- टीम बाईमाणूस
भारतामध्ये सर्व संस्कृती एकत्रित नांदत असताना त्यांच्यामध्ये विष पेरण्याचे काम सुरू आहे. सध्याचा धर्म भ्रष्ट झालेला आहे. धर्माच्या नावाखाली अत्यंत हिंस्त्र घटना घडविल्या जात आहे. त्यामुळे माझ्या राष्ट्राला वाचविण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे. हे काम आता धार्मिक राहून होणार नाही, तर त्यासाठी धर्मविहीन झाले पाहिजे, असे मत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
ब्राईट सोसायटीच्या वतीने सांगलीत दहाव्या नास्तिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन गांधी यांच्याहस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व लेखक जावेद अख्तर प्रमुख पाहुणे होते. तुषार गांधी म्हणाले, सध्या भारतात धर्माचा वापर करून ज्या काही घटना घडत आहेत, ते पाहिले की आपला राष्ट्र आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही. राजस्थानमध्ये 9 वर्षाच्या दलित मुलाने मटक्यातून पाणी घेतल्याच्या रागातून त्याची अमानुष हत्या केली जाते. मणिपूरमध्ये महिलांवर अमानुष अत्याचार झाल्यानंतरही आपल्याला त्याबाबत काहीही कळत नाही. व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर आपण आवाज उठवतो. मध्यप्रदेशमध्ये एकाने आदिवासी दलित मुलाच्या डोक्यावर लघवी केली. या घटना पाहून भारतीयांचे रक्त कसे उसळत नाही. भारताच्या फाळणीच्यावेळी झालेल्या घटनेचा राग आता काढला जातो. पण दहा महिन्यापूर्वी घडलेल्या गंभीर घटनेचा आपल्याल जराही राग येत नाही. त्यामुळे सनातनी धर्माला भ्रष्ट स्वरुप आले आहे. धर्मनिरपेक्षताच्या नावाखाली धर्ममार्तंडांनी महात्मा गांधी, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव केला आहे. या विरोधात काही बोलले तर लगेच आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, असे म्हणून खटले दाखल केले जाते. धर्माचा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता बाजूला करून त्याऐवजी नास्तिकता आणण्याची गरज आहे.

धर्म हा एका मानसिक आजार, स्किझोफ्रेनिया : जावेद अख्तर
माझा नास्तिकतेचा प्रवास याविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, माझा जन्म झाल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या कानात ‘कम्युनिस्ट मॅनिफिस्टो’ म्हटले होते. माझे नाहीही ‘जादू’ असे ठेवले होते. त्यामुळे नास्तिकता ही आमच्या घरामध्येच होती. धर्माच्याविरोधातील लढाई ही चार हजार वर्षापूर्वी चार्वाकांनी सुरू केली होती. त्यांनी धर्माला प्रश्न विचारायला सुरू केले. 500 वर्षापूर्वी पृथ्वी ही स्वत:भोवती फिरते, हे सांगण्यात आले. हे धर्माच्या विरूद्ध होते. परंतु प्रश्न विचारणार्यांना मारून टाकत असत. धर्मामुळे, देवामुळे आम्हाला शांती मिळते, असे धार्मिक लोक म्हणतात. परंतु त्याचा अतिरेक झाल्यानंतर मात्र हिंसा सुरू होते. असा धर्म काय कामाचा. धार्मिक संस्कार हे लहानपणापासूनच केले जातात. त्यामुळे मोठेपणी त्याच्यामध्ये धार्मिकता रुजलेली असते. त्यामुळे वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलाला धर्माबद्दल काहीही सांगू नका. त्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे त्या मुलाला ठरवू दे. पण त्यावेळी तो कोणताच धर्म स्वीकारणार नाही.
