TMKOC : गोकुळधामच्या ‘मिनी इंडिया’मध्ये प्रॉब्लेम ही प्रॉब्लेम…!

गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आणि त्याचे निर्माते सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मालिका सोडून गेलेल्या अनेक कलाकारांनी निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निर्मात्यांवर होणारे आरोप काही केल्या कमी होत नाही. उलट दिवसागणिक त्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत.

  • टीम बाईमाणूस

‘असली मजा तो सब के साथ आता है’ अशी टॅगलाईन घेऊन एकदोन नव्हे तर गेली 14 वर्षे सुरू असलेली, जवळपास 3600 पेक्षा अधिक एपिसोड झालेली आणि टीआरपीच्या या शर्यतीत कित्येक वर्षांपासून टॉप 5 मध्ये असणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका एकामागोमाग एक असे विक्रम मोडीत काढत आहे. असे असले तरी तारक मेहताच्या या ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळधाम सोसायटीत सारं काही ऑलवेल नाही. जितकं पडद्यावर आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-लैंगिक-धार्मिक समानता असल्याचं दाखवलं जात तितकंच पडद्यामागे याच्या अगदी उलट घडताना दिसतयं.

गेल्या काही दिवसांपासून ही मालिका आणि त्याचे निर्माते सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मालिका सोडून गेलेल्या अनेक कलाकारांनी निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तारक मेहता का उल्टा चषमा मालिकेच्या निर्मात्यांवर होणारे आरोप काही केल्या कमी होत नाही. उलट दिवसागणिक त्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. मालिकेतून बाहेर पडलेले कलाकार, क्रू मेंबर्सनं सेटवरचं वातावरण अतिशय वाईट, दूषित असल्याचा आरोप केला आहे. असितकुमार मोदी यांची अत्यंत कठोर पॉलिसीमुळे सेटवरचं वातावरण अत्यंत वाईट असल्याचं सांगितलं जात आहे.

मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल, रिटा रिपोर्टर ची भूमिका साकारणारी प्रिया आहुजा, ‘बावरी’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया, तारक मेहताचा रोल करणारे शैलेश लोढा आणि टप्पूचे कॅरेक्टर साकारणारा राज अनादकट अशा अनेक कलाकारांनी तोफ डागायला सुरूवात केली आहे.

जेनिफर मिस्त्री बन्सीवाल आणि असित मोदी

मिसेस सोढीचे निर्मात्यावर लैंगिक छळाचे आरोप

यापेकी जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माते असित मोदींवर लावलेले आरोप अधिक गंभीर आहेत. जेनिफर मिस्त्री बंसीवालाने 14 वर्षांनंतर ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर तिने गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

जेनिफर मिस्त्रीची एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे, “माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका. मी इतके दिवस मौन बाळगले. आतापर्यंत मी शांत होते पण आता माझा संयम सुटत चालला आहे. सत्य काय आहे हे देवाला माहिती आहे. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. नेहमी सत्याचा विजय होतो.

भाऊ रुग्णालयात असताना निर्मात्यांनी सुट्टी देण्यास नकार दिला होता, असा खुलासा जेनिफरने केला आहे. तसेच वडिलांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांतच पुन्हा शूटिंगसाठी बोलावलं होतं, असंही तिने सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल सांगताना जेनिफरला अश्रू अनावर झाले. भाऊ नागपूरमध्ये रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना ती निर्माता सोहेल रमाणीकडे सुट्टी मागण्यासाठी गेली होती. पण सोहेल तिच्यावर ओरडला आणि त्याने सुट्टी देण्यास नकार दिला होता. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर म्हणाली, “माझा भाऊ व्हेंटिलेटरवर होता, तेव्हा मी निर्माता सोहेल रोमानीकडे सुट्टी मागितली व मला दोन दिवसांसाठी नागपूरला जावं लागेल, असं म्हटलं. पण त्याने मला शूट सोडून जाऊ देण्यास नकार दिला. मी त्याला म्हटलं, ‘तू काय बोलतोय, ते तुला समजतंय का? माझा भाऊ व्हेंटिलेटरवर आहे. त्याचं केव्हाही निधन होऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलंय.” नंतर निर्मात्यांनी जाऊ दिल्याचं जेनिफरने सांगितलं.

जेनिफर पुढे म्हणाली, “सुदैवाने भावाच्या निधनानंतर मला लगेच शूटवर बोलावलं नाही. कारण त्यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी मला कामावर बोलावलं होतं. भावाच्या निधनाच्या वेळी असित मोदीने माझं पेमेंट कापण्यास नकार दिला होता, मी शूटवर नसतानाही मला पैसे दिले होते. पण, जेव्हा मी माझ्या भावाच्या निधनानंतर परत आल्यावर सोहेल मला त्यावरून सारखा बोलायचा. ‘तुझा भाऊ मेला, तेव्हा आम्ही तुला काम न करता पैसे दिले,’ असं तो म्हणायचा.”

