- टीम बाईमाणूस
“शिवसेना हा मर्दांचा पक्ष आहे’’ असे बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे.. त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरेंनी देखील बाळासाहेबांचीच री ओढली… मात्र असे असले तरी शिवसेनेच्या जडणघडणीत त्या पक्षाच्या महिलांचा सहभाग कायमच महत्वपूर्ण राहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे या महिलांचं ‘रणरागिणी’ असं गौरवानं वर्णन करत असत. जरी शिवसेना केवळ महिलांसाठी आरक्षित जागेवर निवडणुकीचं तिकीट देणं आणि एखादीला महापौर बनवणं याव्यतिरिक्त महिलांना विशेष स्थान देऊ शकली नसली तरी महिलांच्या योगदानाशिवाय शिवसेनेचा इतिहास लिहिला जाणं शक्यच नाही…
तारिणी बेदी या लेखिका मुंबईतल्या गोरेगावच्या रहिवासी. मृणाल गोरे आणि शिवसेना या दोन्ही लोकोत्तर घटना लेखिकेनं लहानपणी अनुभवल्या. नंतर लेखिका डॉक्टरेट करण्यासाठी इलिनॉय विश्वशाळेत गेली. तिथं दक्षिण आशिया विषयात अभ्यासाचा एक भाग म्हणून ‘शिवसेनेतल्या धाडसी महिला’ असा विषय लेखिकेनं घेतला. मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणच्या धाडसी शिवसैनिक महिलांसमवेत त्या वावरल्या, ऍक्शनमधे असताना त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांचा पीएचडी प्रबंध तयार झाला, त्यावरून तारिणी बेदी यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव आहे… ‘दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना’…

सेनेतलं धाडसी-डॅशिंग स्त्रियांचं स्थान…
‘दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेनाः पोलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तीन महिलांच्या हातात चाकूची उघडी पाती दिसतात, ते चाकू बाळ ठाकरे यांच्या फोटोच्या की चेनमधे अडकवलेले आहेत. शिवसेनेच्या विकासात आणि टिकण्यात महिलांचा वाटा किती आहे ते वरील पुस्तक अप्रत्यक्षपणे दाखवतं. अप्रत्यक्षपणे अशासाठी म्हणायचं, की पुस्तकाचा मुख्य विषय आहे सेनेतलं धाडसी-डॅशिंग स्त्रियांचं स्थान.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक निळू दामले ‘दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना’ या पुस्तकाचे परीक्षण करताना लिहितात की, झोपडपट्ट्या, गरीब-वंचित वस्त्या यातल्या लोकांच्या नागरी अडचणी सेनेच्या महिला सोडवतात. मालकीचं घर, सांडपाणी व्यवस्था, पाणी मिळवून देणं, खासगी भाई आणि पालिका यांच्याकडून होणारी दादागिरी आणि अन्याय यांच्यापासून संरक्षण देणं इत्यादी कामं या महिला निरलसतेनं करतात. या कामाचं एक मॉडेल मृणाल गोरे यांनी तयार केलं होतं. विधायक आणि कायदेशीर संघर्ष हे ते मॉडेल होतं. प्रश्न हाती घ्यायचे, मोर्चे काढायचे, निवेदनं द्यायची, सनदशीर पण संघर्षाच्या वाटेनं प्रश्न सोडवायचे. यात सेनेनं स्वतःच्या स्टाईलची भर घातली. बेधडक राडे करणं. सरकारी अधिकारी किंवा बिल्डर किंवा कोणाच्याही कानाखाली आवाज काढणं. त्यांना धोपटणं. मोर्चा किंवा तत्सम प्रसंगी तोडफोड करणं. मृणाल गोरे अधिक सेना असं मिश्रण महिलांनी साधलं. परिणामी त्यांनी मृणाल गोरे यांना मागं टाकून सेना अधिक प्रभावी केली.
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, सेनेला राजकारण करायच नाहीये, समाजकारण करायचंय. सेनेतल्या स्त्रियांनी ठाकरेंचं म्हणणं अमलात आणलं. तारिणी बेदी यांच्या पुस्तकातल्या बहुतेक सगळ्या धाडसी महिला धडाडीनं समाजकार्य करतात, पण राजकारणात फार पडत नाहीत. शाखाप्रमुखांनी आदेश दिला, सुचवलं की महिला मोर्चात, तोडफोडीत, सभेमधे सामील होतात. पण नंतर त्या आपापल्या ठिकाणी आपापली कामं करत रहातात.

शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचं नेटवर्किंग
महिला कार्यकर्त्यांचं एक नेटवर्किंग असतं. हळदी कुंकू, संक्रांत, गोविंदा इत्यादी सांस्कृतिक प्रसंगी महिला एकत्र येतात. यात राजकारण आहे असं कोणालाही वाटत नाही. सेनेला या नेटवर्किंगचा उपयोग होतो. नारायण राणे यांना हरवण्यासाठी मुंबईहून महिला सैनिकांची फौज कोकणात गेली होती आणि नेटवर्किंगचा उपयोग करून त्यांनी राणेंच्या मतदारांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळवला होता.
‘शिवसेना आणि महिला’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनीदेखील सखोल संशोधन केलं आहे. त्या म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे या महिलांचं ‘रणरागिणी’ असं गौरवानं वर्णन करत असत. पण, महिलांसाठी आरक्षित जागेवर निवडणुकीचं तिकीट देणं आणि एखादीला महापौर बनवणं याव्यतिरिक्त महिलांना विशेष स्थान ते देऊ शकले नाहीत.
‘बीबीसी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात पत्रकार सुजाता आनंदन यांनी त्यांच्या विश्लेषणात मांडलयं की, शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, शिवसेना हा ‘पुरुषी’ पक्ष. 1990 च्या दशकांत सगळीकडे पकड घट्ट करू लागलेल्या या पक्षात रस्त्यावर उतरून काम करणारे आणि ताकदीचा वापर करत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते होते. पण, कथित हळव्या म्हणवल्या जाणाऱ्या महिलांना तिथे अजिबात स्थान नव्हतं.

मुंबईच्या दंगलीनंतर सेनेच्या महिलांची दखल
राजीव गांधी यांच्या सरकारानं 1980च्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा आरक्षित केल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. त्यामुळे मग शिवसेनेलाही महिला आघाडी स्थापन करावी लागली. 1992-93 मध्ये मुंबईत दंगली झाल्या आणि शिवसेनेतल्या महिलांना आपली भूमिका समजून चुकली. जी नाजूक ही नव्हती आणि हळवीही नव्हती. यामुळे या महिला पुरुषांपेक्षाही आक्रमक होऊ लागल्या. काही पुरुषांची दंगलीत उतरायची इच्छा नसतानाही, केवळ पण आपल्या पत्नीच्या सांगण्यावरुन त्यांनाही दंगलीत आक्रमक व्हावं लागलं होतं.
स्थापनेपासून आतापर्यंतच्या काळात शिवसेनेच्या जडणघडणीत मोठे बदल झाले आहेत. सुरुवातीला भूमिपुत्रांच्या हक्काच्या रक्षणासाठी स्थापन झालेली संघटना असं तिचं स्वरूप होतं. स्थानिकांना नोकऱ्या, घरं मिळवून देणं, त्यांचे हक्क डावलले जाणार नाहीत याची दक्षता घेणारी ही संघटना होती. मूळ उदि्दष्टांची आता बऱ्यापैकी पूर्तता झालेली आहे. महिला आघाडीत प्रामुख्यानं झोपडपट्टीतल्या, तळागाळातल्या महिलांचा समावेश होता. एकमेकींच्या मदतीसाठी उभ्या राहणाऱ्या, हुंड्यावरून होणाऱ्या छळाच्या विरोधात, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या या महिला होत्या.
मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या, पैठणी नेसणाऱ्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र घालणाऱ्या या महिलांनी घरकाम करणाऱ्या महिलांसोबत अंतरही राखलं असेल. पण दंगलीच्या काळात सगळी दरी भरून निघाली. महिला आघाडीचं स्थानही उंचावलं. मध्यमवर्गीय आणि उच्च स्तरातील महिला आघाडीत येऊ लागल्या. वादात सापडलेले सरकारी अधिकारी, कर्मचारी, शाळा-कॉलेजचे प्राचार्य यांच्या चेहऱ्याला काळं फासणं, नैतिकतेच्या मुद्दयावर चित्रपटाचे खेळ बंद पाडणं, लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा जाहीर उद्धार करणं… या सगळ्यासाठी या महिलांची सेनेला मदत झाली. पण हे सगळे रस्त्यावरचे उपक्रम झाले. त्यामुळे ज्या महिलांना तसं करणं जमणारं नव्हतं त्या या वाटेला आल्याच नाहीत.