श्रद्धा आणि विश्वास याबाबत बोलताना ते म्हणाले, श्रद्धा ही आंधळीच असते. एखाद्यावर विश्वास असणे गैर नाही. कारण विश्वासामध्ये पुरावा असतो. परंतु श्रद्धेमध्ये पुरवा, तर्क केला जात नाही. त्यामुळे अशा अंधश्रद्धाळू लोकांचा फायदा त्या त्या धर्मातील नेते उठवत असतात. श्रद्धाळू लोकांना मुर्ख बनवून स्वत:चा फायदा करून घेत असतो. धर्मात असलेल्या अतार्किक गोष्टीं स्वीकारल्यामुळे लोक विचार करू शकत नाहीत. धर्मात स्वर्ग-नरकाच्या कल्पना, मेल्यानंतर सर्व काही मिळेल, अशा अतार्किक गोष्टींचा वापर अत्यंत हुशारीने राजकीय लोक करीत असतात. परमेश्वराशिवाय जगात पत्ताही हालत नाही, असे धर्मात म्हटले आहे. पण लोकांवर अन्याय, अत्याचार, खून, बलात्कार या गोष्टी परमेश्वर का थांबवू शकत नाही, असा साधा विचारही माणूस करीत नाही. हे सर्व घडत असताना परमेश्वराला लाज कशी वाटत नाही. या सगळ्याला प्रश्न विचारले पाहिजे. आतापर्यंत प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत राहिलो म्हणून आपली प्रगती झाली. प्रश्न विचारणार्यांना धर्माने विरोध केलेला आहे. धर्माला प्रश्न विचारणारे चार्वाक होते. त्यांनी साडे तीन हजार वर्षापूर्वी हे काम केले.
ब्राईट सोसायटीचे सचिव कुमार नागे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष प्रमोद सहस्त्रबुद्धे यांनी ब्राईट सोसायटीची उद्दिष्टे मांडली. चंद्रकांत शिंदे यांनी आभार मानले. डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात सलीम मोमीन यांचे सहकारी समुवेल घाटगे, महेश नवाळे, गणेश बिरनाळे यांनी क्रांती गीतांनी झाली.

हे राम ते नो राम : तुषार गांधींचा प्रवास
तुषार गांधी म्हणाले, मला महात्मा गांधी यांचा पणतू म्हणून ओळखतात. गांधीजी धार्मिक होते. परंतु मी तर मला गांधींजीचा बिघडी हुई औलाद म्हणतो. गांधींजीच्या बद्दलत वाचत असताना त्यावेळी नास्तिक विचाराचे आंध्रप्रदेशमधील गोरा आणि बापू यांची चर्चा होत असल्याचे दिसले. त्यावेळी नास्तिक विचार हा मी लहानपणापासून वाचत आलेलो आहे. सध्या धर्माच्या माध्यमातून विषारी विचार पेरले जात आहेत. त्यामुळे आता धार्मिक नाही, धर्मनिरपेक्षताही नाही तर नास्तिक बनण्याची गरज आहे.
धर्म हे विष, नास्तिकता हाच पर्याय
धर्म हे विष आहे. ते स्वत:चेही नुकसान करते, आणि समाजाचेही. त्यामुळे धर्मापेक्षा विवेकी नास्तिक होणे हा चांगला पर्याय आहे, असे मत विविध वक्त्यांनी या परिषदेत व्यक्त केले.
नास्तिक परिषदेत ‘नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये तुषार गांधी, ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर सहभागी झाले होते. डॉ. प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. शिवप्रसाद महाजन यांनी प्रास्ताविक केले. लोकेश शेवडे यांनी ‘नास्तिकतेची भूमिका- सामाजिक आणि राजकीय’ या विषयी बोलताना म्हणाले, नास्तिकतेची भूमिका सामाजिक आणि राजकीयमध्ये मांडता आली पाहिजे. अनेकजण आपण नास्तिक असल्याचे सांगतात. परंतु खरे नास्तिक कोण हे ओळखता येत नाही. काहीजण धर्म-परधर्म, जात-परजात मानतात. कोणत्याही धर्मात परमेश्वर ही कल्पना असतेच. धर्म-परधर्म या पातळीवर न राहता ते परधर्मद्वेषांपर्यंत जातात. अशा ढोंगी लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. ते स्युडो नास्तिक असतात. नास्तिक बनण्याची प्रक्रिया सोपी नाही. त्याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. बहुसंख्याकवादाचा मुद्दा पुढे करून अल्पसंख्याकांना चिरडण्याचा संभव असतो. परंतु त्याविरोधात आपण लढा दिला पाहिजे.