अभिनेत्री मोनिका भदोरिया

बावरी म्हणते, “मला आत्महत्या करावीशी वाटत होती”

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान ‘बावरी फेम’ मोनिकाने सेटवर दिल्या जाणाऱ्या त्रासाचा खुलासा केला आहे. मोनिका म्हणाली की, “मला अनेक कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला आहे. मी खूप कमी कालावधीत माझी आई आणि आजी या दोघींना गमावले. ते दोघे माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ होते. त्यांनी मला खूप प्रेमाने वाढवले. या दु:खातून ती कधीच बाहेर पडू शकली नाही. हा मोठा धक्का अनुभवल्यावर मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटले. त्या काळात मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी काम करत होते. मात्र, तिथेही माझा मानसिक छळ होत होता. घरची बिकट अवस्था आणि त्यात शोमध्ये होणार्‍या छळामुळे मी मानसिकरीत्या कोसळले होते. या गोष्टीमुळे मला आत्महत्या करावीशी वाटत होती.”

रिटा रिपोर्टरने लावली पहिली ठिणगी

तारक मेहताच्या सेटवर काय नेमकं काय घडायचं याची माहिती प्रिया आहुजा हिनं काही वर्षांपू्र्वी सांगितली होती. प्रियानं कार्यक्रमात रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारली होती. ती काम करत असताना प्रियानं कार्यक्रमाचा दिग्दर्शक मालव राजदा यांच्याशी लग्न केलं होतं. जेव्हा दिग्दर्शक मालव यांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रियानं सेटवरचं वातावरण कसं होतं हे सांगितलं. तसंच तिनं हे देखील सांगितलं की, कार्यक्रमात प्रियाला काम करायचं होतं परंतु टीमकडून कोणताच प्रतिसाद आला नाही.

प्रियानं सांगितलं की, तिच्याशी कुणीही सेटवर वाईट वागलं नाही. ना तिचा कुणी छळ केला. परंतु काही तरी घडल्याशिवाय अशाप्रकारच्या चर्चा होणार नाही. काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश लोढा आणि राज अनादकट यांनी त्यांना दुसरीकडे कुठेच काम करता येत नसल्यानं या मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. शैलेशला त्याचे कवितांचे कार्यक्रम करायचे होते तर राजला एका म्युझिकल व्हिडिओत तसंच एका रिऍलिटी कार्यक्रमात काम करायची संधी मिळाली होती.

या दोघांप्रमाणे मुनमुन दत्ता हिनं देखील या कार्यक्रमाच्या निर्मात्यांच्या जाचक नियमांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. असित मोदी यांनी देखील तिच्यावर काही बंधने घातली होती.

अभिनेत्री प्रिया आहुजा आणि दिग्दर्शक मालव राजदा

दिग्दर्शक मालव राजदानंही सोडली मालिका

कार्यक्रमाचे आधीचे दिग्दर्शक मालव राजदा हे देखील कार्यक्रमातून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यानी सांगितलं की ते जे काही काम करत होते त्यातून त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांनी निर्मात्यांबरोबर जमत नाही म्हणून काम सोडलं असं कारण त्यांनी दिलं नाही. त्यांनी सांगितलं की, कार्यक्रमाच्या सेटवर नकारात्मक वातावरण होतं. त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर होत असल्यानं कार्ययक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. तसंच आणखी काही नवीन करून बघण्याची त्यांची इच्छा होती. कार्यक्रमाच्या सेटवर कलाकार, निर्मात्यांशी थेट बोलण्याचा अधिकार दिग्दर्शक म्हणून नव्हता. इथं प्रत्येकजण प्रत्येकाला काही ना काही सूचना द्यायचा.

सगळ्या जाती-धर्माचे लोकं आपापसात भाईचारा दाखवत अतिशय गुण्यागोविंदाने राहणारी गोकुळधाम सोसायटी म्हणजे मिनी इंडिया असल्याचे या मालिकेतून वेळोवेळी मांडण्यात आले आहे आणि प्रेक्षकांचाही तसा समज झाला आहे. मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये मिनी इंडिया आणि सर्वधर्मसमभाव असल्याचा जो दावा करण्यात येतो किंवा तसे दाखविण्याचा जो प्रयत्न केला जातो तो खरोखर आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे का? खरंच या मालिकेत आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-लैंगिक-धार्मिक समानता आहे का? खरंच या मालिकेत समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व आहे का?

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here