा जास्त डीएनए हे अपरिचित आहेत. इथपर्यंतची माहिती प्रत्यक्षात उपलब्ध होत असताना त्यांच्या रचना आणि वास्तव, वैज्ञानिक तपासण्या आणि शक्यता यांची वाट एलियन होते इथपर्यंत खात्रीलायकरीत्या म्हणण्याएवढी निश्चित झाली आहे का, हे मात्र अद्यापि ठरलेलं नाही. मात्र वास्तव्याशी जवळपास पोचलेल्या या बातमीने फक्त मेक्सिकोच नव्हे ते एलियन नावाच्या गुढ कथेवर प्रचंड प्रेम करणाऱ्या जगभरातल्या अनेक कल्पना विश्वांना आजच अस्वस्थ करून टाकलं आहे.
आपल्या आकाशगंगेप्रमाणे ब्रम्हांडात अनेक आकाशगंगा आहेत. हे शास्त्र सांगत कुठेतरी आपल्या पृथ्वीप्रमाणे जीवन असू शकेल किंवा पृथ्वीपेक्षाही जास्त प्रगत आणि सकस दृष्टी असू शकते, असेही शास्त्र सांगत 70 ते 80 च्या दशकांमध्ये जसा पृथ्वीवरचा माणूस पृथ्वीच्या बाहेरच्या ग्रहांवरती गेला, आपली पावलं उमटवून आला, अगदी त्याचप्रमाणे काही हजार वर्षांपूर्वी पृथ्वीच्या बाहेरील एखाद्या ग्रहावर जिथे वातावरण आहे, तिथला माणूस पृथ्वीवरती आला असेल किंवा येऊ शकतो. अशी सरळ सोपी व्याख्या खगोलशास्त्राने पन्नास वर्षांपूर्वीच करून ठेवलेली आहे.

ही व्याख्या नीट वाचली तर मेक्सिकोत सापडलेली एलियन्स चे तथाकतीत सांगाडे एका गुढ रहस्यापर्यंत पोहोचण्याची वाट दाखवतील, असा विश्वास करायला हरकत नाही. मुळात परग्रहावरील मानवासारखा जीव ही कल्पना माणसाच्या यापूर्वीच्या काही कल्पनांचा एक भाग आहे. माणसाने स्वतःच्या आत्मशांतीसाठी त्याच्या आवडीनुसार अनेक काव्य रचली, कथा निर्माण केल्या. त्यातून देव निर्माण केले की देवाने माणसाला पृथ्वीवर प्रस्थापित केले याही गोष्टींचे कोडे गेल्या पाच हजार वर्षात सुटलेले नाही.
यातच तिसरा दुवा हा एलियन नावाच्या मानव सदृश्य कथेन निर्माण केला आहे. आणि भारतात ‘कोई मिल गया’ या चित्रपटात आलेल्या जादू सारख्या कथानाकांनी नियमितपणे ही कल्पना जास्त जिवंत ठेवण्यासाठी मेहनत केली आहे. आज एलियन या चार अक्षरांवर जगभरात अभ्यास होतोय. मंगळावर देखील अशा आकृत्या डोकावल्याच्या अफवांना उत आला होता. चंद्राकडे बघताना एलियन ही अलीकडे सशाच्या छापाऐवजी अनेकांना दिसतो. मात्र एलियन शोधताना किंवा एलियन मान्य करताना एवढेसे धागे पुरेसे नाहीत. त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा पुनरावलोकन होणार आहे. जगविख्यात शास्त्रज्ञ डार्विन यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. हा जगविख्यात सिद्धांत पुन्हा आडवा उभा फाडावा लागणार आहे.
खरंतर 1936 साली हिटलर यांनी स्वतःच काही पुरावे समोर ठेवत एलियन चा उल्लेख केला होता. जगातल्या 40 देशांमध्ये त्यावर सुसाट चर्चाही झाली. त्यानंतरची पन्नास वर्ष ही जागतिक संशोधनाची होती. माणसाचं चंद्रावर, मंगळावर जाणं इथपर्यंतची होती. मात्र एवढ्या काळात ब्रम्हांडाचे संशोधन करणाऱ्या संशोधन संस्थांना एलियन आहे की नाही, परग्रहावर वातावरण ची शक्यता काय आहे, एलियन असलाच तर तो कसा असेल, तो खरोखर सोलर एनर्जीवर यंत्रासारखा जगतो, तो पृथ्वीवर जिवंत सापडला तर तो भांडेल, इजा करेल, की त्याला इजा होईल, सारं सारं काही कोडेच आहे. जसं चंद्रावर तंबू बांधणाऱ्या संशोधकांना आजही पावसाचा नीट अंदाज सांगता येत नाही, असंच काहीसं सर्वसामान्याच्या नजरेत संशोधन आणि एलियन हा गुंता आहे तसाच आहे.

या सर्व गोष्टींकडे नकारात्मक दृष्टीने पाहून चालणार नाही. कारण आकाशगंगा हेच ब्रम्हांडातील सगळ्यात मोठे गुढ आहे आणि भारत या आकाशगंगेच्या अगदी सर्वात जवळ गेलेला काल-परवाचा नव्हे तर अगदी दहा हजार वर्षापासूनचा सर्वात मोठा तज्ञ देश आहे. ज्या कणाचा म्हणजेच अनु रेणूंचा शोध, गणिताचा शोध, आयुर्वेदाचा शोध, खगोल शास्त्राचा शोध अशा जगप्रसिद्ध शोधांचा धनी असलेला भारत खगोल जगात अग्रेसर आहे. कॅलेंडर, सौर वर्ष, सेकंद अशा अनेक गोष्टींपर्यंत पोहोचलेला भारत एलियनच्या सुद्धा खूप जवळ आहे, असं मानलं जातं.
जोवर आभाळातल्या हालचाली स्पष्टपणे चिकित्सक पद्धतीने तपासल्या जात नाहीत, तोवर ही कोडी सुटणार नाहीत. अलीकडच्या काळात धुमकेतू सारखी कोसळलेल्या काही वस्तू या विविध अवकाश मोहिमांचे स्पेअर पार्ट असल्याचे सिद्ध झालं. मात्र तबकड्यांचं गुढ हे फार मोठे गुढ आहे. अनेकांनी ह्या तबकड्या पाहिलेल्या आहेत. काहींनी त्याचे फोटोही काढलेले आहेत. नासा इस्रोकडे अशी शेकडो प्रकरणं आहेत. मात्र त्यावर अंतिम मत व्यक्त झालेलं नाही आणि तबकड्या किंवा मालेतील हालचालीही थांबलेल्या नाहीत. त्यां नित्य नियमाने होतच आहेत आणि म्हणूनच फक्त साहित्य किंवा कवी कल्पना नव्हे तर शास्त्रीय मनाचा हृदयाचा एक कप्पा देखील भुरभुर जिवंत ठेवून आहे. तो असला तर कधीतरी नक्की सापडेल.