‘प्रसार माध्यमात नास्तिकतेची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले, नास्तिक बनणे ही प्रक्रिया आहे. आपण नकारत्मक नास्तिकता स्वीकारतो. पण नकारात्मक नास्तिकताही आस्तिकतेची मिरर इमेजच असते. प्रसार माध्यमातून नास्तिकेचा प्रचार होत नाही. धर्म मात्र आपुसकपणे मांडले जाते. प्रसार माध्यमातून भगवतगीता पठणच्या स्पर्धा घेतल्यात जातात. ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. आपली माध्यमेही अर्थकारणासाठी चालवली जातात. दरोडा घालणारे, खून करणार्यांची जात आता वृत्तपत्रात छापली जात आहे. निर्भया प्रकरणानंतर ही परिस्थिती वाढत गेली. देशाचे पंतप्रधान जातीयवादी भाषण करतात आणि प्रसार माध्यमे ती छापतात. अशा बातम्यांचे मॅनेजमेंट हे ग्लोबल न्यूज मॅनेजमेंटवर चालते. यामागे धार्मिक प्रवृत्त्ती असतात. अशा प्रवृत्तीचा आता सोशल मीडियातही शिरलेल्या आहेत. इतर धर्माविरोधात शस्त्र म्हणून सोशल मीडीयाचा वापर केला जातो. त्याला लागणारे सर्व तंत्रज्ञान पुरविले जाते. खोट्या बातम्याद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. याविरोधाही आपल्या लढा दिला पाहिजे.
केतकर पुढे म्हणाले की, बहुसंख्याकवाद हा जातीचा, धर्माचा, उपजातीचा असू शकतो. हे विवेक नाही. सध्या समान नागरी कायदा, तिहेरी तलाक हे मुद्दे आणले जात आहेत. वास्तविक पाहता हे मुद्दे सर्वांचे नाहीत. प्रापर्टीचे मुद्दे यामध्ये येतात. आपल्या देशात समानता अशक्य आहे. डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, आपण नास्तिक बनण्यासाठी काय करावे लागेल, हे पाहिले पाहिजे. आपण नास्तिक बनल्यानंतर सर्व गोष्टींना नकार देत असतो. हा नकार देत असताना आपल्यावर जवळ पर्याय काय आहे, हेही महत्त्त्वाचे आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन व तार्किकता या गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे.
विश्वंभर चौधरी म्हणाले, आपली राज्यघटना ही श्रेष्ठ आहे. जगातल्या कोणत्या राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन सांगितलेला नाही. नागरिकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे. परंतु कोणत्याही धर्माला मोकाट स्वातंत्र्य देण्यात आले नाही. देशाचा पाया हा राज्यघटना आहे. परंतु शाळेमधून तो शिकवला जात नाही. यापुढे नागरिकशास्त्र 100 मार्काचे असेल तर राज्यघटना 50 मार्काचे शिकवले पाहिजे. आपले सर्व कायदे हे सर्वांसाठी सारखे आहेत. परंतु परंपरांना एकत्र बांधून ठेवता येत नाही. त्यामुळे धर्माऐवजी विवेकवादा स्वीकारला पाहिजे. कारण हा विवेकवाद हा भारतीय परंपरेतील आहे. चार्वाकापासून विवेकवादाचा सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये विवेकवादी होणे हे आव्हान आहे. परंतु विवेकवाद जोपासण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार केला पाहिजे. विज्ञानवाद वाढवत नेल्यास विवकेवाद वाढत जाईल. परंतु आपल्या समाजात विज्ञानवाद रुजविला गेला नाही. त्यामुळे भोंदुगिरी वाढत आहे. परंपरेची चिकित्सा केली जात नाही. धर्माची चिकित्सा झाली पाहिजे.