सेनेची महिला आघाडी पोळीभाजी केंद्रापुरतीच राहिली
बाळासाहेबांनी मीनाताईंकडे जशी महिला आघाडीची सूत्रं दिली होती. त्याच पावलावर पाऊल टाकत उद्धव यांनीही त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे महिला आघाडीची जबाबदारी दिली. परंतु, कुटुंब सखीच्या छत्राखाली पोळीभाजी केंद्रं उभी करण्यास मार्गदर्शन करण्यापलीकडे महिला आघाडीची मजल गेली नाही. 1990च्या दशकात, बाळासाहेब ठाकरेंच्या ‘रणरागिणी’ या संकल्पनेपेक्षा पुढे काही घडलं नाही, असं पत्रकार सुजाता आनंदन म्हणतात.
तारिणी गुप्तांच्या ‘दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना’ या पुस्तकात शिवसेनेच्या वीस पंचवीस महिला कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रं रंगवली आहेत. महिला कार्यकर्ती घरात कशी वावरते, कचेरीत कशी जाते, तिथं कार्यकर्त्यांबरोबर ती कशी वागते, अँक्शनमधे ती कशी असते इत्यादी गोष्टींचं चित्रासारखं वर्णन लेखिकेनं केलं आहे. त्या महिला कार्यकर्त्या डोळ्यासमोर उभ्या रहातात.
आम्ही काहीही करू शकतो, आम्हाला कशाचीही भीती नाही..
पुण्याच्या बालाताई बाईकवरून फिरतात. त्या लेखिकेला सांगतात ” सर्वांना माहित आहे की मी मिरचीची पूड टाकून तुम्हाला आंधळं करू शकते आणि तुम्हाला ठारही मारू शकते.तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कुठे मराल पण मला ते माहित असतं. आम्ही शिव सैनिक आहोत. आम्ही काहीही करू शकतो, आम्हाला कशाचीही भीती नाही…” बालाताईंचा एक कार्यकर्ता सांगतो ”
पुण्यातल्या शीला. गरीब घरच्या. लहानपणीच लग्न झालं. नवरा दारुडा, शीलाला मारझोड करत असे. शीलानं धैर्यानं घर सोडलं, माहेरी परतली. नवरा तिथही जाऊन तिला त्रास देत असे. शीला सेनेत गेली. सेनेतले कार्यकर्ते तिला मदत करू लागले. शीलाला संरक्षण मिळालं. शीलानं संसार नीट केला आणि ती सेनेची कार्यकर्ती झाली. तिच्या धैर्याबद्दल तिचं कौतुक होऊ लागलं. आसपासच्या वस्तीत एकाद्या स्त्रीला त्रास होऊ लागला की ती शीलाकडं जाऊ लागली. अन्याय घरच्या माणसाकडून होत असो की समाजातल्या इतर कोणाकडून. शीला सरसावते. शीला जाहीर सभातही बेधडक बोलते.
पुस्तक वाचल्यानंतर सेनेचं एक वेगळंच चित्र तयार होतं. तळात काम करणाऱ्या निरलस महिला कार्यकर्त्या. कोंडी झालेल्या समाजात बेधडक-बिनधास्त पद्धतीनं प्रश्न तडीस लावणाऱ्या कार्यकर्त्या. इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते (पुरुष-महिला) शांततामय इत्यादी पद्धतीनं कामं करतात, सेनेच्या महिला कार्यकर्त्या राडा करायला तयार. त्यांची वाट समाजाला मान्य न होणारी पण प्रभावी. बहुतांश कार्यकर्त्या बहुजन समाजातल्या, दलित, मागासवर्गीय. शिवसेनेची राजकीय घडण वेगळी असल्याचं या धाडसी महिलांच्या कामाकडं पाहून लक्षात येतं. दी डॅशिंग लेडीज ऑफ शिव सेना हे पुस्तक शिव सेनेचा एक वेगळाच पैलू वाचकांसमोर ठेवतं. शिव सेनेच्या विकासात आणि टिकण्यात महिलांचा वाटा किती आहे ते वरील पुस्तक अप्रत्यक्षपणे दाखवतं. अप्रत्यक्षपणे अशासाठी म्हणायचं की पुस्तकाचा मुख्य विषय आहे सेनेतलं धाडसी-डॅशिंग स्त्रियांचं स्थान. परंतू धाडसी महिलांच्या गोष्टी ऐकत असताना सेना बलवान का झाली या प्रश्नाचं एक उत्तर अलगदपणे वाचकाला सापडतं.